संरक्षण क्षेत्राला बळकट करण्यासाठी भारत मागच्या काही वर्षांपासून नवी शस्त्रसामुग्री सैन्यदलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. आधुनिक काळात देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कुशल सैनिकांसह अद्ययावत तंत्रज्ञानायुक्त असलेली उपकरणेही फार महत्त्वाची आहेत. जमीन, पाणी आणि आकाशात टेहाळणी करणे, शत्रूचा हल्ला परतावून लावणे यासाठी जगभरात प्रचलित असलेले तंत्रज्ञान भारतात आयात करणे आणि कालांतराने त्याचे भारतातच उत्पादन करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आकाशातही भारताची स्वयंसिद्धता दाखवून देण्यासाठी आता इस्रायलकडून हर्मीस ९०० ड्रोन आयात केले जाणार आहेत. मध्यम उंची (समुद्रसपाटीपासून ३० हजार फूट उंच) आणि दीर्घकाळ सक्रिय राहणारे मानवरहित हवाई वाहन असलेले ड्रोन घेण्याचा करार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय सैन्य दल आणि नौदलासाठी इस्रायलच्या एल्बिट सिस्टिम या कंपनीने तयार केलेले “हर्मीस ९००” हे ड्रोन घेतले जाणार आहे, तर हवाई दलासाठी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने तयार केलेले “हेरॉन एमके २” हे ड्रोन आयात केले जाईल. द हिंदू या दैनिकाने संरक्षण विभागातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, दोन्ही ड्रोन विकत घेण्याबद्दलचा करार पूर्णत्वास आला असून पुढील वर्षी हे ड्रोन भारताच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

हे वाचा >> तंत्रज्ञान : ड्रोन युगात प्रवेश करताना…

फर्स्ट पोस्ट या संकेतस्थळाने हर्मीस ९०० या ड्रोनबाबतची माहिती दिली आहे. हर्मीस ९०० ची क्षमता आणि त्याचा भारतीय सशस्त्र दलात समावेश केल्यामुळे शोध आणि टेहळणी करण्याच्या बाबतीत कशी चालना मिळेल? याबाबत घेतलेला हा आढावा ….

कसे आहे हर्मीस ९०० ड्रोन?

इस्रायलच्या एल्बिट सिस्टिमने हर्मीस ९०० (Hermes 900 MALE UAV) निर्मिती केलेली असून ‘लार्ज मीडियम-रेंज लाँग इन्ड्युअरन्स’ (MALE) या प्रकारातील हे ड्रोन असून सैन्याच्या रणनीती तयार करण्याच्या मोहिमेसाठी याचा वापर केला जातो. दहा ते तीस हजार फूट उंचीवर उडणाऱ्या ड्रोनला लार्ज मीडियम-रेंज ड्रोन म्हटले जाते, तर २४ ते ४८ तास हवेत उडण्याची क्षमता असलेल्या ड्रोनला लाँग इन्ड्युअरन्स म्हणजेच अधिक सहनशक्ती असल्याचे म्हटले जाते.

तांत्रिक तपशीलानुसार, एका उड्डाणातच ३६ तास हवेत राहून काम करण्याची हर्मीसची क्षमता आहे. याद्वारे एकावेळी ३५० किलो वजन वाहून नेता येते. तसेच याची सर्वाधिक उंची ३०,००० फूट इतकी आहे. हर्मीस ९०० मध्ये उच्च कार्यक्षमता असलेले सेन्सर्स, जमीन आणि समुद्रातील लक्ष्यांना हेरण्याची आणि त्यांना भेदण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे.

स्वतःच्या क्षमतांमध्ये वाढ करता येईल, अशी हर्मीस ९०० ची संमिश्र संरचना आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) रेडिओ, रेडिओ रिले आणि मित्र किंवा शत्रू ओळखणे… अशा विमानात वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सुविधा ड्रोनमध्ये वापरण्यात आल्या आहेत. हर्मीस ९०० मध्ये इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि इन्फ्रा-रेड सेन्सर्स वापरण्यात आले असल्यामुळे इस्रायली हवाई दलाचे हे सर्वात प्रभावी शस्त्र ठरत आहे.

हर्मीस ९०० चे ऑपरेशन्स

हिब्रू भाषेत ताऱ्याला देण्यात आलेल्या नावावरून या ड्रोनचे हर्मीस ९०० असे नाव ठेवण्यात आलेले आहे. इस्रायल सशस्त्र दलात २०१२ साली हर्मीसचा समावेश करण्यात आला आणि २०१४ साली हमास विरोधात गाझा येथे झालेल्या युद्धात याचा वापर करण्यात आला. २०१४ साली प्रोटेक्टिव्ह एज ऑपरेशन या नावाने झालेल्या युद्धात दोन हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले होते आणि १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.

