प्रशांत महासागरात ला निना सक्रिय झाल्यानंतरही भारतासह जगभराला तापमान वाढीला सामोरे जावे लागले. जानेवारी महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरल्यामुळे २०२५ ची सुरुवात तापमान वाढीने झाली आहे, अशी स्थिती का निर्माण झाली, त्या विषयी…
ला निना सक्रिय झाला म्हणजे नेमके काय?
प्रशांत महासागरात अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर डिसेंबर २०२४ मध्ये ला निनाची स्थिती सक्रिय झाली आहे. जुलै २०२४ पासून ला निना सक्रिय होईल, असा अंदाज अनेक जागतिक हवामान संघटनांनी जाहीर केला होता. पण, सर्व अंदाज फोल ठरले. डिसेंबर २०२४ ला ला निना सक्रिय झाला. पण, ला निना स्थिती खूपच कमकुवत असून, जेमतेम अडीच महिने म्हणजे मार्च अखेरपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे. ला निना कमकुवत असल्यामुळे भारतासह जागतिक तापमान अथवा हवामानावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ०.७ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. त्यामुळे ला निना स्थिती निर्माण झाली, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात ही स्थिती कमकुवत आहे, हेच तापमान सरासरीपेक्षा ०.९ अंश सेल्सिअसने कमी झाले असते तर ला निनाची स्थिती मजबूत आहे, असे म्हणता आले असते.
ला निनामुळे भारतात थंडी वाढते?
प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या ला निनामुळे उत्तर भारतात कडक्याची थंडी पडते. थंडीच्या लाटांची संख्या आणि दिवस वाढतात, असे मानले जाते. पण, हे प्रत्येक वेळेस होईलच याची खात्री देता येत नाही. ला निनामुळे प्रामुख्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतात. या कमी दाबाच्या क्षेत्राकडे उत्तरेतून वाऱ्याचा प्रवाह सुरू होतो. त्यामुळे मध्य आशियातून येणारे थंड वाऱ्याचे झोत वेगाने, जास्त संख्येने भारतात दाखल होतात. उत्तरेत येणारे थंड वारे महाराष्ट्रापर्यंत दाखल होऊन थंडी वाढते. प्रामुख्याने रब्बी हंगामाच्या काळात थंडी पडल्यामुळे गहू, मोहरी, हरभरा पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ होते. पण, यंदा डिसेंबरअखेरीच्या काळात ला निना सक्रिय झाला आणि सक्रिय झालेला ला निना कमकुवत असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम भारतावर दिसून येत नाही.
जानेवारी महिनाही सरासरीपेक्षा उष्ण
सन २०२५ ची सुरुवात उष्ण महिन्यांनी झाली. जानेवारीत सरासरी जागतिक तापमान औद्योगिक पूर्व काळाच्या म्हणजे १८५० – १९०० या काळातील सरासरी तापमानापेक्षा १.७५ अंश सेल्सिअसने जास्त होते, असे युरोपच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने जाहीर केले आहे. ला निना सक्रिय झाल्यानंतरही जगाला तापमान वाढीपासून दिलासा मिळाला नाही. जानेवारी महिना सलग १८ वा उष्ण महिना होता. जागतिक तापमानाने सरासरी १.५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. जगभरातील हवामान शास्त्रज्ञांनी तापमान वाढीपासून सुटका होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. पण, ला निना किंवा एल निनोचे परिणाम प्रत्येक वेळी एक सारखेच होतील, असे नाही. प्रत्येत वेळी प्रदेशनिहाय ला निना आणि एल निनोचे परिणाम भिन्न दिसून येतात.
कमकुवत ला निना प्रभावहीन ठरतोय?
सध्या प्रशांत महासागरात सक्रिय असलेला ला निना कमकुवत आहे. शिवाय सक्रिय होण्यास विलंब झाला आहे आणि फक्त तीन महिनेच सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. कमकुवत ला निना सामान्यतः तापमान आणि पर्जन्यमानाच्या पद्धतींवरही कमी प्रभाव टाकतो. हाच ला निना सप्टेंबर – ऑक्टोंबरमध्ये सक्रिय झाला असता तर थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले असते. जानेवारीत ईशान्य आणि वायव्य कॅनडा, अलास्का, सायबेरिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांसह अंटार्क्टिकामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. अमेरिका, रशियाच्या पूर्वेकडील प्रदेशांमध्ये, अरबी देशांत आणि आग्नेय आशियामध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले आहे. ला निना सक्रिय होऊनही कमकुवत असल्यामुळे तापमान वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी पोषक नाही?
ला निना कमकुवत असल्यामुळे आणि मार्चपर्यंतच सक्रिय राहण्याची शक्यता असल्यामुळे मोसमी पावसावर फारसा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही. ला निना सक्रिय असता तर भारतीय उपखंड, दक्षिण आशियात नैर्ऋत्य मोसमी पाऊस चांगला झाला असता. ला निनामुळे भारतात सामान्यतः चांगला मोसमी पाऊस आणि थंड हिवाळा असतो, तर एल निनोमुळे बहुधा कडक उन्हाळा आणि कमकुवत मोसमी पाऊस असतो. ला निना जागतिक सरासरी तापमान कमी करतो. पण, उशिरा सक्रिय झाल्यामुळे आणि कमकुवत असल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. ला निना काळात नोंदवलेले तापमान एल निनोच्या आधीच्या काळाच्या तापमानापेक्षा जास्त असण्याची यंदाची ही पहिलीच वेळ आहे, असे कोपर्निकस हवामान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. तापमान वाढीमुळे आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे तापमान वाढ जागतिक हवामान बदलाच्या दृष्टीने चिंता बाब ठरली आहे.
dattatray.jadhav@expressindia.com