–संदीप नलावडे
रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमिर पुतिन पाचव्यांदा विराजमान होणार आहेत. विरोधकांचा आवाज कठोरपणे दडपून टाकणाऱ्या पुतिन यांना आणखी सहा वर्षे आपला कार्यकाळ वाढविण्याची संधी मिळाली आहे. नाममात्र आव्हानांचा सामना करत पुतिन पुन्हा निवडून आले असले तरी रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होणार असल्याने त्यांच्यासमोर काही आव्हाने आहेत. रशियाचे ‘हुकूमशाही’ नेतृत्व करणाऱ्या पुतिन यांच्यासमोरील आव्हानांविषयी…
रशिया-युक्रेन युद्ध
गेली दोन वर्षे रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरू असून युक्रेनच्या जवळजवळ पाचव्या भागावर नियंत्रण मिळविले आहे. हे युद्ध सहज जिंकू अशी पुतिन यांची अपेक्षा होती, मात्र अद्याप रशियाला या युद्धात फारसे यश मिळालेले नाही. पुतिन यांनी या युद्धासंबंधी प्रादेशिक उद्दिष्टे परिभाषित केली नसली तरी त्यांचे सहयोगी दिमित्री मेदवेदेव यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, रशियाने ओडेसा आणि कीएव्हसह युक्रेनच्या अधिक भागांवर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे युद्ध वाढवायचे की नाही आणि कधी थांबायचे याचा निर्णय पुतिन यांना घ्यावा लागणार आहे. सध्या पुतिन युद्ध चालू ठेवू शकतात. अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणूक निकालाची ते वाट पाहत आहेत. पुतिन वाटाघाटीने या युद्धाची समाप्ती करू शकतात. मात्र पुतिन यांच्या अटींनुसारच या वाटाघाटी झाल्या पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे. युक्रेनने रशियाने काबीज केलेल्या प्रदेशाचे नियंत्रण सोडले पाहिजे, असे पुतिन यांचे म्हणणे असून युक्रेन ते स्वीकारण्यास तयार नाही. त्यांनी अमेरिकेलाही संकेत दिले होते की, त्यांच्या अटींनुसार ते युद्ध गोठवायला तयार आहेत, मात्र अमेरिकेने ते नाकारले.
आणखी वाचा- ‘चकमक फेम’ प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; लखनभैय्या प्रकरण नेमके काय होते?
व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने…
युक्रेनशी युद्ध आणि निर्बंधांमुळे रशियाला व्यापार क्षेत्रात नुकसान सहन करावे लागत आहे. निर्बंध आणि नॉर्ड स्ट्रीम गॅस पाइपलाइन उडवल्यामुळे रशियाने आपला फायदेशीर असलेला युरोपीय ऊर्जा बाजार गमावला. पाश्चात्त्य निर्बंध बोथट करणे आणि व्यापार पुन्हा मार्गी लावणे हे आव्हान पुतिन यांच्यासमोर आहे. रशियाला त्यांची व्यापारी प्रगती पुन्हा मिळविण्यासाठी तीन प्रमुख प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गॅस निर्यात पुन्हा मार्गी लावण्यासाठी तुर्कस्तानमधील नवीन ‘गॅस हब’, चीनला मंगोलियामार्गे रशियातील नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी नवी वाहिनी टाकणे, उत्तर सागरी मार्गाचा विस्तार हे तीन प्रकल्प आहेत. नवीन वाहिनी झाल्यास रशिया चीनला वर्षाला ५० अब्ज घनमीटर नैसर्गिक वायूचा पुरवठा करू शकतो.
आण्विक शस्त्रांचे आव्हान
रशिया आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक आण्विक शस्त्रास्त्रांची संख्या मर्यादित करणारा नवीन ‘स्टार्ट करार’ फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार आहे. जर हा करार संपुष्टात आला तर दोन्ही देश मर्यादेशिवाय त्यांच्या शस्त्रास्त्रांचा विस्तार करू शकतील. त्यामुळे अमेरिकेबरोबर नवीन सुरक्षा आखणी करण्याचे आव्हान पुतिन यांच्यासमोर आहे. रशियाने अनेक नवीन शस्त्र प्रणाली विकसित करण्यावर भर दिला आहे, असे पुतिन यांनी नुकतेच म्हटले होते. अमेरिकेने जर अण्वस्त्र चाचणी केली तर रशियाही अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करू शकेल, असे पुतिन यांनी सांगितले. अमेरिकेबरोबर ‘सामरिक संवाद’ करण्यास आपण तयार आहे, परंतु यात युक्रेनसह रशियाच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या सर्व मुद्द्यांचा समावेश असावा, असे पुतिन यांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा- लष्करात AI ते 5G अन् मशीन लर्निंगपर्यंत सर्व गोष्टींवर संशोधन केले जाणार, STEAG कसे काम करणार?
देशांतर्गत अर्थव्यवस्था…
युक्रेन युद्ध आणि इतर कारणांमुळे रशियाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात कमकुवत झाली आहे. महागाई, कामगार टंचाई आणि लोकसंख्या ही आव्हाने पुतिन यांच्यासमोर आहेत. जानेवारीमध्ये रशियाच्या आर्थिक वाढीमध्ये वार्षिक ४.६ टक्के वाढ झाली. मात्र कामगारांची कमतरता आणि कमी उत्पादकता यांमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. अर्थसंकल्पात सर्वाधिक खर्च संरक्षण आणि सुरक्षा यांमध्ये होत असल्याने शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांवर त्यांचा दुष्परिणाम होत आहेत. ज्या प्रदेशामध्ये संरक्षण उद्योग केंद्रित आहेत, तिथे वेतनावरील खर्च वाढत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी निर्णायक यश मिळविणार या २०१८ च्या आश्वासनाची पूर्तता करण्यात पुतिन अयशस्वी झाले आहेत. ७.६ टक्के असलेला महागाई दर कमी करणे आणि अर्थसंकल्पीय ताण कमी करण्याचे आव्हान पुतिन यांच्यासमोर आहे.
खास वर्गाचे नूतनीकरण
व्लादिमिर पुतिन यांचे वय सध्या ७१ वर्षे आहे. पुतिन यांच्या वर्तुळातील काही प्रमुख व्यक्ती त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. वयोमान अधिक असलेल्यांना काढून नव्या चेहऱ्यांची भरती करण्याचे आव्हान पुतिन यांच्यासमोर आहे. फेडरल सिक्युरिटी बोर्डाचे (एफएसबी) प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह (वय ७२), सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाई पात्रुशेव्ह (वय ७२) आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (वय ७४) यांचे वय अधिक आहे. युक्रेनमधील लष्करी अपयशावर युद्ध समर्थक भाष्यकारांकडून तीव्र टीका होऊनही संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि कर्मचारी विभागाचे प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह (दोघांचेही वय ६८) यांनी पदावर कायम ठेवले आहे. पुतिन यांनी आपल्या पथकातील व्यक्तींच्या सक्षमतेपेक्षा निष्ठा राखण्यावरच भर दिला, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. आपल्यावर निष्ठा असणाऱ्यांना दूर करण्यास पुतिन राजी नसतात.
sandeep.nalawade@expressindia.com