वाढते वजन अनेकांसाठी त्रासदायक ठरते. हा आजार वेदना देणारा नसला तरी हळू हळू शरीराला आतून कमकुवत करतो. लठ्ठपणामुळे हृदय आणि किडनीवर सर्वात जास्त परिणाम होतो. लठ्ठपणामुळे लिवरवरदेखील सूज येते. डायबिटीज हेदेखील लठ्ठपणाचे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे वाढत्या वजनाला नियंत्रणात आणण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. परंतु, वजन जितके सहज वाढते, तितकेच कमी करण्यासाठी वेळ लागतो. अलीकडच्या वर्षांत वजन कमी करणार्या विविध औषधांचा विकास करण्यात आला आहे. विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये ही औषधे गेमचेंजर ठरत आहेत.
परंतु, ही औषधे अद्याप भारतात व्यावसायिकरीत्या उपलब्ध नाहीत. प्रलंबित मंजुरी आणि परदेशातील वाढत्या मागणीमुळे या औषधी देशात येण्यास विलंब होत आहे. परंतु, आता या औषधींना हिरवा कंदील देण्यात आला असून या औषधी लवकरच भारतात येणार आहेत. काय आहे वजन कमी करणारे ‘टिर्झेपाटाइड’ औषध? लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे औषध कसे कार्य करते? या औषधीचे काही दुष्परिणाम आहेत का? जाणून घेऊ या.
हेही वाचा : Frozen Future मृत्यूनंतर शरीर गोठवण्याचा ट्रेण्ड अब्जाधीशांमध्ये का रूढ होतोय? खरंच माणूस परत जिवंत होणार?
वजन कमी करण्यासाठी मधुमेहावरील औषध
गेल्या आठवड्यात पहिल्यांदा भारताच्या औषध नियामकाच्या तज्ज्ञ समितीने ‘टिर्झेपाटाइड’ या औषधाला हिरवा कंदील दिला, त्यामुळे ‘टिर्झेपाटाइड’ औषधीची निर्माती कंपनी एली लिला लवकरच भारतीय बाजारपेठेत औषध लाँच करण्याच्या तयारीत आहे. २०१७ मध्ये, यूएस फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने ‘डॅनिश फार्मा नोवो नॉर्डिस्क ओझेम्पिक’ला टाईप २ मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्या ‘सेमॅग्लुटाइड’ या औषधाला मान्यता दिली. त्यानंतर अमेरिकेमधील डॉक्टरांना या औषधीमुळे होणारा बदल दिसला. या औषधाच्या सेवनाने लोकांचे वजनही कमी होऊ लागले; ज्यानंतर त्यांनी लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी हे औषध सुचविणे सुरू केले. काही दिवसांनंतर सोशल मीडियावर वजन कमी झालेल्या परिवर्तनांबद्दलच्या पोस्ट्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळल्या.
त्यामुळे नोव्हो नॉर्डिस्कने मधुमेह नसलेल्या लोकांसाठी वजन कमी करणारे औषध म्हणून ‘सेमग्लुटाइड’ला बाजारात आणले. २०२१ मध्ये कंपनीने एफडीएच्या मंजुरीनंतर लठ्ठपणाचा उपचार म्हणून ‘वेगोवी’ आणि ‘सेमग्लुटाइड’ हे दोन इंजेक्शन जारी केले. सध्या वाढत्या मागणीमुळे दोन्ही औषधांचा जागतिक तुटवडा आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये फार्मा कंपनी ‘एली लिली’ला लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी त्यांच्या झेपबाउंड औषधासाठी ‘एफडीए’कडून मंजुरी मिळाली. एली लिली कंपनीच्या टाइप २ मधुमेहावरील औषध ‘मौंजारो’ लाँच झाल्यानंतर अवघ्या वर्षभरानंतर हे औषध लॉंच करण्यात आले. ‘ओझेम्पिक’प्रमाणे ‘मौंजारो’नेदेखील वापरकर्त्यांचे वजन कमी केले. झेपबाउंड आणि मौंजारो या दोन्ही औषधांमध्ये ‘टिर्झेपाटाइड’ हा सक्रिय घटक आहे. जागतिक बाजारपेठेत या दोन्ही औषधींना टंचाईचा सामना करावा लागतो आहे.
सेमॅग्लुटाइड आणि टिर्झेपाटाइड कसे कार्य करते?
‘एफडीए’ने प्रौढांमधील वाढते वजन कमी करण्यासाठी वेगोवी (सेमग्लुटाइड) आणि झेपबाउंड (टिर्झेपाटाइड) ला मान्यता दिली आहे. ही औषधे लठ्ठ (बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त) किंवा जास्त वजन असलेल्या (२७ ते ३० च्या दरम्यान बीएमआय) आणि वजनाशी संबंधित एखादी आरोग्य समस्या (उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा टाइप २ मधुमेह) असल्यावर लिहून दिली जाऊ शकतात. कमी-कॅलरीचा आहार आणि शारीरिक हालचालींबरोबर हे इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला जातो. हा डोस हळूहळू वाढवला जातो.
