Aurora Borealis in India नॉर्दर्न लाइट्स आणि सदर्न लाइट्स हा निसर्गाचा अद्भुत नमुना आहे. नॉर्दर्न लाइट्सला अरोरा बोरेलिस, तर सदर्न लाइट्सला अरोरा ऑस्ट्रेलिस म्हणूनही संबोधले जाते. सामान्यतः अरोरा बोरेलिस स्वीडन, नॉर्वे, फीनलँडसारख्या देशात पाहायला मिळतात. परंतु, पृथ्वीवर धडकलेल्या सौर वादळामुळे शनिवारी पहाटे लडाखमधील हानले गावातही आकाशात रंगीबेरंगी रोषणाईचे दर्शन झाले. या रोषणाईने पाहणार्‍यांचे डोळे दिपून गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील इतर भागातही नॉर्दर्न लाइट्सचे दर्शन घडले. तर, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये सदर्न लाइट्स म्हणजेच अरोरा ऑस्ट्रेलिसचे दर्शन घडले. याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. नॉर्दर्न किंवा सदर्न लाइट्स म्हणजे काय? याची निर्मिती नक्की कशी होते? हे लाइट्स येतात कुठून? हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ या.

नॉर्दर्न लाइट्स आणि सदर्न लाइट्स हा निसर्गाचा अद्भुत नमुना आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : पुतिन यांना रशियाच्या पंतप्रधानपदी मिशुस्तिनच का हवेत; कोण आहेत मिखाईल मिशुस्तिन?

अरोरा म्हणजे काय?

अरोरा मुळात नैसर्गिक प्रकाश आहे. निसर्गातील बदलामुळे आकाशात निळ्या, लाल, पिवळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगांमध्ये प्रकाश किरण दिसून येतात, यालाच अरोरा बोरेलिस म्हणतात. ही प्रकाश किरणे प्रामुख्याने संपूर्ण वर्षभर उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या दोन्ही ध्रुवांजवळ दिसतात. परंतु, काहीवेळा ही प्रकाश किरणे जगाच्या इतर भागातही दिसून येतात. असाच काहीसा अनुभव लडाखच्या हानले गावातही आला. हौशी आकाश निरीक्षकांनी हा दुर्मीळ योग आपल्या कॅमेर्‍यात कैद केला आणि या मनमोहक नजर्‍याचा आनंद लुटला.

याची निर्मिती नक्की कशी होते?

याची निर्मिती सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचालींमुळे होते. या प्रक्रियेत अनेक लहान – मोठे कण प्रामुख्याने इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन अंतरिक्षात फेकले जातात. सौर वारे हे कण घेऊन पृथ्वीच्या कक्षेत येतात. जसजसे सौर वारे पृथ्वीच्या जवळ येऊ लागतात, तसतसे ते ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राद्वारे उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये विभागले जातात. हे एका संरक्षणात्मक ढालसारखे कार्य करते. परंतु, काही कण चुंबकीय क्षेत्रात प्रवेश करतात. हे कण पृथ्वीवरील वायूंबरोबर मिसळल्याने आकाशात हे लाइट्स चक्राकार आणि विविध रंगांच्या रूपात दिसू लागतात. सौर वाऱ्यातील हे कण ऑक्सिजनबरोबर मिसळले जातात, तेव्हा आकाशात हिरव्या रंगाचे तरंग दिसतात आणि हे कण नायट्रोजनबरोबर मिसळल्यास निळ्या आणि जांभळ्या रंगाचे तरंग दिसतात.

नॉर्दर्न लाइट्स आणि सदर्न लाइट्सची निर्मिती सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचालींमुळे होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हे लाइट्स जमिनीपासून साधारणतः ८० ते ५०० किमी उंचीवर असतात. हा दुर्मीळ क्षण प्रत्यक्षात अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते. कारण मोठ्या कालावधीनंतर अशी सौर वादळे तयार होतात. जेव्हा सौर वारे अत्यंत तीव्र असतात, तेव्हा हे लाइट्स मध्यम अक्षांशांपर्यंत विस्तारतात. सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचाली वाढल्यावर सोलर फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शन (CMEs) म्हणजेच सौरस्फोट होतो; ज्यामुळे या वार्‍यांची तीव्रता वाढते. या परिस्थितीत सौर वारे इतके तीव्र असतात की, त्याचा परिणाम भूचुंबकीय वादळात होतो. अशावेळी भूचुंबकीय वादळादरम्यान हे लाइट्स मध्य-अक्षांशांमध्ये दिसून येतात. ही घटना फार दुर्मीळ असते.

सौर वाऱ्यातील कण नायट्रोजनबरोबर मिसळल्यास निळ्या आणि जांभळ्या रंगाचे तरंग दिसतात.(छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : केजरीवालांना जामिनामुळे राजकीय नेत्यांच्या सुटकेबाबत वेगळा विचार होणार?

असेच काहीसे शुक्रवारी घडले. सौरस्फोटामुळे भूचुंबकीय वादळ तयार झाले आणि म्हणूनच अचानक जगाच्या अनेक भागांमध्ये आकाशात रंगांची तरंगे दिसून आली. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने वादळाचे स्वरूप तीव्र असल्याचे म्हटले आणि पुढील दिवसांत आणखी वादळे ग्रहावर धडकू शकतात असेही सांगण्यात आले. भूचुंबकीय वादळे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS), रेडिओ आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन्स, फ्लाइट ऑपरेशन्स, पॉवर ग्रिड्स आणि स्पेस एक्सप्लोरेशनसारख्या अंतराळातील प्रोग्राम्सवरदेखील परिणाम करू शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are northern southern lights aurora rac