जागतिक क्रिकेटमधील आघाडीच्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांच्यासह भारताआधी पाकिस्तानचे नाव आवर्जून घेतले जायचे. पाकिस्तानने हनिफ मोहम्मद, इम्रान खान, जावेद मियांदाद, वसीम अक्रम, वकार युनुस, इंझमाम, शाहिद आफ्रिदी यांसारखे नामांकित क्रिकेटपटू घडवले. या प्रत्येकाचे खेळाडू म्हणून काहीतरी वैशिष्ट्य होते. मात्र, आता याचीच उणीव पाकिस्तानला जाणवू लागली आहे. जागतिक दर्जाच्या खेळाडूंची कमतरता, गटबाजी, नेतृत्वाचा अभाव, राजकीय हस्तक्षेप, सततचे प्रयोग या आणि अशा अनेक कारणांमुळे पाकिस्तान संघाची आज मोठी पीछेहाट झाली आहे. पाकिस्तानने एकेकाळी हॉकीविश्वावर वर्चस्व गाजवले होते. मात्र, आता पाकिस्तानात हॉकीचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. आता अशीच परिस्थिती पाकिस्तानातील क्रिकेटची होण्याची भीती माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे.
चॅम्पियन्स करंडकात निराशा
पाकिस्तानला तब्बल २९ वर्षांनंतर एखाद्या जागतिक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी लाभली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मोठा खर्च केला. तीन स्टेडियमचे नूतनीकरण करताना त्यांच्यावर तीन अब्ज कोटी पाकिस्तानी रुपयांचे कर्ज आले. इतके सगळे करूनही प्रत्यक्ष मैदानात पाकिस्तानच्या संघाची कामगिरी मात्र निराशाजनक ठरली. प्रथम न्यूझीलंड, मग पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून हार पत्करावी लागल्याने पाकिस्तानचे आव्हान स्पर्धा सुरू झाल्याच्या चार दिवसांतच संपुष्टात आले. बांगलादेशचा सामंनाही पावसामुळे वाया गेल्यामुळे एकही विजय नोंदवता आला नाही. या गटात पाकिस्तान तळाला फेकला गेला. त्यामुळे निराश झालेल्या चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेटच्या व्यवस्थेत मोठा बदल करण्याची मागणी केली आहे. वसीम अक्रम, वकार युनुसपासून मोहम्मद हाफीज, शोएब मलिक आणि अहमद शहजादपर्यंत अनेक माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानातील विविध वाहिन्यांवरून आपल्या संघावर आणि क्रिकेट मंडळावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
२६ सिलेक्टर, ४ कर्णधार, ८ प्रशिक्षक !
पाकिस्तानने २०१७ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र ‘आयसीसी’च्या स्पर्धांत पाकिस्तानची पाटी कोरीच राहिली आहे. २०२३चा एकदिवसीय विश्वचषक, २०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि आता मायदेशातील चॅम्पियन्स करंडक, अशा ‘आयसीसी’च्या सलग तीन स्पर्धांमध्ये पाकिस्तानला साखळी फेरीचा टप्पा ओलांडता आलेला नाही. पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून विविध प्रयोग केले जात आहेत. गेल्या तीन वर्षांत २६ निवडकर्ते, चार कर्णधार आणि आठ प्रशिक्षक असे बदल पाकिस्तान क्रिकेटने पाहिले. मात्र, मैदानात पाकिस्तान संघ यशापासून दूरच राहिला. त्यामुळेच माजी क्रिकेटपटूंकडून आता मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
हकालपट्टी किंवा राजीनामा, पुन्हा नियुक्ती
पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत अजब प्रकार पाहायला मिळाला आहे. एकाच व्यक्तीची एखाद्या पदावरून हकालपट्टी केली जाते वा ती व्यक्ती स्वतःहून राजीनामा देते आणि काही काळाने पुन्हा तिला त्याच किंवा अन्य एखाद्या पदावर नियुक्त केले जाते. पाकिस्तान संघाचे सध्या अंतरिम प्रशिक्षक असलेले आकिब जावेद आणि साहाय्यक प्रशिक्षक असलेले अझर महमूद यापूर्वीही पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाचा भाग होते. मतभेद किंवा अन्य काही कारणांस्तव त्यांनी आपले पद सोडले होते. मात्र, आता ते पुन्हा पाकिस्तान संघाची सूत्रे सांभाळत आहेत. हे केवळ एक उदाहरण. असाच प्रकार ‘पीसीबी’च्या प्रशासनातही घडत आहे.
