अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असं म्हटलं जातं. अन्नाविषयी किंवा एकंदरीतच सगळ्या अन्नपदार्थाशी आपल्या काही ना काही भावना, संवेदना जुळलेल्या असतात. एखादा पदार्थ खूप आवडतो, एखादा खावा लागतो, तर काही पदार्थ नकोसे असतात. मनापासून किंवा आवडीने खाण्याबरोबरच वजन, लाईफ स्टाईल, ट्रेंड्स अशा गोष्टीसुध्दा आपल्या पदार्थांच्या निवडीवर परिणाम करतात आणि मग खाण्याच्या तक्रारी सुरु होतात. शरीरात कॅलरीज वाढल्याने वजन वाढलं असं सांगितलं जातं. मग नेमक्या कॅलरीज वाढतात तरी कशा याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असता. जसं की वाहनं चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेलची गरज असते अगदी तसंच. वेगवेगळी काम करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या उर्जेला कॅलरीज म्हणू शकतो. ही उर्जा आपल्याला आवश्यक खाद्यपदार्थातून मिळते. यासाठी रोजची काम करण्यासाठी विशिष्ट प्रमाणात कॅलरीजचे सेवन करणं आवश्यक आहे. पचन प्रक्रियेत अन्नपदार्थांद्वारे तयार होणारी उष्णता केवळ किलोकॅलरीजमध्ये मोजली जाते. आपण जे काही अन्न खातो ते पचनक्रियेने उष्णता ऊर्जा निर्माण होते. उदाहरणार्थ, एक ग्रॅम प्रथिने पचवल्यास चार कॅलरीज आणि एक ग्रॅम चरबी नऊ कॅलरीज उष्णता निर्माण करते. प्रत्येक व्यक्तीच्या उष्णतेच्या गरजा वेगळ्या असतात. या गरजा त्याच्या शरीराच्या आकारमानानुसार आणि कामानुसार बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वजन सामान्यपेक्षा जास्त वाढू लागते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो त्याच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी वापरत आहे. ही अतिरिक्त उष्णता लठ्ठपणाच्या रूपाने जमा होत आहे. आपल्याला जवळजवळ सर्व प्रकारच्या अन्नातून उष्णता मिळते. एका सामान्य व्यक्तीला रोजच्या जेवणातून सरासरी २१००-२२०० कॅलरीज लागतात. गावाकडे राहणारे लोक जास्त मेहनत करतात किंवा जास्त शारीरिक हालचाल करतात, त्यामुळे त्यांच्या अन्नाच्या कॅलरीजमध्ये थोडा फरक असतो. शहरी भागात सरासरी २१६९ कॅलरीज आणि ग्रामीण भागात २२१४ कॅलरीज असणे आवश्यक आहे. लहान मुलाला ५०० कॅलरीज, आठ वर्षाच्या मुलाला १००० कॅलरीज, तरुणीला १३०० कॅलरीज आणि तरुण मुलाला १५०० कॅलरीज लागतात. सहा तास शारीरिक काम करणाऱ्या व्यक्तीची गरज २७०० कॅलरीजपर्यंत वाढते. प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या तयार केल्या जातात. १०० ग्रॅम गव्हाच्या पिठात ३८० कॅलरीज असतात. २५ ग्रॅम पिठाच्या रोटीमध्ये ९५ कॅलरीज असतात. गव्हाच्या रोट्यावर ३ ग्रॅम तूप लावल्यास ३६ कॅलरीज वाढतात. रोटीमध्ये ९५ + तूप ३६ कॅलरीज = १३१ कॅलरीज देते. एका बाजरीच्या भाकरीमध्ये ११९ कॅलरीज असतात. बेसनाची भाकरी ही पौष्टिकतेची शक्ती मानली जाते. एका बेसनाच्या भाकरीत १५० कॅलरीज असतात.

