संपूर्ण देशात बेरियमचे क्षार असलेले फटाके वाजविण्यावर बंदी आहे. मात्र असे असले तरी फटाक्यांमध्ये बेरियमचा वापर काही प्रमाणात करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि आवाज फाउंडेशन यांनी केलेल्या फटाक्यांच्या चाचणीत उघड झाले आहे. दिवाळीनिमित्त दरवर्षी एमपीसीबी आणि आवाज फाउंडेशनतर्फे संयुक्तपणे पर्यावरणपूरक फटाक्यांची आवाज चाचणी केली जाते. त्यामुळे, फटाक्यांची आवाज चाचणी म्हणजे काय, त्यामधील रासायनिक घटक कोणते, यावर बंदी का, यामुळे होणारा त्रास, याचा घेतलेला हा आढावा.

फटाक्यांची चाचणी का केली जाते?

दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण, पर्यावरणाची होणारी हानी आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये पर्यावरणपूरक फटाके निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (‘नीरी’) पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मितीचे निकष निश्चित केले. तसेच, मागील काही वर्षांपासून कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्यांमुळे मुंबईत ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. यामुळे, फटाक्यांचा आवाज नियंत्रणात राहावा, तसेच बाजारात पर्यावरणपूरक फटाक्यांव्यतिरिक्त इतर कोणते फटाके उपलब्ध आहेत का, त्यात कोणते रासायनिक घटक आहेत याची तपासणी करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशन दिवाळीपूर्वी मुंबईत फटाक्यांची चाचणी करीत आहेत.

हे ही वाचा… कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण अधिक श्रीमंत? कोणाची संपत्ती किती?

पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय?

पर्यावरणपूरक फटाक्यांमुळे तुलनेने वायू आणि ध्वनिप्रदूषण कमी होते. हे फटाके सर्वसामान्य फटाक्यांसारखेच दिसतात. त्यात फुलबाजा, स्काय शॉट आदींचा समावेश असतो. पर्यावरणपूरक सुगंधी फटाकेही बाजारात उपलब्ध आहेत. हे फटाके पेटवल्यानंतर त्यामध्ये पाण्याचे कण तयार होतात. परिणामी, या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होते. फटाके जळल्यानंतर तयार होणाऱ्या पाण्याच्या रेणूमध्ये सल्फर आणि नायट्रोजनचे कण विरघळतात.

पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये कोणते घटक?

पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती वेगळ्या पद्धतीने करण्यात येते. आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या तुलनेत पर्यावरणपूरक फटाक्यांमुळे सरासरी ३० ते ४० टक्के कमी प्रदूषण होते, असा दावा विविध संशोधन अहवालांमध्ये करण्यात आला आहे. तसेच, या फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी रसायने नसतात. यामध्ये, ॲल्युमिनियम, बेरियम, पोटॅशियम नायट्रेट आणि कार्बनचा वापर करण्यात येत नाही किंवा त्यांची मात्रा कमी असते. त्यामुळे, वायूप्रदूषणाचा धोका कमी होतो. यापूर्वी, काही ठराविक संस्था पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करीत होत्या. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर या फटाक्यांचे उत्पादन होत आहे. त्यामुळे, सरकारमान्य नोंदणी असणाऱ्या दुकानांमध्ये पर्यावरणपूरक फटाके सहज उपलब्ध होतात. पर्यावरणपूरक फटाके इतर फटाक्यांपेक्षा थोडे महाग आहेत. म्हणजे सर्वसाधारण फटाक्यांची किंमत २५० रुपये असल्यास त्याच प्रकारचे पर्यावरणपूरक फटाके ४०० रुपयांना मिळतात.

हे ही वाचा… विश्लेषण: निज्जर हत्याप्रकरणी कॅनडाचा थेट अमित शहांवर ठपका… आरोपांची राळ, पण पुराव्यांचे काय?

बेरियम म्हणजे काय? ते हानिकारक का?

बेरियम हा पदार्थ रासायनिकदृष्ट्या अस्थिर असतो. यामुळे, तो मूलद्रव्याच्या स्वरूपात सापडत नाही. मात्र, त्याची संयुगे आढळतात व ती अतिशय विषारी असतात. त्यामुळे कंप सुटणे, अशक्तपणा, श्वसनात अडसर, अर्धांगवात यांसारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो. तसेच, डोळे, पचनसंस्था, हृदयक्रिया, श्वसनसंस्था व त्वचेवर बेरियमचे दुष्परिणाम होतात. बेरियममुळे पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या (उलट्या आणि अतिसार), तसेच चेहऱ्याभोवती सुन्नपणा, स्नायू कमकुवत होणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे आजार उद्भवतात.

फटाक्यांमध्ये बेरियमची क्रिया कशी होते?

फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेट सिग्नल फ्लायर म्हणून वापरण्यात येतो. याचा उपयोग फटाक्यांमध्ये प्रणोदक (प्रॉपलेंट) प्रदान करण्यासाठी केला जातो. फटाका फुटल्यानंतर बेरियम नायट्रेटमुळे चमकदार हिरवा प्रकाश बाहेर पडतो. बेरियमचा रंग पांढरा आहे. यामुळे, फटाक्याचा जोरदार स्फोट होतो आणि हिरवा रंगही निर्माण होतो. बेरियम नायट्रेटला ‘कलर स्पार्कलर’ म्हणतात. फटाक्यात क्षारयुक्त तांब्याचा वापर केल्याने निळा रंग येतो आणि लिथियमपासून लाल रंग मिळतो. भारतात २०१८ मध्ये बेरियम तसेच बेरियम क्षारांवर बंदी घालण्यात आली होती. तरीही फटाक्यांमध्ये या रसायनांचा वापर केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय?

सर्वोच्च न्यायालयाने बेरियम आणि प्रतिबंधित रसायनांपासून तयार करण्यात येणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाक्यांवरील बंदीचे निर्देश केवळ दिल्लीतच नाही, तर प्रत्येक राज्यासाठी लागू आहेत, असेही न्यायालयाने हे निर्देश देताना स्पष्ट केले होते. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते. बेरियमचा वापर होत असलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते. त्यामुळे, फटाक्यांमध्ये प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा… विश्लेषण: हवाई दलाची चिंता का वाढतेय?

फटाके आणि वायूप्रदूषण हे समीकरण काय?

मुंबईतील हवेचा दर्जा हा सातत्याने ढासळत आहे. त्यामुळेच, मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबईत रात्री ८ ते १० या वेळेत फटाके वाजवण्याची मुभा गेल्या वर्षी दिली होती. इतर वेळी मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी आहे. हवेतील धुलीकणांचे पीएम २.५ आणि पीएम १० अशा दोन आकारांत वर्गीकरण केले जाते. अडीच मायक्रॉनपेक्षा कमी व्यास असणाऱ्या कणांना पीएम २.५ म्हणतात, तर २.५ ते १० मायक्रॉन एवढा आकार असणाऱ्या प्रदूषकांना पीएम १० म्हणतात. हे कण दिसत नाहीत. त्यामुळे, ते अगदी सहज नाकावाटे किंवा घशामधून शरीरात जातात आणि दमा, हृदयविकार, ब्राँकायटिस आणि श्वसनाचे इतर आजार होऊ शकतात. फटाके फोडल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर पीएम २.५ चे कण हवेत पसरतात आणि ते दीर्घकाळ हवेतच साचून राहातात, जे अपायकारक असतात.