राजकीय हस्तक्षेप…
क्रिकेटविश्वातील आघाडीच्या देशांमध्ये त्यांच्या क्रिकेट मंडळांचे अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी निवडणुकीच्या आधारे निवडले जातात. मात्र, पाकिस्तानात सत्तेत असलेला राजकीय पक्ष क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांची नेमणूक करतो. त्या व्यक्तीला क्रिकेट प्रशासनाचा अनुभव आहे किंवा नाही, याने काहीच फरक पडत नाही. ‘पीसीबी’चे विद्यमान अध्यक्ष मोहसीन नक्वी सध्या पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्रीपदही भूषवत आहेत. त्यांना क्रिकेट चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. त्यांनी काही माजी खेळाडूंना आपल्या बरोबर घेतले असून त्यांच्या सल्ल्यानुसारच नक्वी काम करतात, अशी माहिती पाकिस्तानातील माध्यमांकडून देण्यात येते.
नेतृत्वाचा अभाव आणि गटबाजी
पाकिस्तान संघात गटबाजी पूर्वापार चालत आली आहे. मात्र, याचा संघाच्या कामगिरीवर फारसा परिणाम झाला नव्हता याला खंदे नेतृत्व हे प्रमुख कारण होते. इम्रान खान (१९९२ एकदिवसीय) आणि युनुस खान (२००९ ट्वेन्टी-२०) यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धा, तर सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन्स करंडक (२०१७) स्पर्धा जिंकली. हे संघ परिपूर्ण होते असे नाही. मात्र, या तिघांनी अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवला आणि युवकांनाही बरोबर घेतले. मात्र, आताच्या पाकिस्तान संघात याचीच कमतरता दिसून येते. बाबर आझम किंवा मोहम्मद रिझवान यांसारख्या अलीकडच्या कर्णधारांना गटबाजीतून मार्ग काढता आलेला नाही. किंबहुना या अनुभवी खेळाडूंनीच गटबाजीला खतपाणी घातले आणि युवकांना पुढे येऊ दिले नाही, अशी पाकिस्तानी माध्यमांमध्ये टीका केली जाते.
मोठ्या स्पर्धांत बड्यांकडून निराशा
गेल्या काही वर्षांत रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या तारांकित खेळाडूंना लय मिळवण्यासाठी झगडावे लागले आहे. अशीच काहीशी स्थिती बाबर आझम, रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांसारख्या पाकिस्तानच्या खेळाडूंची आहे. मात्र, दोन देशांच्या प्रमुख खेळाडूंमधील मुख्य फरक म्हणजे मोठ्या स्पर्धांत रोहित आणि विराट आपला सर्वोत्तम खेळ करतात. सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानविरुद्ध विराटने केलेली शतकी खेळी हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्याआधी गेल्या वर्षी भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला, त्यात अव्वल आठ संघांच्या फेरीत रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली ४१ चेंडूंत ९२ धावांची खेळीही त्याचे वेगळेपण दाखवण्यासाठी पुरेशी आहे. मात्र, पाकिस्तानच्या तारांकित खेळाडूंना अलीकडच्या काळात अशी एखादी खेळीही करता आलेली नाही.
आर्थिक अडचण
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आता पाकिस्तानात खेळत नाही. याचा ‘पीसीबी’ला मोठा आर्थिक फटका बसत आहे. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटची लोकप्रियता टिकवणेही ‘पीसीबी’ला अवघड जात आहे. तसेच आर्थिक चणचण जाणवत असल्याने ‘पीसीबी’ला पाकिस्तान शाहिन्स अर्थात ‘अ’ संघाला परदेश दौऱ्यावर फारसे पाठवता येत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या युवा खेळाडूंना अन्य देशांत खेळण्याच्या अनुभवाला मुकावे लागत आहे. याच कारणास्तव अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी जुळवून घेणे त्यांना अवघड जात आहे.
संघनिवडीवरून मतभेद
पाकिस्तानात गेल्या काही काळापासून संघनिवडीवरून बरेच मतभेद पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन्स करंडकासाठी निवडलेल्या संघात एक फिरकीपटू आणि एक सलामीवीर कमी आहे, हे आपल्याला कळते पण निवड समितीला कळले नाही, अशी बोचरी टीका वसीम अक्रम आणि मोहम्मद हाफीज यांनी विविध कार्यक्रमांत केली. निवड समितीतील सदस्य संघ व्यवस्थापनाचे मतही विचारात घेत नाहीत असे म्हटले जाते. भारताला २०११चा एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांची गतवर्षी पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, संघनिवडीवरून मतभेद झाल्याने त्यांनी एकाही एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाला प्रशिक्षण देण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. पाठोपाठ जेसन गिलेस्पीनेही कसोटी संघाचे प्रशिक्षकपद सोडले.
शैलीत बदल करण्यास नकार
अन्य संघ आक्रमक शैली आणि निडरपणे खेळण्यास प्राधान्य देत असताना पाकिस्तानचा संघ मात्र जुन्या पद्धतीतच अडकून पडला आहे. आघाडीचे फलंदाज सुरुवातीच्या षटकांत सावध खेळास प्राधान्य देतात. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश येत आहे. आता खेळण्याची शैली न बदलल्यास, तसेच प्रशासकीय पातळीवर सुधारणा न झाल्यास पाकिस्तानातील क्रिकेटही हॉकीप्रमाणेच अपयशाच्या गर्तेत अडकून राहील.