राखी चव्हाण
देशातील रामसर दर्जा लाभलेल्या पाणथळ जागांच्या संख्येत गेल्या दशकभरात मोठी वाढ झाली असली, तरीही एकूण पाणथळ जागांचा आकार मात्र गेल्या तीन दशकांत आक्रसत गेला आहे. ‘वेटलँड्स इंटरनॅशनल’ या नेदरलँड्सस्थित जागतिक स्तरावरील संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गेल्या ३० वर्षांत भारतातील अनेक पाणथळ जागांनी त्यांचे नैसर्गिक अस्तित्व गमावले आहे. पाणथळ जमीन नष्ट होते, तेव्हा संपूर्ण नैसर्गिक यंत्रणाच कोलमडू लागते. त्यामुळे या जागांचे संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे. नागरीकरणाव्यतिरिक्त, पाणथळ प्रदेश आणि त्यांच्या परिसंस्थेबद्दल ज्ञानाचा अभाव हे व्यापक नुकसानीचे आणखी एक कारण आहे. देशातील पाणथळ जागा ज्या वेगाने नाहीशा होत आहेत, ते पाहता संवर्धन क्षेत्रातून धोक्याचा इशारा दिला जात आहे.
भारतात पाणथळ जमिनी किती?
भारतात सध्या २.२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेली २.२ लाख पाणथळ क्षेत्रे आहेत. याव्यतिरिक्त ५.५ लाख लहान पाणथळीही आहेत. यापैकी जवळपास ६० हजार मोठी पाणथळ क्षेत्रे संरक्षित वनक्षेत्रांत असून ही क्षेत्रे सुरक्षित मानली जाऊ शकतात. उर्वरित, १५० ते २०० पाणथळींच्या संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी श्रीनगरमधील दल सरोवर आणि पंजाबमधील हरीके पाणथळ यांसारख्या काही तारांकित पाणथळींच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत.
३० वर्षांत किती पाणथळ प्रदेश गमावला?
गेल्या ३० वर्षांत भारतातील दर पाच पाणथळ प्रदेशांपैकी जवळपास दोन पाणथळ प्रदेशांनी त्यांचे नैसर्गिक अस्तित्व गमावले आहे, तर ४० टक्के जलस्रोतांतील पाणी जलचरांसाठी प्रतिकूल झाले आहे. दिल्लीजवळील नजफगढ तलाव आणि चेन्नईतील पल्लिकरणाई जलस्रोत वेगाने कोरडे झाले आहेत. मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, गृहनिर्माण योजनांचा विस्तार आणि पर्यायी धोरणांचा अभाव यामुळे पाणथळी कोरडय़ा पडत आहेत.
पाणथळ जमिनीच्या नुकसानीमागील कारणे?
पाणथळ प्रदेश आणि त्यांच्या परिसंस्थेबद्दल ज्ञानाचा अभाव हे व्यापक नुकसानीचे महत्त्वाचे कारण आहे. बहुतेक पाणथळ जागांचा कालांतराने कचरा विल्हेवाटीची ठिकाणे म्हणून दुरुपयोग केला जातो. ओलसर जमिनी सुरक्षित ठेवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणले जातात अथवा या प्रवाहांचा मार्ग बदलला जातो. यावर पूर्णपणे प्रतिबंध लादणे आवश्यक आहे. पायाभूत विकास, गृहनिर्माण योजना, पाण्याचा उपसा पाणथळ जमिनीच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरत आहे.
पाणथळ जागा म्हणजे काय?
पाणथळ जमीन म्हणजे अशी ठिकाणे जिथे जमीन पाण्याने व्यापलेली असते. दलदल, तलाव, समुद्राचे किनारे, वारंवार पूर येणारे सखल भाग या सर्व ओल्या जमिनी पाणथळ स्थळे असतात. नदी, तलाव, सागरी किनारे अशी ठिकाणे उथळ आणि पाण्याने व्यापलेली असतात. त्यावर अनेकविध प्रकारचे गवत आणि झुडपे उगवतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेतीसाठी बांधलेले तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.
पाणथळ प्रदेशाचे महत्त्व काय?
पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती प्रदूषित घटक शोषून घेण्याचे काम करतात. त्यामुळे त्या ठिकाणचे पाणी शुद्ध होण्यास मदत होते. कांदळवनांतील वनस्पती निसर्गात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. भाताची शेते सर्वात मोठी पाणथळ क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. समुद्रकिनारी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे किनाऱ्यांची धूप थांबते. पाणथळ जमीन ही ‘पृथ्वीची फुप्फुसे’ आहेत आणि ती वातावरणातील प्रदूषके स्वच्छ करतात. पाणथळ प्रदेश अनेक पक्षी, प्राणी, कीटकांचा अधिवास असतो.
भूजल पुनर्भरणात पाणथळींचे योगदान काय?
भूगर्भातील पाण्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होऊ लागला आहे. या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानीकारक द्रव्ये अशा प्रदेशांत सोडतो, पण पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती हे दूषित घटक गाळून पाणी शुद्ध करतात. महाराष्ट्रात महत्त्वाचे पाणथळ प्रदेश हे दख्खनच्या पठारावरील नद्या-उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासच्या परिसंस्था आहेत. यामुळे भूजलाचे पुनर्भरण आणि पाझर यात वाढ होण्यात मोलाची मदत होते. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते.
rakhi.chavhan@expressindia.com