फ्रान्समधील अतिउजव्या पक्षाच्या नेत्या मारीन ल पेन यांना स्थानिक न्यायालयाने निवडणूक लढण्यास बंदी घातल्यामुळे त्या देशात राजकीय भूकंप झाला आहे. तीन वेळा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अयशस्वी ठरलेल्या, मात्र आगामी निवडणुकीत जनमत चाचण्यांमध्ये आघाडीवर असलेल्या ल पेन यांच्यावरील अफरातफरीचा गुन्हा सिद्ध झाला. यामुळे त्यांना आणि त्यांच्या नॅशनल रॅली या अतिउजवी विचारसरणी असलेल्या पक्षाला मोठा फटका बसला आहे. यामागील कारणे खरी की राजकीय, फ्रान्स, युरोप आणि जगाच्या राजकारणावर याचे काय परिणाम होऊ शकतील, याचा वेध.
ल पेन यांच्यावर आरोप काय?
स्वतः ल पेन, त्यांचा पक्ष आणि पक्षाच्या दोन डझन नेत्यांनी मिळून युरोपीय महासंघाच्या तब्बल ६८ लाख डॉलर निधीची अफरातफर केल्याचा आरोप आहे. आपल्या पक्षासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार युरोपीय महासंघाकडून आलेल्या निधीमधून करण्याच्या कटाचा मुख्य स्रोत ल पेन याच होत्या असे फिर्यादी पक्षाचे म्हणणे आहे. ही रक्कम खरे म्हणजे युरोपीय महासंघ पार्लमेंट सदस्यांच्या फ्रान्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दिली गेली होती. मात्र २००४ ते २०१६ अशी तब्बल १२ वर्षे खोट्या कागदपत्रांच्या आधारे पक्षाचे कर्मचारी हे सदस्यांचे कर्मचारी दाखवून दर महिन्याला ३६ हजार डॉलरचा अपहार केला गेला. ज्यांना वेतन दिले गेले, त्यांना महासंघ पार्लमेंट सदस्यांनी कोणतीही कामे दिली नव्हती आणि ते पक्षाचेच काम करीत होते, हे न्यायालयात सिद्ध झाले आणि ल पेन यांच्यासह पक्षाचे अन्य आठ नेत्यांना याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले. युरोपीय महासंघाच्या पार्लमेंटकडून आलेली ही रक्कम स्वतःसाठी नव्हे, तर पक्षासाठी खर्ची घातली, हे फिर्यादींनी मान्य केले असले, तरी अखेर हा भ्रष्टाचारच असल्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
प्रकरण कसे उजेडात आले?
फ्रान्समधील नियतकालिक ‘ल मोन्डे’ने दिलेल्या वृत्तानुसार युरोपीय महासंघाच्या भ्रष्टाचारविरोधी कार्यालयाला (ओलाफ) २०१४च्या सुरुवातीला निनावी सूत्रांकडून फ्रान्समधील या घोटाळ्याची माहिती मिळाली. कार्यालयाने तपास सुरू केला आणि त्याचे धागेदोरे नॅशनल रॅलीच्या सर्वोच्च नेत्या ल पेन यांच्यापर्यंत पोहोचू लागले. त्यांचा स्वतःचा ‘चीफ ऑफ स्टाफ’ आणि त्यांचे अंगरक्षक हे युरोपीय महासंघ सदस्यांचे कर्मचारी असल्याचे भासविण्यात आले होते. २०१५मध्ये प्रत्यक्षात फ्रान्समध्ये या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला. नॅशनल रॅलीच्या मुख्यालयासह अन्य बऱ्याच ठिकाणांवरून ‘ओलाफ’ने हजारो कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांमधून १६ युरोपीय महासंघ संसदपटू आणि २० कर्मचाऱ्यांकडे पक्षाची अधिकृत पदे आणि जबाबदाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले. २०१६ साली ल पेन आणि त्यांच्या पक्षाच्या दोन डझन नेत्यांविरोधात फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी सुरू झाली. या काळात २०१७ आणि २०२३ अशा दोन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये ल पेन यांनी अयशस्वी लढा दिला. नऊ वर्षांच्या चौकशीअंती डिसेंबर २०२३मध्ये ल पेन आणि त्यांच्या पक्षातील २७ जणांविरोधात खटला उभा राहिला.
