गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणादरम्यान फोडण्यात येत असलेल्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषणाच्या समस्येने डोके वर काढले आहे. देशातील अनेक राज्यं आणि शहरांमध्ये दिवाळीच्या दिवशी आणि त्यानंतर हवेच्या गुणवत्तेत घट झाल्याचे दरवर्षी दिसून येते. बहुतेक शहरांमध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये धुराचे साम्राज्य निर्माण झाल्याचेही चित्र असते. या समस्येची दखल घेत २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. या फटाक्यांच्या निर्मितीचे काम ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’कडे (NEERI) सोपवण्यात आले होते. या संस्थेकडून पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय?

पारंपारिक फटाक्यांना पर्यावरणपूरक फटाके सुरक्षित पर्याय आहेत, असे ‘सीएसआयआर-नीरी’ संस्थेच्या मुख्य शास्त्रज्ञ साधना रायालू यांनी म्हटले आहे. “तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास पर्यावरणपूरक फटाके सौम्य असतात. पारंपारिक फटाक्यांच्या तुलनेने ते कमी कार्बन सोडतात”, असे रायालू यांनी सांगितले आहे. पारंपारिक फटाक्यांप्रमाणेच पर्यावरणपूरक फटाक्यांमध्येही ‘ऑक्सिडायझर्स’ असतात. केवळ ‘मल्टीफंक्शनल अ‍ॅडिटिव्ह्ज’ मुळे पारंपारिक फटाक्यांपेक्षा पर्यावरणपूरक फटाके वेगळे ठरतात. यामुळे फटाक्यांमधून घातक घटकांचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होते, अशी माहिती रायालू यांनी दिली आहे.

Photos : दिवाळीत स्वयंपाकघर स्वच्छ करताना ‘या’ चुका टाळा!

पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मितीचा फॉर्म्युला गैर-प्रकटीकरण करारात मोडतो. त्यामुळे ‘सीएसआयआर-नीरी’च्या करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या उत्पादकांनाच या फटाक्यांची निर्मिती करण्याची परवानगी आहे. तामिळनाडूच्या सिवाकासी शहरात जवळपास १ हजार उत्पादकांकडून पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती केली जाते. पारंपारिक फटाक्यांमध्ये अल्युमिनियम, बॅरीयम, पोटॅशियम, नायट्रेट आणि कार्बन या घटकांचा वापर केला जातो. या घटकांशिवाय पर्यावरणपूरक फटाके बनवले जातात.

पुणे : दिवाळीतील आतषबाजीसाठी नियमावली ; फटाके विक्री स्टाॅल परिसरात आतषबाजीस मनाई

पर्यावरणपूरक फटाके लवकर विझतात?

पारंपारिक फटाक्यांच्या तुलनेत पर्यावरणपूरक फटाक्यांचे जीवनमान आणि विश्वासाहर्ता कमी असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. या फटाक्यातील रसायनांचा प्रभाव तीन ते सहा महिने चालणार की नाही, याबाबत आम्ही ग्राहकांना ठामपणे सांगू शकत नाही, असे ‘फेडरेशन ऑफ तामिळनाडू फायरवर्क्स ट्रेडर्स’चे अध्यक्ष वी. राजा चंद्रसेकरण यांनी म्हटले आहे. दरम्यान, फटाक्यांच्या साठवणुकीबाबतच्या नियमांचे योग्य पालन केल्यास हे फटाके दीर्घकाळ टिकू शकतात, असा दावा रायालू यांनी केला आहे.

अकोला : यंदा आतषबाजीला महागाईचे ‘फटाके ; किंमतीमध्ये १० ते ४० टक्क्यांपर्यंतची वाढ

पर्यावरणपूरक फटाके निर्मितीचा परवाना कसा मिळतो?

पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मितीचा परवाना मिळवण्यासाठी उत्पादकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी ‘पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’कडून (PESO) उत्पादकांना प्रमाणपत्र घ्यावे लागते. या प्रमाणपत्राची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. प्रतिबंधित रसायनांचा वापर केल्याने आत्तापर्यंत जवळपास १ हजार कारखान्यांनी परवाना गमावला आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मितीत उत्पादकांनी १०० टक्के शुद्ध साहित्य वापरण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन ‘सीएसआयआर-नीरी’च्या शास्त्रज्ञ साधना रायालू यांनी केले आहे. यासाठी उत्पादकांना मदत करण्यासाठी सिवाकासीमध्ये एका विशेष पथकाची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याचे रायालू यांना सांगितले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are green crackers can they reduce air pollution during diwali 2022 advantages of green crackers rvs
Show comments