अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्याविरोधात गुरुवारी (१४ सप्टेंबर) बेकायदेशीर अमली पदार्थ वापरत असताना बंदूक खरेदी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. युनायटेड स्टेट्समध्ये बंदूक वापरण्यास परवानगी असली तरी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना अशी परवानगी दिली जात नाही. विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणे, ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. हंटर बायडेन यांच्यावर अमेरिकेच्या डेलवेअर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०१८ साली चुकीची माहिती देऊन शस्त्र मिळवल्याचा आरोप करत हंटर यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हंटर बायडेन यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे विरोधात असलेल्या रिपब्लिकन पक्षाला आयताच विषय मिळाला आहे. हंटर बायडेन यांच्याशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासोबतच राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्याविरोधातही महाभियोग चालवावा, अशी मागणी रिपब्लिकनकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या दाव्यानुसार, राष्ट्राध्यक्ष आपल्या मुलाच्या व्यवसायात गुंतलेले असून त्यांनी सरकारमधील आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर केला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी बाकी असताना या नवीन हालचालीचा निवडणुकीवर काय परिणाम होणार? याबाबत अमेरिकेत जोरदार चर्चा होत आहे.
हे वाचा >> हंटरच्या निमित्ताने बायडेन यांची ‘शिकार’?
हंटर बायडेन यांच्यावर काय आरोप आहेत?
डीडब्लू वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मुलाने कोकेन या अमली पदार्थाचे व्यसन करत असल्याचे मान्य केले होते, तसेच व्यसनाधीनतेच्या काळात त्यांनी शस्त्रखरेदी (हँड गन) केली. वकील आणि व्यावसायिक असलेल्या हंटर बायडेन यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०१८ साली जेव्हा त्यांनी शस्त्र खरेदीसाठी आवश्यक असलेला अर्ज भरला होता, तेव्हा ते अमली पदार्थाचे सेवन करत नव्हते. अमेरिकेत शस्त्रखरेदी करताना अमली पदार्थाच्या सेवनाबाबत खरी माहिती द्यावी लागते. त्यामुळेच आता हंटर यांनी अर्ज भरताना आणि शस्त्र खरेदी केलेल्या दुकानदाराला खोटी माहिती दिली आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगले असा आरोप होत आहे.
यावर्षी जुलै महिन्यात हंटर बायडेन यांची कायदेशीर टीम, यूएस ॲटर्नी आणि विशेष सल्लागार डेव्हिड वेस यांच्यात वाटाघाटी करार झाला होता. विशेष सल्लागार डेव्हिड वेस यांची नियुक्ती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने केली होती. मात्र नंतर काही कारणास्तव हा करार तुटला. हंटर यांचे वकील ॲबे लोवेल यांनी एबीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, हे प्रकरण सुनावणीला येण्यापूर्वीच फेटाळले जाईल.
हंटर बायडेन यांच्यावर इतर कोणते खटले प्रलंबित आहेत?
हंटर बायडेन यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या काळात झालेले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये चार खटले सुरू आहेत. यामध्ये गोपनीय कागदपत्रे अवैधरित्या स्वतःकडे बाळगणे, निवडणूक फंडातील पैशांचा वापर चुकीच्या कामांसाठी (आपल्या विरोधात आरोप करणाऱ्यांचे तोंड गप्प ठेवण्यासाठी) करणे, अशाप्रकारचे काही आरोप आहेत.
तथापि, वरील प्रकरणांमध्ये ट्रम्प यांच्यावरील दोष सिद्ध झाला तरी ते २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकत नाहीत. ट्रम्प यांच्यावर गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे, असे दिसते. आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातून उमेदवार म्हणून ट्रम्प यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
हंटर यांच्यावर दुसरा आरोप आहे की, त्यांनी कर वेळेवर भरलेला नाही. डेव्हिड वेस म्हणाले की, जिथे बायडेन राहतात तिथे वॉशिंग्टन किंवा कॅलिफोर्नियामध्ये हा खटला वर्ग केला जाऊ शकतो. रिपब्लिकन यांच्या आरोपानुसार, हंटर यांच्या व्यवसायाशी संबंधित गुन्हा सर्वात गंभीर आहे, कारण राष्ट्राध्य जो बायडेन यांनी स्वतः यातून नफा कमावला. परंतु या आरोपाचे पुरावे मर्यादित असल्याचे लक्षात आले आहे. २०२० साली दोन रिपब्लिकन सिनेट सदस्यांनी त्यांच्या अहवालात म्हटले होते की, या प्रकरणातून फार काही हाती लागत नाही.
