गेल्या दोन तीन वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागली की मुंबईतील हवेचा दर्जा बिघडतो आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील हवा दिल्लीपेक्षाही वाईट झाली होती. त्यावेळी मुंबई महानगर पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजनांसाठी एक कृती आराखडा तयार केला होता. हिवाळा आला की त्यापाठोपाठ वायू प्रदूषण होते आणि लगेच पालिकेचा कृती आराखडाही बासनातून बाहेर येतो. बांधकामांना नोटिसा द्या, बांधकामांवर बंदी आणा, रस्ते पाण्याने धुवा, शेकोट्यांना बंदी घाला अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र या उपाययोजनांमुळे खरोखरच प्रदूषण नियंत्रणात येते का याबाबतचे हे विश्लेषण ..
प्रदूषण कशामुळे होते?
प्रदूषण होण्यास नैसर्गिक, तसेच मनुष्यनिर्मित घटक कारणीभूत आहेत. हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी होतो आणि तापमान कमी असते. त्यामुळे नैसर्गिक वायूविजन कमी होते. त्याचबरोबर थंडीच्या कालावधीत कोरडे वारे आणि ढगाळ हवामान या कारणांमुळे वायू प्रदूषणात वाढ होते. वातावरणातील बदलांमुळेही मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम झाला असून त्यामुळेही मुंबईतील प्रदूषण वाढले आहे. मुंबईबरोबरच आजूबाजूस ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी या एकूण मुंबई महानगरातच प्रदूषण वाढले आहे. मानवनिर्मित कारणांमध्ये वाहनांमधून होणारे उत्सर्जन, बांधकामांच्या ठिकाणी उडणारी धूळ तसेच स्थानिक हवामान या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून धुरके निर्माण होते.
आणखी वाचा-भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये चीनचा दबदबा? युरोपप्रमाणे भारतीय बाजारपेठेवरही ‘आक्रमण’?
प्रदूषण वाढले हे कसे ओळखतात?
मुंबई महानगर प्रदेशात विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एकूण ४५ वायू गुणवत्ता सनियंत्रण यंत्रे स्थापन आहेत. त्यात मुंबईत एकूण २८ ठिकाणी अशी यंत्रे आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय हवामान खात्याकडून ‘सफर’ संस्थेअंतर्गत, तसेच मुंबई महापालिकेची ही यंत्रे आहेत. या यंत्रांद्वारे वास्तविक वेळेतील हवेची गुणवत्ता मोजली जाते. त्यामुळे वायू प्रदूषित ठिकाणे ओळखण्यास व योग्य उपाययोजना राबवण्यास मदत होते. मात्र अनेकदा वेगवेगळ्या यंत्रांवर वेगवेगळे गुणवत्ता निर्देशांक दाखवले जातात. तसेच काही गुणवत्ता केंद्रे ही अनेकदा कचराभूमी आणि सर्वाधिक वर्दळीच्या वाहतूक नाक्यांवर असतात. त्यामुळे गुणवत्ता निर्देशांक वाढलेला दिसतो. तसेच एखाद्या हवा गुणवत्ता केंद्राच्या परिसरात कोणी कचरा जाळला तरी तेथील स्थानिक हवा गुणवत्ता निर्देशांक वाढलेला दिसतो. दिवसभरातील गुणवत्ता निर्देशांकाची सरासरी काढून त्यानुसार प्रदूषण आहे की नाही हे ओळखले जाते.
प्रदूषणामागे नेमके कारण काय?
मुंबईतील हवेचा स्तर खालावण्यामागे धुळीचे प्रमाण जास्त असणे हे मूळ कारण आहे. ही धूळ बांधकामामुळे निर्माण होत असते. प्रदूषणाला कारणीभूत असलेले जे घटक आहेत त्यात बांधकामातील धूळ ही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कारणीभूत आहे. अन्य कारणांमध्ये वाहनामधून बाहेर पडणारा धूर, कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर, लाकडांवर चालणाऱ्या बेकरीतून बाहेर पडणारा धूर अशी अनेक कारणे आहेत.
आणखी वाचा-विश्लेषण : ‘नीट-यूजी’ यंदाही पेन-पेपर पद्धतीनेच का?
उपाययोजना कोणत्या?
प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने तातडीच्या व दीर्घकालीन अशा उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तातडीच्या उपाययोजनांमध्ये पालिकेने बांधकामाच्या ठिकाणी पालन करण्यासाठी नियमावली आखली आहे. त्या नियमावलीचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पथके तयार केली आहेत. बांधकामाच्या चोहोबाजूनी धूळरोधक हिरवे कापड लावावे, बांधकाम प्रकल्पाभोवती किमा २५ फूट उंचीचा पत्रा लावणे, राडारोड्यावर सातत्याने पाणी फवारणे, राडारोड्याची ने-आण बंदिस्त प्रकारे करणे, वाहनांची चाके धुणे अशी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या बांधकामांना नोटीस दिली जाते. तसेच बांधकाम थांबवण्याचे आदेशही दिले जातात. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बोरिवली पूर्व आणि भायखळा येथील हवा प्रदूषित झाल्यामुळे तेथील सरसकट सर्व बांधकामांवर दोन-तीन दिवस बंदी घातली होती. तसेच पालिकेच्या वतीने रस्ते धुण्याचा उपक्रमही राबवला जातो.
दीर्घकालीन धोरणे कोणती?
दीर्घकालीन धोरणांमध्ये रस्त्यांची सुधारणा करणे, मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, लाकूड व कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या व भट्ट्या यांना वर्षभरात स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याचे पालिकेने ठरवले आहे. प्रदूषणकारी ७७ बेकऱ्या बंद करण्यासाठी कायदेशीर कारवाईही करण्यात येत आहे. लाकडावर आधारित स्मशानभूमी पीएनजी किंवा विद्युत यासारख्या इंधनांवर चालवण्यात येणार आहेत. बेस्टमध्ये विद्युत वाहने विकत घेण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबईतील राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी दोन ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. वायू प्रदूषणाच्या तक्रारींसाठी मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे.
आणखी वाचा-देशातील प्रजनन दर झपाट्याने का घटतोय? हा चिंतेचा विषय आहे का?
उपाययोजना तोकड्या का?
मुंबई महापालिकेने उपाययोजना केलेल्या असल्या तरी त्यापैकी तातडीच्या उपाययोजना या केवळ तात्पुरती मलमपट्टी केल्यासारख्या आहेत. कॉंक्रीटच्या रस्त्यावरून धूळ कमी उडते म्हणून दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. पण एकाच वेळी महानिविदा काढून वर्षभरात ८०० किमीच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबरच मेट्रोचीही कामे सगळीकडे सुरू आहेत. करोना काळानंतर बांधकामाच्या अधिमूल्यात सवलत देण्यात आली होती. त्यामुळे या क्षेत्राला चालना मिळाली. यातून गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू झाली आहेत. अशा प्रकारे सगळीच बांधकामे एकाच वेळी सुरू असल्यामुळे प्रचंड धूळ निर्माण झाली आहे. एखाद्या विभागातील बांधकामे एक-दोन दिवस बंद ठेवल्यामुळे किंवा रोज दीडशे ते दोनशे किमी रस्ते धुतल्यामुळे खरोखर फरक पडतो का, याचे उत्तर सर्वसामान्य माणसालाही देता येईल. गुणवत्ता निर्देशांक कमी झाल्याचे दिसले तरी ज्यांना या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार जडले आहेत त्यांनाच या प्रदूषणाची तीव्रता समजत आहे.
indrayani.narvekar@expressindia.com