‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ अशी एक संकल्पना प्रसिद्ध आहे. परिस्थिती ऐरणीवर आलेली असताना प्रमुख माणूस ते प्राधान्य न मानता दुसरंच काहीतरी करत असतात असा याचा अर्थ होतो. प्राचीन काळी रोम शहराला आग लागली, तेव्हा निरो राजा फिडल हे वाद्य वाजवत बसला होता असं म्हटलं जातं. भारतीय संघ वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. एकेकाळी वेस्टइंडिजचा दौरा म्हणजे भंबेरी उडण्याची खात्री असे. वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्या, आग ओकणारे गोलंदाज, दर्जेदार फलंदाजांची फळी आणि जोडीला चांगलं क्षेत्ररक्षण याची हमी हा संघ देत असे. पण कालौघात वेस्टइंडिज संघाची रयाच हरपली आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी प्रतिकारही दाखवला नाही. घरच्या खेळपट्टीवर त्यांनी पाहुण्या संघासमोर सपशेल नांगी टाकली. क्रिकेटमधल्या सर्वच प्रकारात वेस्ट इंडिजची अधोगती सुरू असताना त्यांचे प्रमुख खेळाडू अमेरिकेत ‘मेजर लीग क्रिकेट’ ही ट्वेन्टी-२० लीग खेळण्यात मश्गुल आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेत सुरू झालेल्या या लीगमध्ये आयपीएलमधल्या संघांचीच मालकी असलेले संघ आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी खेळणारे खेळाडू संघांनी या लीगमध्येही निवडले आहेत. 

आयपीएलच्या धर्तीवर जगभरात अनेक देशांमध्ये ट्वेन्टी-२० लीगचं पेवच फुटलं आहे. अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच मेजर क्रिकेट लीग नावाची ट्वेन्टी-२० लीग सुरू झाली. या लीगमध्ये सहा संघ आहेत. जगभरातले अनेक खेळाडू लीगमध्ये खेळत आहेत. सर्वाधिक संख्या आहे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची. एकीकडे राष्ट्रीय संघाला गरज असताना ही मंडळी मात्र लीग क्रिकेट खेळण्यात दंग आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात सगळं आलबेल असतं तर लीगमध्ये खेळणारे खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसले असते.

अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी निवृत्ती स्वीकारली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या हंगामात ब्राव्हो चेन्नईचा बॉलिंग कोच होता. कोचिंगच्या भूमिकेतून बाहेर पडत ब्राव्हो मेजर लीग क्रिकेट बॅट आणि बॉल दोन्ही आघाड्यांवर चुणूक दाखवत आहे. टेक्सास सुपर किंग्ससाठी खेळताना पहिल्या सामन्यात ब्राव्होने ६ चेंडूत नाबाद १६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर वॉशिंग्टन संघाविरुद्ध खेळताना ब्राव्होने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७६ धावांची वादळी खेळी केली होती. 

हेही वाचा: IND vs WI: “मी जन्मालाही आलो नव्हतो…” वेस्ट इंडिजविरुद्धच्या १००व्या कसोटीआधी रोहित असं का म्हणाला? पाहा Video

आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्स संघातलं एक ओळखीचं नाव म्हणजे कायरेन पोलार्ड. वर्षानुवर्ष मुंबईचा आधारस्तंभ असलेल्या पोलार्डने गेल्यावर्षीच्या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच म्हणून पोलार्ड कार्यरत होता. हाच पोलार्ड वेस्ट इंडिजमधल्या बेटांपासून जवळच असलेल्या अमेरिकेतल्या लीगमध्ये खेळताना दिसतो आहे. पोलार्ड न्यूयॉर्क संघाचा कर्णधारही आहे. काही दिवसांपूर्वीच पोलार्डने घेतलेल्या एका अफलातून झेलची सोशल मीडियावर चर्चा होती. पोलार्डच्या बॅटचा तडाखा प्रतिस्पर्धी संघांना बसला आहे. या स्पर्धेत पोलार्ड नियमितपणे गोलंदाजीही करत आहे. 

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा तडाखेबंद फलंदाज शिमोरन हेटमायर या लीगमध्ये आपल्या बॅटची ताकद दाखवतो आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार, विकेटकीपर निकोलस पूरन या लीगचा अविभाज्य भाग आहे. आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाने पूरनसाठी तब्बल १६ कोटी रुपये खर्च केले होते. पूरनसाठी सध्या वेस्ट इंडिजपेक्षा लीगमधला संघ प्राधान्य आहे. 

ड्रे रस नावाने आंद्रे रसेल प्रसिद्ध आहे. रसेलच्या बॅटचा झंझावात आयपीएल स्पर्धेत सातत्याने दिसतो. कोणत्याही परिस्थितीतून एकहाती मॅच जिंकून देण्याची क्षमता असणारा रसेल या लीगमध्ये खेळतो आहे. रसेलची बॅट तळपते आहे आणि दुखापतीचं ग्रहण असतानाही गोलंदाजीही करतो आहे. 