कॅलरीज कशा मोजतात?
पदार्थाचे उष्मांक मूल्य शोधण्यासाठी म्हणजे त्यातून निर्माण होणारी उष्णता, एक ग्रॅम पदार्थ जाळला जातो. जळल्यामुळे निर्माण होणारी उष्णता कॅलरीमीटर नावाच्या उपकरणाद्वारे मोजली जाते. ही उष्णता त्या पदार्थाचे उष्मांक मूल्य सांगते. उदाहरणार्थ, १२ ग्रॅम कोळसा जाळल्याने ९४ कॅलरी उष्णता निर्माण होते. जर एखाद्या व्यक्तीने असे अन्न घेतले तर शरीरात तितक्या कॅलरी तयार होतात. जर तितक्या कॅलरीज वापरल्या गेल्या नाही तर चरबी वाढते आणि वजन वाढतं.

विश्लेषण: गेल्या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तिपटीने वाढ, जाणून घ्या कारणं

कोणत्या पदार्थात किती कॅलरीज असतात जाणून घ्या

  • १०० ग्रॅम गव्हापासून ३४८ कॅलरीज
  • १०० ग्रॅम माशातून ३०० कॅलरीज
  • १०० ग्रॅम बटाट्यापासून ८३ कॅलरीज
  • १०० ग्रॅम साखरेपासून ३९४ कॅलरीज
  • १०० ग्रॅम बटरमधून ७९३ कॅलरीज
  • १०० ग्रॅम अंड्यातून १५५ कॅलरीज

भाज्यांमध्ये किती कॅलरीज

  • १०० ग्रॅम दुधीत ११ कॅलरीज
  • १०० ग्रॅम कांदा १६ कॅलरीज
  • १०० ग्रॅम पालक २४ कॅलरीज
  • १०० ग्रॅम टोमॅटो २१ कॅलरीज
  • १०० ग्रॅम फरसबी ४४ कॅलरीज

एक ग्लास दुधात किती गॅलरीज

  • गाईचे दूध – १६७.८ कॅलरी
  • नारळाचे दूध – १०३.२ कॅलरी
  • सोयमिल्क -१०९.४ कॅलरी
  • बदाम दूध – १९६.१ कॅलरी
  • मिल्कशेक, जाड चॉकलेट (१ कंटेनर) – ३५७ कॅलरी
  • म्हशीचे दूध – २८५.५ कॅलरी

आपण कोणत्या कारणासाठी अन्नाची निवड करतो हेही तितकंच महत्वाचं. खूप भूक लागल्यावर काहीही खायला चालतं. (हे वाक्य तर सगळ्या आई- आजीच्या तोंडी असतं) थोडी भूक असल्यावर हे नको ते नको चालू होतं, आणि वेळ जावा म्हणून किंवा टीव्ही बघताना टाईमपास म्हणून असेल तर नक्की एम्प्टी कॅलरीज पोटी जातात. त्यामुळे आपली गरज ओळखून भूक लागेल त्याच वेळी खाणे जमले पाहीजे. जेवण झाल्यावरही किंवा पोट भरलेले असतानाही जर तुम्ही आवडीचा पदार्थ वाटीभर किंवा जास्त खाऊ शकत असाल तर तुमचे तुमच्या आहारावर नियंत्रण नाही असे समजा. या सगळ्याची सुरुवात मुख्यत्वे लहानपणी होते. आवडी निवडी, फक्त आवडती भाजी असेल तरच डबा रिकामा, किंवा फावल्या वेळेत गंमत म्हणून काहीतरी खायचं याचं स्वरूप मोठेपणी गंभीर होतं. म्हणून लहानपणापासूनच भूक असेल तरच खाण्याची सवय मुलांना लावायला हवी. नको असताना जबरदस्तीने खायला लावण्याच्या सवयीत बदल व्हायला हवा. पण सगळे पदार्थ खाण्याची मात्र सवय लावली पाहीजे.

आहार असा घ्या..

  • भूक असेल तेव्हाच खा.
  • एकाच वेळी भरपूर जेवू नका.
  • जेवणाच्या वेळा ठरावीक ठेवा.
  • दर तीन-चार तासांनंतर थोडं – असा आहार घ्या.
  • जेवणाच्या सुरुवातीला सॅलड, सूप, भाजी असे पदार्थ जास्त घ्या.
  • सावकाश जेवा.
  • आवडीचा पदार्थ जास्त खाणे टाळा. एका वेळेस थोडंच खा, पुढच्या जेवणात पुन्हा थोडं खा.. त्यावरच जेवण नको.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are calories find out how many calories you need in a day food rmt
Show comments