जर्मनीमध्ये असंवैधानिक संघटनांची चिन्हे, वस्तू यांचे प्रदर्शन करण्यावर बंदी आहे. देशात पुन्हा एकदा हिटलरसारखा हुकूमशहा होऊ नये यासाठी तशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. दरम्यान, जर्मनीमध्ये ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ (एएफडी) या पक्षातील एका राजकीय नेत्यावर कायद्याने परवानगी नसलेल्या, तसेच हिटलरच्या नाझी पार्टीशी संबंध असलेल्या चिन्हाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणात या नेत्यावर ३० ऑक्टोबर रोजी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. म्हणूनच हिटलरशी संबंधित चिन्हे, घोषणा, तसेच असंवैधानिक संस्थांच्या बाबतीत जर्मनीमध्ये कोणता कायदा आहे? एएफडी या पक्षातील नेत्यावर काय आरोप आहेत? हे जाणून घेऊ या…
गेल्या आठवड्यात अटकेचे वॉरंट
एएफडी या पक्षाचे २२ वर्षीय नेते डॅनियल हॅलेंबा नुकतेच जर्मनीतील बॅव्हेरियन राज्य विधिमंडळाचे सदस्य झाले. आगामी काही दिवसांत या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार होते. मात्र, या अधिवेशनापूर्वीच डॅनियल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
विद्यार्थी गटाकडून ‘झिक हायल’च्या घोषणा
हॅलेंबा हे बॅव्हेरियन विधिमंडळात निवडून जाणारे सर्वाधिक तरुण नेते होते. जर्मनीतील वृत्तसंस्था ‘डीडब्ल्यू’नुसार ते बर्स्चेनशाफ्ट तेउटोनिया प्राग झू वुर्झबर्ग या विद्यार्थी गटाचे सदस्य होते. या विद्यार्थी गटावरही गेल्या आठवड्यात तपास अधिकाऱ्यांनी छापेमारीची कारवाई केली होती. या विद्यार्थी गटाशी संबंधित परिसरात हिटलरच्या नाझी पार्टीशी संबंधित चिन्हे आणि वस्तू होत्या, असा दावा केला जातोय. याच विद्यार्थी गटातील अन्य चार जणांचीही चौकशी केली जात असून, या गटाकडून झिक हायल (Sieg Heil) अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या जातात. या घोषणा आम्ही ऐकल्या आहेत, असे काही लोकांनी सांगितले आहे.
जर्मनीमध्ये अतिउजवी विचारसरणी असलेल्या नाझी पक्षाचे सदस्य व समर्थक अडॉल्फ हिटलरच्या समर्थनार्थ ‘झिक हायल’ व ‘हायल हिटलर’ अशा घोषणा द्यायचे. या घोषणेसह एक हात वर करून अभिवादन केले जायचे. या घोषणा, तसेच अभिवादन करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हिटलरच्या वांशिक राष्ट्रवादाला बळ मिळाले होते. त्यातून हिटलरच्या व्यक्तिमत्त्वात भरच पडली होती. हिटलरच्या वांशिक राष्ट्रवादी विचारधारेनुसार जर्मनीचे आर्य तथाकथित श्रेष्ठ आहेत, असे म्हटले जायचे. तसेच जर्मनीमध्ये ज्यू, समलैंगिक, अपंग, तसेच अन्य मागासवर्गीय गटांना नष्ट करण्याचे समर्थन केले जायचे.
नाझी चिन्हांबाबत जर्मनीत काय कायदा आहे?
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९३९-४५) झालेला विध्वंस संपूर्ण जगाला ज्ञात आहे. या काळात जर्मनीमध्ये नाझी पार्टीच्या सत्तेत हुकूमशाहा हिटलरच्या आदेशाने लाखो लोकांची हत्या करण्यात आली. ज्यूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे अशा प्रकारच्या हुकूमशाहीचा पुन्हा उदय होऊ नये म्हणून जर्मन सरकारने एक कायदा केला. या कायद्यांतर्गत असंवैधानिक संघटनांची चिन्हे (उदाहरणार्थ नाझी पार्टीशी संबंधित स्वस्तिक), तसेच अन्य बाबी प्रदर्शित करणे कायद्याने गुन्हा आहे.