ल पेन यांची शिक्षेवर प्रतिक्रिया काय?
न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालानुसार ल पेन यांच्यावर निवडणूक बंदी घालण्यात आली. तसेच ल पेन यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली असून यातील दोन वर्षे निलंबित करण्यात आली आहेत. उर्वरित दोन वर्षे नजरकैदेत काढावी लागतील, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. दोषी आढळलेल्या नेत्यांना निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याची मुभा असली, तरी शिक्षेची अंमलबजावणी लगेच होणार असल्याने किमान २०२७ची निवडणूक ल पेन लढू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. न्यायाधीश शिक्षा ऐकवत असताना ल पेन न्यायालयात पहिल्या रांगेत बसल्या होत्या. त्या दोषी आढळल्याचे जाहीर झाल्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र निवडणूक लढण्यावर बंदी घातल्याचे ऐकताच त्या तडकाफडकी उठून निघून गेल्या. त्यावेळी बाहेर असलेल्या प्रसारमाध्यमांशीही त्या बोलल्या नाहीत. कालांतराने एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी “आपला राजकीय मृत्यू व्हावा, यासाठी हे घडवून आणले आहे,” असा आरोप केला. आपल्यासमोर पर्याय खूपच कमी असल्याचे मान्य करतानाच अद्यापही काही कायदेशीर मार्ग निघतो का, हे तपासत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ते शक्य न झाल्यास या अतिउजव्या पक्षाला सत्ताधाऱ्यांविरोधात नवा नेता पुढील दोन वर्षांत उभा करावा लागणार आहे.
नॅशनल रॅली पक्षासमोर पर्याय काय?
ल पेन यांना झालेल्या शिक्षेवर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “जेव्हा मतपेटीतून जिंकता येत नाही, तेव्हा जगभरातील डावे नेते आपल्या विरोधकांना तुरुंगात डांबतात,” अशी प्रतिक्रिया अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर दिली. ल पेन यांच्या नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हीच भावना आहे. एकीकडे २०२७ची निवडणूक लढणे शक्य व्हावे, यासाठी कायदेशीर मार्ग चोखाळत असतानाच पक्षाला पर्यायांचाही विचार करावा लागणार आहे. पक्षाचे नेते जॉर्डन बार्डेला यांचे नाव आघाडीवर आहे. विद्यमान सरकारमधील उजव्या विचारसरणीचे गृहमंत्री, द रिपब्लिकन्स पक्षाचे नेते ब्रूनो रेटालिऊ हेदेखील माक्राँ यांच्या ‘रेनिसान्स’ पक्षाला टक्कर देऊ शकतील. त्यांनी यापूर्वीही अनेकदा पक्ष बदलले आहेत. तिसरा पर्याय आहे ल पेन यांची भाची, पक्षाच्या विद्यमान युरोपीय महासंघ पार्लमेंट सदस्य मारियानो मरेकल यांचेही नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात आहे. मात्र यापैकी कोणत्याच नेत्याकडे ल पेन यांच्यासारखा करिष्मा नाही. याचा फटका पक्षाला बसू शकतो. असे असेल तरी नॅशनल रॅलीकडे निष्ठावंत मतदारांची मोठी फौज असून या निकालाच्या निमित्ताने पक्षाने ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळल्यास याचा फायदाही पक्षाला होऊ शकतो. अर्थात, निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी असल्यामुळे मधल्या काळातील घडामोडीही परिणामकारक ठरू शकतात.
– amol.paranjpe@expressindia.com