सेमॅग्लुटाइडसाठी जास्तीत जास्त २.४ मिलीग्राम आणि टिर्झेपाटाइडचा १५ मिलीग्रामपर्यंत डोस दिला जातो. सेमॅग्लुटाइड आणि टिर्झेपेटाइड हे पॉलीपेप्टाइड्स आहेत. त्यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या हार्मोनच्या पातळीला चालना मिळते; ज्यामुळे ग्लुकागॉन पेप्टाइड १ (जीएलपी-१) मेंदू आणि पचनमार्गाद्वारे वजन नियंत्रित करतात. इंजेक्शनद्वारे औषधे शरीराच्या आत सोडली जातात. ही औषधे न्यूरॉन्सद्वारे शरीरात प्रतिक्रिया निर्माण करतात, ज्यामुळे आतड्याचे कार्य बदलते. याचा मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो; ज्यामुळे मज्जासंस्थेचे कार्य सुधारते आणि तृप्ततेची संवेदना वाढते, म्हणजेच काहीही खाल्ल्यानंतर तृप्त झाल्याची आणि पुरेसे खाल्ल्याची भावना निर्माण होते. ही औषधे ग्लुकोजच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यासदेखील मदत करतात; ज्याचा फायदा मधुमेहाच्या रुग्णांना होतो.
जागतिक चाचण्यांमध्ये प्रभावी परिणाम
झेपबाउंडचे जागतिक चाचण्यांमध्ये प्रभावी परिणाम आढळून आलेत. फेज तीन चाचण्यांमध्ये २५३९ सहभागींचा समावेश होता. प्रत्येकाला एकतर प्लेसबो किंवा टिर्झेपाटाइडच्या तीन डोसपैकी एक डोस देण्यात आला. कोणाला पाच ग्रॅम, कोणाला १० ग्रॅम, तर कोणाला १५ ग्रॅम असे डोझ देण्यात आले. ७२ आठवड्यांच्या कालावधीत, पाच मिलीग्रॅम डोस घेतलेल्यांचे वजन सरासरी १५ टक्क्यांनी घटले, १० मिलीग्रॅम डोस घेतलेल्यांचे वजन १९.५ टक्के कमी झाले आणि १५ मिलीग्रॅम डोस घेतलेल्यांचे वजन २०.९ टक्क्यांनी घटले. या डेटाच्या आधारावर झेपबाउंडला भारतात नियामक मंजुरी मिळाली आहे. परंतु, वर नमूद केलेल्या तज्ज्ञ समितीने एक अटही लादली आहे. औषधीचे दुष्परिणाम आणि भारतातील विविध लोकसंख्येमध्ये औषधाची प्रभावीता तपासण्यासाठी कंपनीला चाचणी घ्यावी लागेल.
औषधाचे दुष्परिणाम
कंपनीच्या मते, झेपबाउंडच्या दुष्परिणामांमध्ये मळमळ, अतिसार, उलट्या, बद्धकोष्ठता, ओटीपोटात दुखणे, अपचन, थकवा, ॲलर्जिक प्रतिक्रिया, ढेकर येणे, केस गळणे आणि छातीत जळजळ होणे आदींचा समावेश होतो. एली लिली ही कंपनी विशेषतः थायरॉईड कॅन्सरसह थायरॉईड ट्यूमरचा धोका असल्याचेही सांगते. “मानेमध्ये गाठ किंवा सूज, गिळताना त्रास होणे किंवा श्वास भरून येणे यांसारख्या संभाव्य लक्षणांकडे लक्ष द्या,” अशी ही कंपनी सांगते. एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना मेड्युलरी थायरॉईड कार्सिनोमा (एमटीसी) (थायरॉईड कर्करोग) किंवा मल्टिपल एंडोक्राइन निओप्लाझिया सिंड्रोम प्रकार २ (एमईएन २), हा दुर्मीळ आणि अनुवांशिक विकार होऊ शकतो. झेपबाउंड हे डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येणारे औषध आहे आणि वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर करू नये, असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : जपानमध्ये चक्क हसण्यासाठी कायदा? काय आहे कारण?
औषध बंद केल्यास वजनात पुन्हा वाढ
वजन कमी करण्यासाठी लठ्ठपणाची औषधेदेखील काही चमत्कारिक उपाय नाहीत. चाचण्यांवरील डेटा सूचित करतो की, ही औषधे वजन कमी करण्यासाठी आणि इतर प्रभाव टिकून राहण्यासाठी सतत घेणे आवश्यक आहेत. ३२७ सहभागींसह ‘वेगोवी’च्या पहिल्या चाचणीत ६८ आठवडे ‘वेगोवी’ वापरणाऱ्यांनी १७.३ टक्के वजन घटवले होते. परंतु, औषधोपचार थांबवल्यानंतर, १२० व्या आठवड्यापर्यंत, ‘वेगोवी’ वापरणार्यांचे वजन जैसे थे झाले. उपचाराच्या कालावधीत हृदय आणि पचनाच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्या होत्या, परंतु उपचार थांबविल्यानंतर पुन्हा त्याचा त्रास होऊ लागला.