फोटो शेअर करणे गुन्हा
नाझी पार्टीशी संबंधित असलेल्या स्वस्तिकासोबतचा फोटो किंवा त्याच्याशी संबंधित घोषवाक्य समाजमाध्यमावर शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, डीडब्ल्यूने दिलेल्या एका वृत्तानुसार नाझी पार्टीशी संबंधित चिन्हे आणि घोषवाक्य उच्चारण्यास सरसकट बंदी नाही. करमणूक म्हणून काही गोष्टी दाखवायच्या असतील, तर नाझी पार्टीशी संबंधित घोषवाक्ये तसेच इतर गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच ‘इंग्लोरियस बास्टर्ड्स’ चित्रपटात नाझी पार्टीचे स्वस्तिक, तसेच इतर गोष्टी वापरण्यात आल्या होत्या.
वस्तू जपून ठेवण्यावर बंदी नाही
‘डीडब्ल्यू’च्या एका वृत्तानुसार नाझी राजवटीशी संबंधित चिन्हे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे बेकायदा आहे. मात्र, घरातील तळघरात नाझी राजवटीशी संबंधित असलेल्या वस्तू जपून ठेवण्यावर बंदी नाही.
एएफडी पक्ष काय आहे? विचारधारा काय?
एएफडी पक्षाची स्थापना २०१३ साली झाली होती. या पक्षाकडून युरोपियन युनियन, तसेच देशात येणाऱ्या निर्वासितांना विरोध केला जातो. काही दशकांपासून अफगाणिस्तान, तसेच सीरिया येथून अनेक लोक निर्वासित म्हणून जर्मनीत राहायला येतात. याच निर्वासितांना एएफडी या पक्षाकडून विरोध केला जातो. गेल्या दशकभरापासून जर्मनीत येणारे निर्वासित हा महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनलेला आहे.
निर्वासितांना केला जातो विरोध
अँजेला मर्केल चान्सलर असताना जर्मनीने २०१५ व २०१६ या काळात निर्वासितांना जर्मनीत आश्रयाला येण्यासाठी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली होती. तेव्हापासून उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडून मर्केल यांच्या धोरणाला विरोध केला जातो. एएफडी हा पक्षदेखील उजव्या विचारसरणीचा आहे. याबाबत ‘डीडब्ल्यू’ने एका वृत्तात माहिती दिली होती. या वृत्तानुसार “२०२१ सालच्या निवडणुकीत या पक्षाचे आघाडीचे उमेदवार अॅलिस विडेल यांनी लोकांच्या इमिग्रेशनला विरोध केला होता. तसेच जर्मनीचे इस्लामीकरण केले जात आहे,” अशी टीका विडेल यांनी केली होती.
एएफडी पक्षाकडून नाझी विचारधारेचा पुरस्कार?
अनेक जण एएफडी हा पक्ष नाझी विचारांचा पुरस्कार करतो, असे म्हणतात. काही दशकांत युरोपमध्ये अशा निओ नाझी पक्षांचा उगम झाला आहे. मात्र, एएफडी पक्षाने याला विरोध केला आहे. या पक्षाच्या अनेक नेत्यांवर नाझी विचारांचा पुरस्कार केल्याचा आरोप केला जातो. याच पक्षातील काही नेत्यांची याबाबत चौकशीही सुरू आहे. बोर्न हॉक्के यांच्यावर आपल्या भाषणांत नाझी विचारधारेशी संबंधित असलेल्या घोषणा, वाक्यांचा जाणूनबुजून उल्लेख केल्याचा आरोप आहे. या आरोपाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एएफडी पक्षाला वाढता पाठिंबा
दरम्यान, आम्ही नाझी विचारधारेचा पुरस्कार करीत नाही, असा दावा हा पक्ष करतो. गेल्या काही वर्षांत या पक्षाचा जर्मनीत चांगलाच विस्तार झालेला आहे. या पक्षाला बाव्हेरियाच्या निवडणुकीत १४.६ टक्के मते मिळाली होती. राष्ट्रीय पातळीवर या पक्षाला २० टक्के मते मिळालेली आहेत. त्यामुळे हा पक्ष सध्या जर्मनीमध्ये आपली पाळेमुळे घट्ट करताना दिसतोय.