‘द न्यूयॉर्क पोस्ट’ सांयदैनिकाने ऑक्टोबर २०२० मध्ये हंटर बायडेन यांच्याशी संबंधित एक बातमी दिली होती. हंटर यांच्या ‘मॅक बुक प्रो’मधील एका ई-मेलचा दाखला बातमीत देण्यात आला. हंटर यांनी २०१५ साली युक्रेनमधील ‘बुरिस्मा’ या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या अधिकाऱ्यांची तेव्हा उपाध्यक्ष असलेल्या जो बायडेन यांची गाठ घालून दिली होती, असे या बातमीत म्हटले होते. २०१४ ते २०१९ या काळात हंटर बायडेन हे त्या कंपनीचे संचालक होते.
युक्रेनच्या कंपनीची घडामोड ज्या काळातील आहे, त्यावेळी अमेरिकन सरकार युक्रेनमधील कंपन्यांमध्ये असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत करत होते. द इकॉनॉमिस्टच्या वृत्तानुसार, ज्या कंपनीच्या अधिकाऱ्याची जो बायडेन यांच्याशी गाठभेट करून देण्यात आली होती, त्याचीही चौकशी केली जाणार आहे. मात्र ही चौकशी करत असलेल्या युक्रेनियन वकिलाला बायडेन यांनी काढून टाकले. अमेरिकन सरकारद्वारे होत असलेल्या अशा चौकशांचे प्रभारी राष्ट्राध्यक्ष असतात, त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून ही चौकशी थांबवली. तथापि, त्यांच्या निर्णयाचा मुलाच्या व्यावसायिक हितसंबंधाशी कोणताही संबंध असल्याचा पुरावा नाही.
आता पुढे काय?
सीएनएनच्या वृत्तानुसार, जर हंटर बायडेन सर्व प्रकरणात दोषी आढळले तर त्यांना २५ वर्षांपर्यंतचा कारावस आणि जवळपास ७,५०,००० डॉलर्स एवढा दंड ठोठावला जाऊ शकतो. मात्र या प्रकरणात कुणाचा विजय किंवा पराभव होईल, याऐवजी अशाप्रकारचे आरोपच ऐतिहासिक आहेत. कारण याआधी विद्यमान राष्ट्राध्यक्षाच्या मुलावर एवढे आरोप झाले नव्हते. बायडेन यांच्या समर्थकांना मात्र हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा विश्वास वाटतो. तर दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन मतदार ट्रम्प यांच्यावर झालेल्या आरोपांशी याची तुलना करत आहेत. जर बायडेन यांच्यावरील आरोप राजकीय असतील तर तोच न्याय ट्रम्प यांना लागू पडतो, म्हणजे त्यांच्यावरील आरोपदेखील खोटे आहेत, असे रिपब्लिकन समर्थकांचे म्हणणे आहे.
रिपब्लिकन लोकप्रतिनिधींनी ट्रम्प यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याची मागणी लावून धरली आहे. देशद्रोह, लाचखोरी किंवा इतर गंभीर गुन्हे आणि दुष्कृत्यांसाठी राष्ट्राध्यक्षांसह फेडरल अधिकाऱ्यांवर महाभियोग चालविण्याचा अधिकार अमेरिकेच्या राज्यघटनेने लोकप्रतिनिधी सभागृहाला दिला आहे. सभागृहात साध्या बहुमताने महाभियोग चालविण्यास मंजुरी दिल्यानंतर सदर खटला सुरू होऊ शकतो आणि त्यात दोषी ठरल्यास सभागृहातील दोन तृतीयांश बहुमताच्या आधारावर राष्ट्राध्यक्षांना पदावरून दूर करण्याची तरतूद घटनेत आहे. विशेष म्हणजे आजवर एकाही अमेरिकेन राष्ट्राध्यक्षाला अशाप्रकारे पदावरून दूर करण्यात आलेले नाही.