What Are the Most Popular Jobs Worldwide?: गुगल सर्चवर सर्वाधिक नोकरी कोणती शोधली जाते याचा विश्लेषणात्मक अहवाल रेमिटलीने प्रसिद्ध केला आहे. १८६ देशांमधील डेटा विचारात घेऊन २०२४ मध्ये लोकांनी ‘how to become [job title]’ असा शोध किती वेळा घेतला, यावर हा अभ्यास आधारित होता. या विश्लेषणातून पायलट, वकील, पोलीस अधिकारी, फार्मासिस्ट, आणि नर्स या नोकऱ्यांची जागतिक स्तरावरील वाढती मागणी स्पष्ट झाली आहे. याशिवाय, डिजिटल करिअर्स आणि सर्जनशील क्षेत्रांमध्येही लोकांची रुची झपाट्याने वाढत आहे. या अभ्यासाचा उद्देश बदलत्या करिअर ट्रेण्ड्सची ओळख करून देणे आणि विविध क्षेत्रांतील जागतिक आवड दर्शविणे हा आहे.
रेमिटलीने (Remitly) केलेल्या या अभ्यासात १८६ देशांतील गुगल सर्चचं Google Searches विश्लेषण करण्यात आलं. या विश्लेषणातून जगभरातील लोकांना सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात नोकरी हवी आहे ते निदर्शनात आलं. या सर्वेक्षणात २०२४ साली लोकांनी “how to become [job]” (एखादं करिअर कसं निवडावं) हे किती वेळा शोधलं याची पडताळणी करण्यात आली. त्यातून जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या करिअर फिल्ड्स समोर आली. सर्वाधिक शोधली गेलेली नोकरी पायलटची होती. त्यासाठी ४ लाख ३२ हजाराहून अधिक वेळा शोध घेण्यात आला होता. ही नोकरी चेक प्रजासत्ताक, इजिप्त, आणि स्लोव्हाकिया यासारख्या २५ देशांमध्ये सर्वोच्च निवड ठरली.
वकील होणं ही दुसऱ्या क्रमांकाची नोकरी ठरली. त्यासाठी ३ लाख ९३ हजार वेळा शोध घेण्यात आला आणि मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी या क्षेत्रासाठी करिअर म्हणून निवड करण्याची आवड वाढल्याचे दिसले. इतर प्रमुख नोकऱ्यांमध्ये पोलीस अधिकारी (२,७२,००० सर्चेस), फार्मासिस्ट (२,७२,६३० सर्चेस) आणि नर्स (२,४८,७२० सर्चेस) यांचा समावेश आहे. पोलीस सेवेत नोकरी करण्याचा रस मागील दोन वर्षांत ४४०% ने वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे.
डिजिटल करिअरची लोकप्रियता वाढीस
सोशल मीडियाचा सध्याच्या करिअर निवडीवर मोठा प्रभाव आहे. अनेकजण यूट्यूबर होण्याचे स्वप्न पाहतात. यासाठी जागतिक स्तरावर १,७१,००० वेळा याबाबतीत शोध घेण्यात आला. यूट्यूबर या क्षेत्राचा अर्थार्जनाचे साधन म्हणून यूके, सिंगापूर आणि इंडोनेशिया यांसह १३ देशांमध्ये सर्वाधिक शोध घेतला गेला होता. परंतु, २०२२ पासून या करिअरबद्दलचा रस ११% ने कमी झाल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे. इतर डिजिटल करिअर्सकडेही लोकांचे लक्ष वेधले जात आहे. कंटेंट क्रिएटरसाठी ५२ हजार वेळा शोध घेण्यात आला, तर सोशल मीडिया मॅनेजरसाठी ३६ हजार वेळा शोध घेतला गेला. तंत्रज्ञान क्षेत्राकडेही लोकांमध्ये असणारे आकर्षण वाढत आहे. त्यात कोडिंगचा शोध ४८ हजार वेळा घेण्यात आला.
आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सेवांमध्ये मागणी असलेल्या नोकऱ्या
आरोग्यसेवा क्षेत्र हे अद्यापही सर्वाधिक मागणी असलेले क्षेत्र आहे. फार्मासिस्ट ही जागतिक स्तरावर सर्वाधिक शोधली गेलेली आरोग्यसेवा नोकरी ठरली आहे. त्यासाठी २,७२,००० वेळा शोध घेण्यात आला आणि जपानमध्ये ती विशेषतः लोकप्रिय होती. इतर प्रमुख आरोग्यसेवा करिअर्समध्ये फिजिकल थेरपिस्ट (२,४४,००० शोध), शिक्षक (१,७५,०००), आणि डायटिशियन (१,७०,०००) यांचा समावेश आहे. सार्वजनिक सेवांमध्ये, पोलीस अधिकारी होण्याचा विचार सर्वाधिक लोकप्रिय ठरला. ज्यासाठी २,७२,७३० वेळा शोध घेण्यात आला. त्यानंतर नर्सिंग, मिडवाइफरी (प्रसूती परिचारिका) आणि अग्निशामक सेवांसाठी रस दिसून आला. डॉक्टर होण्यासाठी रस वाढला असला तरीही जागतिक स्तरावर नर्सिंग आणि मिडवाइफरी यासाठी अधिक शोध घेतले जात आहेत.
सर्जनशील आणि क्रीडा क्षेत्राची लोकप्रिय अद्याप टिकून
कला आणि मनोरंजन क्षेत्रात अभिनय हे सर्वाधिक शोधले गेलेले सर्जनशील करिअर ठरले आहे. त्यासाठी जवळपास २,००,००० वेळा शोध घेण्यात आला. इतर लोकप्रिय निवडींमध्ये व्हॉइस अॅक्टिंग, डीजेइंग आणि गायन यांचा समावेश आहे. करिअर म्हणून क्रीडा क्षेत्रसुद्धा अनेकांसाठी मोठे स्वप्न आहे. त्यात फुटबॉलपटू कसे व्हावे यासाठी ९५,००० वेळा शोध घेण्यात आला. फिटनेसशी संबंधित पर्सनल ट्रेनर आणि कोच करिअर्ससुद्धा लोकप्रिय होत आहेत. करिअर निवडी कशा बदलत आहेत हे या सर्वेक्षणातून लक्षात येते . पारंपरिक नोकऱ्या जसे की कायदा आणि आरोग्यसेवा क्षेत्र अजूनही लोकप्रिय आहेत, तर सोशल मीडिया आणि डिजिटल भूमिकांकडेही जागतिक स्तरावर लोकांचे लक्ष वेधले जात आहे.
एकुणातच, हा अभ्यास जागतिक पातळीवर बदलणाऱ्या करिअर निवडीच्या ट्रेण्ड्सवर प्रकाश टाकतो. पारंपरिक क्षेत्र जसे की आरोग्यसेवा, कायदा आणि सार्वजनिक सेवा यांची मागणी अजूनही कायम आहे. त्याचवेळी डिजिटल तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि सर्जनशील क्षेत्रांतील नोकऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विविध देशांतील सांस्कृतिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचे प्रतिबिंब या ट्रेण्ड्समध्ये स्पष्टपणे दिसून येते. बदलत्या काळानुसार करिअर निवड अधिक बहुपर्यायी होत असून जगभरातील लोक स्वतःच्या आवडी आणि कौशल्यांनुसार नवे क्षेत्र स्वीकारत आहेत. अशा अभ्यासांमधून जागतिक कामगार बाजारपेठेचा वेगवान प्रवास आणि त्यातील बदल समजण्यास मदत होते.