ब्रिस्बेन येथील गॅबाच्या मैदानावर यजमान ऑस्ट्रेलियाला नमवणे हे अशक्यप्राय आव्हान मानले जायचे. ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानावर तब्बल ३२ वर्षे अपराजित होता. मात्र, २०२१ मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या गॅबावरील वर्चस्वाला शह दिला होता. भारताच्या या ऐतिहासिक यशाचे अनुकरण आता वेस्ट इंडिजच्या संघाने केले आहे. विंडीजच्या या विजयाचा नायक ठरला वेगवान गोलंदाज शमार जोसेफ. शमारने दुसऱ्या डावात सात बळी मिळवताना ऑस्ट्रेलियाला नामोहरम केले. त्यामुळे विंडीजला दोन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवता आली. विंडीजसाठी तारणहार ठरलेला आणि ऑस्ट्रेलियाला दणाणून सोडणारा शमार जोसेफ कोण आहे व त्याचा इथवरचा प्रवास किती खडतर होता, याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शमार जोसेफ आहे तरी कोण?

कॅरेबियन शैलीचा वेग आणि अचूकता ठासून भरलेला आणखी एक वेगवान गोलंदाज म्हणजे शमार जोसेफ. विंडीजला २७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिला विजय मिळवून देण्याच्या ऐतिहासिक कामगिरीचा तो शिल्पकार ठरला. या कामगिरीने विश्वाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेट पंडितांच्या तोंडी शमारचे नाव येऊ लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपर्यंत क्रिकेटविश्व त्याला ओळखतदेखील नव्हते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पाच गडी बाद केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार पाऊल टाकले. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर शमारने ऑस्ट्रेलियाचा तारांकित फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद केले. इथेच त्याच्या गोलंदाजी शैलीची पहिली छाप पडली.

हेही वाचा : विश्लेषण : सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाची योजना काय? भाविकांना फायदा काय?

शमारची पार्श्वभूमी काय? त्याचा इथवरचा प्रवास प्रेरणादायी का ठरतो?

वेस्ट इंडिजसाठी खेळणे हे शमारचे स्वप्न होते. पण, कौंटुबिक परिस्थिती त्याला या स्वप्नापासून दूर नेत होती. शमार कॅरेबियन समूहातील गयानामधील बाराकारा या छोट्या गावाचा रहिवासी. हा भाग इतका अविकसित की तेथे केवळ दूरध्वनी हेच एकमेव संपर्क माध्यम होते. मोबाइल, इंटरनेट हे या शहराच्या व्यक्तींच्या खिजगणतीतही नव्हते. तिथे जाण्यासाठी बोट हे एकमेव साधन. शमारचे कुटुंब लाकुडतोडीचा व्यवसाय करायचे. क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी शमारने सुरुवातीला चेंडू म्हणून फळांचा वापर केला. पुढे उज्ज्वल भविष्य आणि गरदोर पत्नीची जबाबदारी पार पाडण्यासाठी शमारने बाराकारा सोडून जवळील न्यू ॲमस्टरडॅम येथे राहण्याचा निर्णय घेतला. तिथे बांधकाम मजुरापासून त्याने नोकरीची सुरुवात केली. पुढे तो सुरक्षारक्षक म्हणूनही काम करत होता. त्या ठिकाणी कधी तरी त्याला चेंडू मिळायचा. असाच एकदा सराव करताना महान माजी गोलंदाज कर्टली ॲम्ब्रोजने त्याला पाहिले. तसेच विंडीजचा अष्टपैलू रोमरियो शेफर्डही त्याच्या मदतीला आला. या दोघांनी शमारच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर योग्य प्रशिक्षण घेऊन एका वर्षात शमार प्रथम गयाना संघात आला आणि नंतर विंडीज संघात स्थान मिळवले. ही संधी त्याने अशी काही साधली की आता क्रिकेट पंडित शमारच्या नावाचा घोष करू लागले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमारने केलेली कामगिरी किती खास?

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. पुरेसा अनुभव नसताना शमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. उदरनिर्वाहासाठी इकडे तिकडे भटकणाऱ्या शमारची इच्छाशक्ती जबरदस्त होती. अनेक प्रमुख खेळाडूंनी देशाकडे पाठ फिरवल्यामुळे विंडीज क्रिकेट अडचणीत आले होते. दुबळ्या संघांसमोरही टिकणे विंडीज संघाला कठीण जात होते. अशा वेळी शमारने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विंडीज क्रिकेटला आशेचा किरण दाखवला. पहिल्याच कसोटीत पाच बळी त्याने मिळवले. विंडीजने हा सामना गमावला. मात्र, दुसऱ्या कसोटीत शमार नावाच्या वादळाचे तुफान झाले. ऑस्ट्रेलिया संघ एकट्या शमारसमोर शरण आला. शमारने सात गडी बाद करून विंडीजला २७ वर्षांनी ऑस्ट्रेलियात विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला मायदेशातील मालिकेत विंडीजविरुद्ध प्रथमच बरोबरीवर समाधान मानावे लागले.

हेही वाचा : विश्लेषण : जगात ड्रोनचे महत्त्व वाढण्याचे कारण काय? इराणी ड्रोन किती विध्वंसक? 

विंडीजसाठी हा विजय महत्त्वाचा का?

भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी विंडीज संघ पात्र ठरू शकला नाही. एककाळ क्रिकेटमध्ये दादागिरी करणारा विंडीज संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकापाठोपाठ एकदिवसीय विश्वचषकासाठी अपात्र ठरणे हा मोठा धक्का होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर द्विपक्षीय मालिकेत त्यांची पराभवाची मालिका कायम होती. मानधनाच्या मुद्द्यावरून अनेक खेळाडूंनी विंडीज क्रिकेटकडे पाठ फिरवली. अनेक खेळाडू व्यावसायिक लीगच्या आहारी गेले. अशा वेळी विंडीजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी खेळाडू अक्षरशः गोळा करावे लागले. तब्बल सात खेळाडूंनी या मालिकेत पदार्पण केले. पण, याच खेळाडूंमधून शमारने जणू पुढाकार घेतला आणि विंडीजला एक अलौकिक विजय मिळवून दिला. या विजयाने विंडीजमधील क्रिकेटला नवी दिशा मिळू शकते.

हेही वाचा : अर्थसंकल्प २०२४ : मुलींना सर्वाइकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; लवकरचं सुरु करणार लसीकरण मोहीम, वाचा सविस्तर…

आगामी काळात शमार विंडीजसाठी तारणहार ठरू शकतो का?

या नेत्रदीपक कामगिरीने शमारकडे विंडीज क्रिकेट आशाळभूत नजरेने बघू लागले आहे. शमारमध्ये आता विंडीज क्रिकेटचा तारणहार जाणकारांना दिसू लागला आहे. एककाळ आग ओकणाऱ्या विंडीजच्या गोलंदाजीची झलक शमारने नव्याने दाखवून दिली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यास अपात्र ठरलेल्या विंडीजमधील क्रिकेट आता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ पाहत आहे. शमारचा उदय हा विंडिज क्रिकेटला उभारी देणारा ठरत आहे. त्याची गोलंदाजी किंवा त्याची कामगिरी लक्षात घेता शमार विंडीज क्रिकेटसाठी तारणहार ठरू शकतो. पण, त्याचा उपयोग किती आणि कसा केला जातो यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies shamar joseph success story from lumberjack construction labour to fast bowler print exp css