राज्यात गत दोन महिन्यांत दूध खरेदी दरात प्रति लिटर पाच रुपयांची वाढ झाली आहे. तरीही पिशवी बंद वितरणासाठी दूध टंचाई जाणवत आहे. शिवाय पुढील महिन्यात खरेदी दरात आणखी एक ते दोन रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी….
राज्यात दूध उत्पादनाची सद्यःस्थिती काय?
उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली. जागतिक बाजारात दूध भुकटी, बटरच्या दरात वाढ झाल्यामुळे गत दोन महिन्यांत दूध खरेदी दर पाच रुपयांनी वाढला. शेतकऱ्यांना सध्या ३३ रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे दूध संकलनात घट होते. यंदा दूध संकलनात फारशी घट झाली नाही. सध्या दररोज सुमारे १ कोटी ७० लाख लिटर दूध संकलन होत आहे. मागील दोन वर्षांत उन्हाळ्यातील संकलन १ कोटी ४० लाख लिटरपर्यंत खाली आले होते. त्या तुलनेत यंदा चांगले संकलन होत आहे. दूध उत्पादन स्थिर आहे. पण, दूध प्रक्रिया उद्योगातून मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध खरेदीत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ३.५ स्निग्धांश आणि ८.५ घन पदार्थ असलेल्या दुधाला १५ जानेवारी पूर्वी २८ रुपये प्रति लिटर दर मिळत होता, तो आता ३३ रुपये मिळत आहे.
पिशवी बंद विक्रीसाठी दुधाचा तुटवडा?
जागतिक बाजारात दूध भुकटी आणि बटरच्या दरात चांगली वाढ झाली आहे. भुकटीचे दर २१० वरून २५० रुपयांवर आणि बटरचे दर ३८० वरून ४३० रुपये प्रति किलोवर गेले आहेत. सध्या दररोज सुमारे १ कोटी १० लाख लिटर दुधाचा वापर भुकटी आणि पावडर उत्पादनासाठी केला जात आहे. त्यामुळे दैनंदिन संकलन १ कोटी ७० लाख लिटर होत असले तरीही १ कोटी १० लाख लिटरचा वापर भुकटी आणि बटर उत्पादनासाठी होत असल्यामुळे घरगुती वापरासाठी किंवा पिशवी बंद विक्रीसाठी दुधाचा तुटवडा जाणवत आहे. सरासरी ८० लाख लिटरची गरज असताना जेमतेम ६० ते ६५ लाख लिटर दूध उपलब्ध होत आहे. त्यामुळे दूध खरेदीत स्पर्धा वाढली आहे.
खरेदी दरात आणखी वाढ?
गत दोन महिन्यांत दुधाच्या खरेदी दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. भुकटी आणि बटरच्या दरवाढीमुळे प्रक्रियेसाठी दुधाची मागणी वाढली आहे. दरवर्षी उन्हाळ्यामुळे आईस्क्रीम, दही, ताक लस्सीची मागणी वाढते. यंदाही मागणीत वाढ होत आहे. त्यात भर म्हणून आता रामनवमी, गुढी पाडवा आदी सण- उत्सवामुळे श्रीखंड, आम्रखंडाच्या मागणीतही वाढ होणार असल्यामुळे प्रक्रिया उद्योगाकडून दूध खरेदीची स्पर्धा वाढून पुढील महिनाभरात खरेदी दरात एक ते दोन रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे.
सरकारी अनुदान किती फायदेशीर?
जागतिक बाजारात बटर, पावडरचे दर कमी झाल्यास दूध दरात मोठी पडझड होते. २०१६ – १७ मध्ये जागतिक दूधाचे दर १७ रुपये प्रति लिटरवर आले होते. यंदा दूध संकलन आजवरच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. राज्यात सरासरी १ कोटी ७१ लाख १८ हजार लिटर दुधाचे संकलन होते. जागतिक पातळीवरही दूध उत्पादनात वाढ झाली आहे. बटर आणि दूध भुकटीच्या दरात घसरण झाल्यामुळे राज्यात दुध खरेदी दर २५ रुपयांवर आले होते. त्यामुळे पहिल्यांदा प्रति लिटर पाच रुपये आणि नंतर प्रति लिटर सात रुपये अनुदान द्यावे लागले होते. पाच रुपये अनुदानाचा लाभ सुमारे ११ लाख दूध उत्पादकांना सुमारे ६९१ कोटी रुपयांचे आणि सात रुपयांचे अनुदान सुमारे सहा लाख दूध उत्पादकांना ६२० कोटी रुपयांचे अनुदान देय आहे. त्यापैकी ५३८ कोटींचे अनुदान वितरित केले असून, १५३ कोटींचे अनुदानाचे वितरण (१७ मार्च २०२४) पासून सुरू झाले आहे. जागतिक बाजारात बटरचे दर ४०० रुपये किलो आणि दूध भुकटीचे दर २६० ते २७० रुपयांवर राहिल्यास सरकारी अनुदानाची गरज भासत नाही. पण, दरात घसरण झाल्यावर प्रक्रियेसाठी दुधाची मागणी कमी होऊन अतिरिक्त दूधाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी भुकटी, बटर निर्यातीसाठी किंवा भुकटी, बटर प्रक्रियेसाठी अनुदान द्यावे लागते. यावेळी राज्य सरकारने उद्योगाला अनुदान न देता थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
dattatray.jadhav@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd