अन्वय सावंत
भारतीय संघाशी निगडित कोणताही निर्णय हा चर्चेचा विषय ठरतोच. अनेकदा सामन्यापेक्षा संघनिवडीची चर्चा अधिक रंगते. कोणत्या खेळाडूंची संघात निवड झाली, यापेक्षा कोणाला वगळले, डावलले यावर अधिक लक्ष दिले जाते. आता संघनिवडीची ही अवघड जबाबदारी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरवर असेल. आगरकरची अखिल भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती, काही खेळाडूंची निराशाजनक कामगिरी यामुळे तीन महिन्यांनंतर भारतातच होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघ निवडताना आगरकरला काही अवघड निर्णय घ्यावे लागतील. ही संघनिवड करताना त्याच्यापुढे कोणती आव्हाने असणार याचा आढावा.
आगरकरची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड कशी झाली?
एका वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये चेतन शर्मा भारतीय संघाची निवडप्रक्रिया आणि खेळाडूंबाबत काही वादग्रस्त विधाने करताना दिसले होते. त्यानंतर शर्मा यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि शिवसुंदर दासने हंगामी अध्यक्ष म्हणून काम केले. मात्र, ‘बीसीसीआय’ने काही दिवसांपूर्वी शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. आगरकरने या पदासाठी अर्ज केला आणि त्याला निवड समितीत स्थान मिळाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियमांनुसार, निवड समितीतील सर्वाधिक कसोटी सामने खेळलेल्या सदस्याला अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाते. शिवसुंदरला २३ कसोटी, तर आगरकरला २६ कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आगरकरची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सध्याच्या निवड समितीमध्ये आगरकर आणि शिवसुंदर यांच्यासह सलिल अंकोला, एस. शरथ आणि सुब्रोतो बॅनर्जी यांचा समावेश आहे. आगरकर आणि अंकोला हे मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतात. या समितीत उत्तर विभागाचा एकही प्रतिनिधी नाही. आगरकर गेल्या चार वर्षांतील निवड समितीचा चौथा (यापूर्वी एमएसके प्रसाद, सुनील जोशी, चेतश शर्मा) नवा अध्यक्ष आहे.
आगरकरला निवड समितीत काम करण्याचा कितपत अनुभव आहे?
आगरकरने २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच ११० प्रथमश्रेणी, २७० स्थानिक एकदिवसीय आणि ६२ स्थानिक ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव आगरकरच्या गाठीशी आहे. २००७मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघात आगरकरचा समावेश होता. खेळण्यातून निवृत्ती पत्करल्यानंतर आगरकरने मुंबई संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. ही जबाबदारी सांभाळताना त्याने काही कठोर निर्णय घेण्याचे धाडसही दाखवले होते. त्याने २०१८च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला संघातून वगळले होते. आता भारतीय संघाची निवड करताना असेच काही अवघड निर्णय त्याला घ्यावे लागतील.
एकदिवसीय विश्वचषकासाठी संघनिवड करताना कोणती आव्हाने?
जसप्रीत बुमरा, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांसारखे भारताचे प्रमुख खेळाडू सध्या जायबंदी आहेत. यापैकी पंत विश्वचषकात खेळू शकणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र, अन्य तिघांच्या उपलब्धतेबाबत संभ्रम कायम आहे. विशेषत: राहुल आणि अय्यर यांना झालेल्या दुखापतींमुळे भारतापुढे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाजाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे अव्वल तीन क्रमांकावर खेळणार हे जवळपास निश्चित आहे. पुढील दोन क्रमांकांसाठी सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यात स्पर्धा आहे. तसेच यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर खेळवून विराटला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा पर्याय भारताकडे आहे. राहुल तंदुरुस्त न झाल्यास इशान आणि सॅमसनपैकी एकाला यष्टिरक्षणाची धुरा सांभाळावी लागेल. गोलंदाजीत बुमराबाबत काय निर्णय घ्यायचा याची निवड समितीला सर्वाधिक चिंता असेल. बुमरामध्ये भारताला एकहाती जिंकवून देण्याची क्षमता आहे. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे तो वर्षभरात एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान देण्याचा धोका पत्करायचा का, याचा आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला विचार करावा लागेल.
संघनिवडीत सातत्य पाहायला मिळणार का?
संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यातील मतभेद भारताला नवे नाहीत. अनेकदा संघ व्यवस्थापन म्हणजेच कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या पसंतीनुसार संघनिवड झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनुभवी खेळाडू अपयशी ठरत असले तरी सातत्याने त्यांना संधी देत, युवा खेळाडूंकडे दुर्लक्ष झाल्याचीही अलीकडच्या काळात उदाहरणे आहेत. मात्र, यंदाच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीतील अपयशानंतर निवड समितीने चेतेश्वर पुजारासारख्या अनुभवी खेळाडूला दीड वर्षात दुसऱ्यांदा संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांसारख्या युवकांना कसोटी संघात स्थान दिले. ऋतुराजला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही; पण ‘आयपीएल’मध्ये त्याने चमक दाखवली आहे. मात्र, ‘आयपीएल’मधील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची कसोटी संघात निवड करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आगरकरच्या निवड समितीला आता संघनिवडीत सातत्य आणावे लागेल. तसेच खेळाडूंच्या निवडीचे निकषही निश्चित करावे लागतील.
रोहित, विराट यांच्याबाबत कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात का?
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते. त्यामुळे अपयश आले, तरी त्यांना अन्य खेळाडूंपेक्षा अधिक संधी मिळणे स्वाभाविकच आहे. मात्र, किती काळ? रोहित आणि विराटच्या कामगिरीत पूर्वीसारखे सातत्य नाही. तसेच रोहित ३६, तर विराट ३४ वर्षांचा आहे. त्यामुळे भारताला त्यांच्या पलीकडे कधी तरी विचार करावा लागणार आहे. या दोघांचा सध्या ट्वेन्टी-२० संघासाठी विचार केला जात नाही. एकदिवसीय विश्वचषकानंतर या दोघांबाबत आणखी कठोर निर्णय घेतले जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विशेषत: रोहितच्या तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे लवकरच भारतीय संघाला संक्रमणाच्या काळातून जावे लागेल. सचिन, द्रविड आणि कुंबळे यांसारख्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर पुन्हा नव्याने संघबांधणीचे काम माजी निवड समिती अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरकर आणि संदीप पाटील यांनी चोख केले होते. आता अशीच जबाबदारी आगरकरवरही आहे.