-गौरव मुठे
भारतात नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमशीलतेत झपाट्याने वाढ होत असून जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. नवउद्यमी उपक्रमशीलतेत ‘युनिकॉर्न’ म्हणजे एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली जाणे असून, हा यशाचा महत्त्वाचा टप्पा गाठणाऱ्या नवउद्यमींची एकूण संख्या मार्च २०२२ मध्ये १०० वर पोहोचली आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र एकीकडे नवउद्यमींची एकूण संख्या वाढत असली तरी त्यांना सध्याच्या वातावरणात उद्योग विश्वात टिकून राहणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यापैकी काही नवउद्यमींनी खर्च कमी करण्यावर भर दिला असून मनुष्यबळ कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामागची नेमकी काय करणे आहेत ते जाणून घेऊया.
भांडवलाची कमतरता
देशातील १०० नवउद्यमींपैकी काही कंपन्यांनी सरलेल्या आर्थिक वर्षात उच्च मूल्यांकनावर आक्रमकपणे निधी उभारणी केली. तसेच त्यांनी विविध व्यवसाय क्षेत्र, भौगोलिक क्षेत्रांमध्ये वेगाने विस्तार साधला आहे. मात्र सर्वच नवउद्यमींना नफा मिळविता आला नसल्याचे मुंबईस्थित विदा विश्लेषण कंपनीच्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. या ‘युनिकॉर्न’ नवउद्यमी उपक्रमांनी आजपर्यंत गुंतवणूकदारांकडून ८,००० कोटी डॉलरपेक्षा (सुमारे ६.१० लाख कोटी रुपये) अधिक निधी उभारला आहे, ज्यामुळे त्यांचे मूल्यांकन ३०,००० कोटी डॉलरपेक्षा (सुमारे २३ लाख कोटी रुपये) अधिक आहे. मात्र जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव आणि त्यापरिणामी जगभरात महागाईने रौद्र रूप धारण केले आहे. यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात आक्रमकपणे वाढ करण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणूकदार अधिक व्याजदर आणि गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे नवउद्यमींना नवीन आर्थिक वर्षात भांडवल उभारणी करण्यास कसरत करावी लागते आहे.
खर्चाचा वाढता भार
सरलेल्या वर्षात मुबलक भांडवल पुरवठ्यामुळे कंपन्यांनी जलद विस्तार साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केली. यामुळे कंपनीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. युद्धामुळे पुरवठ्याच्या बाजूने व्यत्यय येण्याच्या भीतीने खनिज तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे कच्च्या मालाच्या किमतीदेखील वाढल्याने सर्वच क्षेत्रात महागाईचा भडका उडाला आहे. नवउद्यमींच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि त्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने कंपनीवर खर्चाचा बोजा अधिक वाढला आहे. म्हणूनच कंपन्यांनी विस्ताराच्या काळात केलेल्या अतिरिक्त नोकर भरतीमुळे कंपनीच्या खर्चात अधिकच भर पडली.
नवउद्यमी कंपन्यांकडून निराशा
गेल्या वर्षी काही आघाडीच्या कंपन्यांनी समभाग सूचिबद्ध करून भांडवली बाजारात प्रवेश केला. मात्र नवीन वर्षात भांडवली बाजारातील पडझड ही नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांसाठी खूपच मारक ठरली. पेटीएम, पॉलिसीबझार, नायका, झोमॅटो, कारट्रेड टेक या कंपन्यांचे समभाग चालू वर्षांत दणदणीत आपटले. गेल्या वर्षांत अतिभव्य प्रारंभिक भागविक्री आणि त्याला गुंतवणूकदारांकडून दणकेबाज प्रतिसाद मिळवीत अनेक नवीन पिढीच्या कंपन्यांचे समभाग बाजारात सूचिबद्ध झाले. परंतु ताज्या पडझडीत या कंपन्यांच्या समभागांना आता वाली उरला नाही, अशी मोठी घसरण त्यात सुरू आहे. त्यातील काही कंपन्यांचे समभाग हे कंपनीने गुंतवणूकदारांना प्रारंभिक समभाग विक्रीच्या वेळी दिलेल्या किमतीपेक्षा खूप खाली गडगडले आहेत. यामुळे आता गुंतवणूकदार देखील नवउद्यमी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत.
शिक्षण क्षेत्रातील नवउद्यमींना अधिक अडचणी
तंत्रज्ञानाधारित शिक्षण मंच असलेल्या अनअकॅडमी आणि वेदांतू सारखा कंपन्यांनी सर्वाधिक कर्मचारी कपात केली आहे. बेंगळूरुस्थित तंत्रज्ञानाधारित शिक्षण मंच ‘वेदांतू’कडून ४२४ तर अनअकॅडमीने १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. तंत्रज्ञानाधारित शिक्षण मंच असलेल्या कंपनीकडून नफा वाढीसाठी प्रयत्न केले जात असून, त्या संबंधाने धोरणात्मक उपाययोजना आणि खर्चात कपातीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. तसेच करोना निर्बंध संपुष्टात येऊन शाळा-महाविद्यालयांचे वर्ग सुरू झाल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्याचा कल कमी झाल्याने एकंदरीत तंत्रज्ञानाधारित शिक्षण मंचांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
नवउद्यमी कंपन्यांसाठी बाजारात टिकून राहणे दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत आहे. जागतिक मंदीसदृश परिस्थितीमुळे नवउद्यमींना व्यवसाय करण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे वेदांतूचे मुख्याधिकारी व सह-संस्थापक वामसी कृष्णा यांनी समाजमाध्यमावरील टिपणांतून स्पष्ट केले. शिवाय वाढत्या महागाईमुळे आगामी तिमाहीमध्ये भांडवल कमतरता निर्माण होण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली.
कोणी किती कपात केली?
चालू वर्षात विविध नवउद्यमी कंपन्यांकडून सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये पुढील कंपन्यांचा समावेश आहे.
कंपनीचे नाव : कर्मचारी कपात (संख्या)
अनअकॅडमी: १०००
वेदांतू : ६२४
कार२४ : ६००
एमफाईन : ५००
ट्रेल : ३००
लिडो : २००
मीशो : १५०
फ्रंटरो : १४५
एमपीएल : १००
ओकेक्रेडीट: ३५