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा हुकूमी एक्का सुनील नरिन या लीगमधल्या लॉस एँजेलिस संघाचा कर्णधार आहे. किफायतशीर गोलंदाजी हे नरिनचं गुणवैशिष्ट्य. गोलंदाजीच्या बरोबरीने पिंचहिटर म्हणूनही नरिन चमकतो आहे. या स्टार खेळाडूंच्या बरोबरीने डावखुरा फिरकीपटू अकेल हुसैन आणि हेडन वॉल्श लीगमध्ये खेळत आहेत. थोड्या अंतरावर असलेल्या वेस्ट इंडिजमधल्या बेटांवर राष्ट्रीय संघाची दमछाक उडते आहे पण ही मंडळी लीग खेळण्यात व्यग्र आहेत.  

हेही वाचा: IND vs WI: टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाचे टीम इंडियात पदार्पण; १००व्या कसोटीत विंडीजने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

वेस्ट इंडिज हा देश नाही. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या निसर्गरम्य बेटांचा समूह आहे. अँटिगा अँड बारब्युडा, बार्बाडोस, डॉमिनिका, ग्रेनेडा, गयाना, जमैका, सेंट लुसिआ, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडियन्स, त्रिनिदाद अँड टोबॅगो, सेंट किट्स अँड नेव्हिस, अँग्युइला, माँटेसेराट, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, सिंट मार्टेन, युएस व्हर्जिन आयलंड्स अशी  १५ बेटं आहेत. अन्य खेळांमध्ये खेळाडू आपापल्या बेटाचं स्वतंत्र देश म्हणून प्रतिनिधित्व करतात पण क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या झेंड्याखाली सगळ्या बेटांवरचे खेळाडू एकत्र खेळतात. १९२० मध्ये क्रिकेट वेस्ट इंडिजची स्थापना झाली. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी सहा क्रिकेट असोसिएशन्स संलग्न आहेत.

वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू आणि बोर्ड यांच्यात अनेक वर्षांपासून कराराच्या मुद्यावरुन वाद सुरू आहे. बोर्ड आणि खेळाडू यांच्याच बेबनाव असल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने २०१४मध्ये भारत दौऱ्यावर असताना अचानक माघार घेतली आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू जगभरातल्या ट्वेन्टी२० लीगमध्ये खेळून चांगला पैसा कमावतात. लीग स्पर्धेसाठी फारतर दोन महिने द्यावे लागतात. २ महिने खेळून वर्षभराची पुंजी जमा होत असल्याने खेळाडूंसाठी वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघासाठी खेळणं प्राधान्य राहिलेलं नाही. या भागातल्या खेळाडूंना बास्केटबॉल तसंच फुटबॉलचा पर्यायही चांगले पैसे मिळवून देत असल्याने अनेकजण या खेळांची निवड करतात. 

आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आधी खेळणाऱ्या देशाच्या संघाचं राष्ट्रगीत वाजतं. वेस्ट इंडिज हा देश नसल्याने त्यांचा सामना असतो तेव्हा रॅली अराऊंड द वेस्ट इंडिज हे गीत वाजतं. देशासाठी खेळणं हे खेळाडूंसाठी अभिमानस्पद असतं. पण वेस्ट इंडिज हा देश नसल्याने त्यांच्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघासाठी खेळणं भावनिक अस्मितेचा मुद्दा नाही.

दुसऱ्या कसोटीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला वेस्ट इंडिज संघाविषयी विचारण्यात आलं.  रोहित म्हणाला, ‘वेस्ट इंडिजकडे प्रतिभावान खेळाडूंची टंचाई आहे आहे असं मला वाटत नाही. त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. पहिल्या कसोटीतही आम्हाला ते जाणवलं. त्यांच्या क्रिकेटमध्ये अंतर्गत पातळीवर काय सुरू आहे याची मला कल्पना नाही. वेस्ट इंडिजच्या संघाला आम्ही जराही कमी लेखण्याची चूक करत नाही. मी वेस्टइंडिजच्या असंख्य खेळाडूंबरोबर खेळलो आहे. ते नेहमीच संघाच्या विजयात महत्त्वाचं योगदान देतात. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धचा मुकाबला सोपा नक्कीच नाही’. 

रोहितने यजमान संघाचा मान राखला असला तरी पहिल्या कसोटीतली त्यांची कामगिरी यथातथाच राहिली यात शंकाच नाही. पाच दिवसांची कसोटी भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच जिंकली. वेस्ट इंडिजला नामुष्कीच्या डावाने पराभवाला सामोरं जावं लागलं. गेल्या दहा वर्षातली वेस्ट इंडिजची कामगिरी याचं द्योतक आहे. गेल्या दहा वर्षात वेस्ट इंडिजने ८२ कसोटी खेळल्या, यापैकी ४७ मध्ये त्यांचा पराभव झाला. गेल्यावर्षी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी त्यांना पात्र होता आलं नव्हतं. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरी स्पर्धेतही वेस्ट इंडिजची कामगिरी सर्वसाधारण झाली. त्यामुळेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या  विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरु शकला नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies players playing in mlc psp88