पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (८ जुलै) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीदरम्यान येथे अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. मिळालेल्या माहितीनुसार- आतापर्यंत येथे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे आठ आणि माकप, काँग्रेस, भाजपा, आयएसएफ यांच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. तर, तृणमूल काँग्रेसने भाजपावर आरोप केले आहेत. केंद्रीय संस्थाच या हिंसाचाराला जबाबदार आहेत, असा दावाही तृणमूलकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये नेमके काय घडत आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंसाचाराच्या घटना का घडत आहेत? हे जाणून घेऊ या ….

भाजपाकडून ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप

केंद्रीय संरक्षण दलाला हिंसाचार रोखण्यात अपयश आले आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर भाजपाचे नेते अनुराग ठाकुर यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी या लोकशाही चिरडण्याचे काम करीत आहेत, अशी घणाघाती टीका केली आहे. हिंसाचाराच्या घटनांमुळे पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनीदेखील जनतेची भेट घेतली. “आपल्या सर्वांसाठीच ही चिंतेची बाब आहे. मतदानाचा दिवस हा लोकशाहीसाठी सर्वांत पवित्र दिवस असतो. निवडणूक ही बंदुकीच्या गोळ्यांद्वारे नव्हे, तर मतपत्रिकेच्या माध्यमातून व्हायला हव्यात,” अशा भावनाही त्यांनी व्यक्त केली.

सैन्य तैनात करण्याचा न्यायालयाचा आदेश

९ जून रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. वाढता हिंसाचार लक्षात घेता, कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणुकीचा निकाल जाहीर करेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सैन्य तैनात करावे, असे निर्देश दिले होते. ११ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील लोकांच्या, तसेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

सध्या पश्चिम बंगालमधील परिस्थिती कशी आहे?

शनिवारी सकाळी ७ वाजता येथे मतदानास सुरुवात झाली होती. मतदान सुरू असानाच हिंसाचारामध्ये तृणमूल काँग्रेसच्या नादिया, मुर्शिदाबाद, मालदा या जिल्ह्यांतील तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. कूचबिहार येथे भाजपाच्या पोलिंग एजंटचाही मृत्यू झाला. पूर्व बर्धमान जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात सीपीआय ( एम) पक्षाचा एक कार्यकर्ता जखमी झाला. नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मुर्शिदाबाद येथे काँग्रेससमर्थक व्यक्ती मतदानाला जात असताना, त्याला ठार करण्यात आले. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार पश्चिम बंगालमधील हिंसाचारामध्ये दोन लहान मुलेदेखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. या छोट्या मुलांनी चेंडू म्हणून एक बॉम्ब हातात घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली.

संवेदनशील भागात ५९ हजार जवान तैनात

दुसरीकडे बीएसएफच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार- पश्चिम बंगालमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), तसेच राज्य सशस्त्र पोलिस दल यांचे एकूण ५९ हजार जवान संवेदनशील भागांत तैनात करण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्ये एकूण ३,३१७ ग्रामपंचायती, ६३ हजार २८३ पंचायती यांच्या जागांसाठीही निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकांसाठी साधारण ५८ हजार ५९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना का घडल्या?

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर केल्यापासूनच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी आमच्या ६० हजार उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी मिळालेला नाही, असा दावा केला होता. तसेच पुरेसा वेळ नाही, असे म्हणत विरोधकांनी या निवडणुकांना थेट विरोध केला होता. तेव्हापासूनच पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

अनेक ठिकाणी हिंसाचार, वाद

भाजपा, काँग्रेस, तसेच डाव्या पक्षांच्या नेत्यांनी, आमच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही, असा आरोप केला होता. तर, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने सबुरीची भूमिका घेत आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या, असे आदेश दिले होते. असे असूनही पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार व वादाच्या घटना घडल्या.

याआधीच्या निवडणुकीत काय स्थिती होती?

पश्चिम बंगालमध्ये याआधी २०१८ साली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्यात आली होती. त्या निवडणुकीत ३४ टक्के जागांवर बिनविरोध निवड झाली होती; तर उर्वरित ९५ टक्के जागांवर तृणमूल काँग्रेस पक्षाने बाजी मारली होती. तेव्हादेखील विरोधकांनी आमच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही, असा आरोप केला होता. या निवडणुकीतही तृणमूल काँग्रेसवर प्रचंड टीका झाली होती. पुढे २०१९ साली लोकसभेची निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत मात्र तृणमूल काँग्रेसला चांगलाच फटका बसला होता आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाने चक्क १८ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाची पश्चिम बंगालमधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

२०२१ सालीही हिंसाचाराच्या घटना

२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीतही तृणमूल काँग्रेसवर निवडणुकीदरम्यान हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला. कोलकाता उच्च न्यायालयाने चौकशीसाठी हे प्रकरण नंतर सीबीआयकडे सोपवले होते.

संस्थांच्या निवडणुकीला महत्त्व का आहे?

२०२४ साली लोकसभा निवडणूक होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच, असा चंग प्रत्येक पक्षाने बांधला आहे. पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकीतील विजयाच्या आधारावर जनतेचा कोणाला पाठिंबा आहे, याचा अंदाज बांधता येणार आहे. याच कारणामुळे या निवडणुकीला जास्त महत्त्व आले आहे. २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपाला धूळ चारली होती.

२०२१ साली तृणमूल काँग्रेसचा विजय

२०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचा बहुमताने विजय झाला होता. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण शक्ती पणास लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अशा बड्या नेत्यांना भाजपाने मैदानात उतरवले होते; मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाला होता. मात्र, तेव्हापासून या पक्षावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांची चौकशी

सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. या पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप आहेत. तृणमूलच्या एका नेत्याला एसएससी घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. कथित महापालिका भरती घोटाळ्याचीही चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. कोळसा घोटाळा, एसएससी घोटाळा या प्रकरणांत तृणमूलचे महत्त्वाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सीबीआयची टांगती तलवार आहे.

११ जुलैला होणार निकाल जाहीर

याच कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि निकालाला खूप महत्त्व आले आहे. हा निकाल ११ जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे.

Story img Loader