हे वाचा >> विश्लेषण: ‘ड्रोन’धारी युद्धनौकांचा वाढता वावर… इराण, इस्रायल आणि तुर्कस्तानच्या ड्रोनना वाढीव मागणी का?

तसेच अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये सप्टेंबर २००० साली झालेल्या दुसऱ्या नागोर्नो-काराबाखच्या युद्धातही याचा वापर करण्यात आला होता. अझरबैजानच्या हर्मीस ९०० ड्रोनला नष्ट केल्याचा दावा अर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी त्यावेळी केला होता. अझरबैजानने मात्र हा दावा फेटाळून लावला.

सध्या इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धातही हर्मीस ९०० हे ड्रोन वापरले जात आहे. गाझा शहरात हमास विरोधात युद्ध लढत असताना हमासचे तळ शोधणे आणि त्यांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोनची मदत घेतली गेली. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार गाझापट्टीतील जमिनीखालील भुयार शोधण्यातही ड्रोनचा वापर केला जात आहे. पॅलेस्टिनी अतिरेक्यांचा खात्मा करणे आणि इतर बाबींना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने हर्मीस ९०० चा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे.

भारताचे सशस्र दल आणखी बळकट

हर्मीस ९०० स्टारलायनर्स विकत घेण्याबाबत भारत आणि इस्रायलदरम्यान करार करण्यात आलेला आहे. स्टारलायनर्स हे ड्रोनचेच दुसरे रूप आहे. हे ड्रोन निःशस्त्र असून प्रामुख्याने गुप्तचर माहिती मिळविणे, पाळत ठेवणे आणि लष्करी टेहळणीसाठी याचा वापर केला जातो. द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार, हेरॉन एमके२ आणि हर्मीस ९०० स्टारलायनर्सचा सशस्त्र दलात समावेश केल्यामुळे भारताची टेहळणी आणि शत्रूवर पाळत ठेवण्याच्या क्षमतेमध्ये निश्चितच वाढ होणार आहे. तसेच लढाऊ हेलिकॉप्टर्सना या ड्रोनची मदत मिळणार असल्यामुळे भारतीय संरक्षण दलाची कामगिरी उंचावणार आहे.

एल्बिट्सच्या विपणन आणि व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष अमीर बट्टेश यांनी सांगितल्यानुसार, लष्करी विमान ज्या भागावरून उड्डाण करण्याचे सहसा टाळते, त्या दाट लोकसंख्या असलेल्या भागावरूनही स्टारलाईन उड्डाण करू शकते. त्यामुळेच लष्करी आणि नागरी या दोन्ही कामांसाठी याचा वापर करता येतो. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) आणि लडाख क्षेत्रामध्ये जिथे अवघड भूभाग आणि प्रतिकूल हवामान परिस्थिती असते, अशा भागात ड्रोनचा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. त्यामुळेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चीनच्या हालचालींवर आता नजर ठेवणे शक्य होणार आहे.

आणखी वाचा >> विश्लेषण : रिपर ड्रोनमुळे भारतीय सैन्यदलांची क्षमता कशी विस्तारणार?

ड्रोन, युद्धाचे नवे शस्त्र

रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास यांच्यादरम्यान चालू असलेल्या युद्धात ड्रोन्स ज्या पद्धतीने वापरले गेले, त्यावरून या नव्या शस्त्राची उपयुक्तता जगातील इतर देशांनाही उमगली आहे.

तेल अविवमधील इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडिजमधील ड्रोन तंत्रज्ञान तज्ज्ञ असलेल्या लिरेन अँटेबी यांनी बीबीसी न्यूजला माहिती देताना सांगले की, ड्रोन्सला गरिबांचे हवाई दल असे संबोधले जाते. कारण ते माहिती गोळा करण्याचा आणि हवेतून अचूक पद्धतीने हल्ला करण्यासाठी स्वस्तातला मार्ग उपलब्ध करून देतात. ही क्षमता पूर्वी फक्त प्रगत राष्ट्रांकडे होती.

युद्ध सज्जतेसाठी ड्रोनची क्षमता आणि महत्त्व भारतालाही उमगले असल्यामुळे भारताने ड्रोन खरेदी करण्याचा तसेच स्वदेशी ड्रोन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी भारताने इस्रायलकडून हेरॉन मार्क २ हे ड्रोन विकत घेतले होते. जून महिन्यात अमेरिकेकडून एमक्यू-९बी रिपर ड्रोन्सही घेतले आहेत.

त्यानंतर जुलै महिन्यात चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर टेहळणी करण्यासाठी स्वदेशी बनावटीचे ९७ ड्रोन विकत घेतले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are hermes 900 drones that india is buying from israel kvg
Show comments