लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (२९ ऑगस्ट) एक व्हिडिओ जारी केला. यात त्यांनी सांगितले की, ‘भारत जोडो’ न्याय यात्रेदरम्यान ते दररोज संध्याकाळी जिउ-जित्सूचा सराव करायचे; ज्यामुळे यात्रेदरम्यान ते राहात असलेल्या ठिकाणी शहरा-शहरांतील तरुण मार्शल आर्ट विद्यार्थी एकत्र आले होते. “आमचे ध्येय तरुणांना या कलेच्या सौंदर्याची ओळख करून देणे होते. आम्ही याद्वारे तरुणांना ध्यान, जिउ-जित्सू, आयकिडो आणि आत्मरक्षा शिकविण्याचा प्रयत्न केला. हे तरुणांमध्ये संवेदनापूर्ण आणि सुरक्षित समाज निर्माण करण्याचे साधन ठरू शकते,” असे त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.
“भारत दोजो यात्रा लवकरच येत आहे,” अशी घोषणाही त्यांनी केली आहे. जपानी भाषेत ‘दोजो’चा अर्थ मार्शल आर्ट्स शिकण्याचे ठिकाण असा होतो. हे काहीसे भारतातील कुस्तीच्या आखाड्यासारखेच असते. राहुल गांधींनी ज्या मार्शल आर्ट्सचा उल्लेख केला आहे, त्याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.
हेही वाचा : भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं, महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वाधिक तणावात; कारण काय?
‘जुजुत्सू’ (जिउ-जित्सू) म्हणजे काय?
हा जपानमधील मार्शल आर्ट्सचा एक प्रकार आहे. यात ‘जू’ चा अर्थ मऊ, लवचिक किंवा सौम्य असा होतो आणि ‘जुत्सू’ म्हणजेच कला किंवा तंत्र. अशाप्रकारे जपानी लोकांनी याचा उच्चार जिउ-जित्सू असा केला आहे. सामान्यतः १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात समुराई काळात जिउ-जित्सूची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. समुराई हा जपानचा योद्धा वर्ग होता; ज्याने १२ व्या आणि १९ व्या शतकादरम्यान महत्त्वपूर्ण राजकीय सत्ता सांभाळली होती. असे मानले जाते की, समुराई योद्ध्यांनी युद्धादरम्यान त्यांची शस्त्रे (प्रख्यात कटाना तलवारी) गमावल्यानंतर विविध कुरघोडी आणि स्व-संरक्षण तंत्र विकसित केले.
सशस्त्र असलेल्या विरोधकांवर हातांनी प्रहार करण्याची ही एक युद्ध कला आहे, जी समुराई युद्धादरम्यान वापरायचे. जिउ-जित्सूमध्ये प्रतिस्पर्ध्याला झेल देऊन नियंत्रित करावे लागते. शारीरिक ताकदीचा वापर न करता प्रतिस्पर्ध्याला हरवणे या कलेचे वैशिष्ट्य आहे. जिउ-जित्सूच्या अनेक शाखा आहेत. कालांतराने, जसजसे जिउ-जित्सू जपान आणि परदेशात लोकप्रिय होत गेले, तसतसा यात अनेक शाखांचा जन्म झाला; ज्याने इतर विविध लढाऊ खेळांना प्रभावित केले. यामध्ये पुढील प्रकार समाविष्ट आहेत:
ज्युडो : ज्युडो हा प्रकार १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जिउ-जित्सूच्या अनेक पारंपरिक शैलींमधून विकसित झाला आणि १९६४ च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये याला स्थान मिळाले.
साम्बो : १९२० च्या दशकात सोव्हिएत रेड आर्मीने विकसित केलेला हा लढाऊ खेळ सैनिकांच्या विना शस्त्र लढण्याची क्षमता सुधारण्यासाठी होता.
ब्राझिलियन जिउ-जित्सू : १९२० च्या दशकात ब्राझिलियन जिउ-जित्सू विकसित केले गेले आणि आज ही सर्वात लोकप्रिय स्व-संरक्षण शैलींपैकी एक आहे. या शैलीत अगदी लहान आणि कमकुवत व्यक्तीही मोठ्या, ताकदवान प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकतो.
मिक्स मार्शल आर्ट्स : मिक्स मार्शल आर्ट्स हा आजचा सर्वात लोकप्रिय लढाऊ खेळ आहे; यात जिउ-जित्सूसह इतर शैलींचा वापर केला जातो.
१९९३ मध्ये पहिल्या युनायटेड फायटिंग चॅम्पियनशिप (यूएफसी) मध्ये रॉयस ग्रेसीच्या कामगिरीनंतर जिउ-जित्सूचे विशेषत: आधुनिक ब्राझिलियन प्रकारात स्वारस्य वाढले. रॉयस ग्रेसीने मोठ्या आणि बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले, ते सुद्धा कोणतीही दुखापत न करता.
‘आयकिडो’ काय आहे?
आयकिडो हा जिउ-जित्सूसारखाच एक लढाऊ प्रकार आहे. मार्शल आर्टिस्ट मोरीहेई उएशिबा यांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला आयकिडो विकसित केले होते. आयकिडोचा शाब्दिक अर्थ आहे ‘ऊर्जेशी संवाद साधण्याचा मार्ग.’ आयकिडो हा इतर मार्शल आर्ट्सपेक्षा वेगळा आहे. आयकिडोमुळे स्वयंशिस्त रुजण्यास मदत होते. यात कोणत्याही आक्रमकतेशिवाय प्रतिस्पर्ध्याची ऊर्जा हाताळण्याची शैली लागते. हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी अनेक दिवस लागतात. अहिंसकपणे संघर्ष संपवणे हे आयकिडोचे ध्येय आहे. यात केवळ स्वतःचा बचाव करणे नव्हे तर प्रतिस्पर्ध्याचे संरक्षण करणे किंवा त्याला दुखापत न करणे हीदेखील कल्पना आहे.
मोरीहेई उएशिबा हे कायम एका वाक्याचा वापर करायचे, ते म्हणजे “खरा विजय, स्वतःवर अंतिम विजय,” याचा अर्थ असा की, आयकिडो अभ्यासकाचे प्राथमिक ध्येय हिंसा किंवा आक्रमकता वाढवण्याऐवजी स्वतःवर मात करणे आहे. त्यामुळे कधीही आयकिडो स्पर्धा होत नाहीत. उलट, प्रशिक्षणार्थी प्रात्यक्षिके करतात आणि त्यांच्या सर्वांगीण मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी अनेक सराव करतात.
हेही वाचा : ‘आयएनएस अरिघात’ आजपासून भारतीय नौदल ताफ्यात! ही आण्विक पाणबुडी भारतीय नौदलासाठी कशी ठरेल किमयागार?
काहींनी आयकिडोच्या मूल्यावर वास्तविक-जगातील लढाईचे तंत्र म्हणून टीकाही केली. आयकिडो अभ्यासक हिंसक स्वरूपाच्या लढाईत स्वतःला नियंत्रित करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, इतरांचे असे म्हणणे आहे की, आयकिडोने अंगीकारलेली कौशल्ये आणि शिस्त केवळ स्वसंरक्षणासाठीच नाही तर जीवनासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. राहुल गांधी हे आयकिडोमधील ब्लॅक बेल्ट आहेत. ब्लॅक बेल्ट मार्शल आर्टमधील तांत्रिक प्रवीणता दर्शवतो.