केवळ भारतातच नव्हे, तर सुमारे ६५ देशांत विविध कारणांमुळे शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत. त्या विषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील किती देशांत शेतकरी आंदोलने?

आफ्रिकेतील १२, आशियातील ११, युरोपातील २४, उत्तर,  मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील मिळून २८, तसेच ऑस्ट्रेलिया आणि शेजारील देशांत आंदोलन सुरू आहे. आंदोलने सुरू असलेले बहुतेक देश आर्थिक संकटांशी झुंजत आहेत. त्या-त्या देशातील अर्थव्यवस्था अडचणींचा सामना करीत आहेत. शेतकरी शेतीमालाच्या निर्यातीचे दर कमी करण्याची मागणी करीत आहेत. अर्जेंटिनामध्ये भीषण दुष्काळ पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. ब्राझीलमध्ये शेतीमालाच्या दरातील अनुचित स्पर्धेमुळे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. व्हेनेझुएलामध्ये डिझेलच्या वाढलेल्या किमतींविरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. कोलंबियातील शेतकरी भाताला चांगला दर मिळत नसल्यामुळे निदर्शने करीत आहेत.

युरोपला शेतकरी आंदोलनाची सर्वाधिक झळ?

युरोपात सुमारे ५० देश आहेत. त्यांपैकी २४ देशांत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, वाढलेला उत्पादन खर्च, कमी किमतीत होत असलेली शेतीमालाची आयात, युरोपियन युनियनच्या वतीने लागू करण्यात आलेले नवे पर्यावरणीय नियम आदी कारणांमुळे शेतकरी युरोपात रस्त्यांवर उतरले आहेत. फ्रान्समधील शेतकऱ्यांनी कमी दरात होत असलेली आयात थांबवण्याची मागणी करीत शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केली आहे. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात झालेल्या दरवाढीच्या विरोधात निदर्शने करीत आहेत.

हेही वाचा >>>कमलनाथ भाजपाच्या वाटेवर, पण १९८४ च्या दंगलीमुळे अडचण; वाचा ४० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

उत्तर आणि मध्य अमेरिकेतील स्थिती काय?

शेतकरी आंदोलनाची झळ उत्तर आणि मध्य अमेरिकेतील देशांनाही बसली आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातील ३५ टक्के देशांत आंदोलने सुरू आहेत. मेक्सिकोतील शेतकरी मक्का आणि गव्हाला मिळणाऱ्या कमी किमतीमुळे निदर्शने करीत आहेत. मेक्सिकोमधील शेतकरी दुष्काळाचाही सामना करीत आहेत. कोस्टारिकामधील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. संपूर्ण शेती उद्योग मोठ्या कर्जाखाली दबला आहे. अमेरिकेला पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाविरोधात मोक्सिकोमधील शेतकरी सरकारविरोधात निदर्शने करीत आहेत.

आफ्रिकेत शेतीमालाला योग्य दर मिळेना?

आफ्रिकेतील २२ टक्के देशांत शेतकरी आंदोलने सुरू आहेत. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात झालेल्या वाढीच्या तुलनेत शेतीमालाला चांगला, पुरेसा दर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. केनियात बटाट्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. बेनिनमध्ये कोको उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जमिनी काढून घेतल्या जात असल्यामुळे ते आंदोलन करीत आहेत. कोकोची शेती नष्ट केली जात आहे. या जमिनी सरकार परदेशी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. कॅमेरून आणि नायजेरियातील शेतकरी कोकोच्या निर्यातबंदीविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. केनियातील शेतकरी ऊस आणि चहाला योग्य दर मिळत नसल्याची तक्रार करीत आहे.

हेही वाचा >>>रशियन सैन्याकडून युद्धात स्टारलिंकचा वापर? युक्रेनचा गंभीर आरोप, एलॉन मस्कची भूमिका काय? वाचा सविस्तर…

आशियातील किती देशांत शेतकरी आंदोलने?

आशिया खंडात भारतासह २१ टक्के देशांत शेतकरी आंदोलने सुरू आहेत. भारतातील नऊ राज्यांत आंदोलने सुरू आहेत. दिल्लीतील आंदोलनामुळे शेतकरी आंदोलनाची धार वाढली आहे. नेपाळमध्ये भारतातून स्वस्त दरात भाजीपाला आयात होत असल्यामुळे नेपाळमध्ये उत्पादित भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे नेपाळमध्ये आंदोलन झाले आहे. नेपाळसह मलेशियामध्ये उसाला आणि भाताला योग्य दर मिळत नसल्यामुळे यापूर्वीच शेतकरी आंदोलन झाले आहे. बांगलादेशातील शेतकरी भारतातून होणाऱ्या आयातीचा विरोध करीत आहेत. पाकिस्तानमधील शेतकरी वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करीत आहेत. ऑस्ट्रेलियासह शेजारील देशांतही आंदोलने सुरू आहेत. ऑस्ट्रेलियातील शेतकरी उच्चदाबाच्या वीजवाहिनी तारांचा विरोध करीत आहेत. न्यूझीलंडमध्ये अन्नधान्य उत्पादकांवर लागू करण्यात आलेल्या नियमांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत.

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘शिक्षण हक्क कायद्या’तील बदलांचा संभाव्य परिणाम काय?

राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी धडक देऊन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत की अवास्तव आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण हे फक्त भारतातच घडत नाही. जगातील अनेक देशांत आणि प्रामुख्याने जगाचे नेतृत्व करणाऱ्या आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या युरोपात शेतकरी आंदोलनाची झळ जास्त आहे. मागील महिनाभरापासून शेतकरी निदर्शने करीत आहेत. प्रामुख्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस, रोमानिया, लिथुआनिया, पोलंड, स्पेन आदी देशांत शेतकरी आंदोलनाची धार वाढली आहे. त्या त्या देशांतील सरकारांनी आश्वासने देऊन आंदोलने शांत केली असली, तरीही समस्या सुटलेल्या नाहीत.

निवडणुका हे आंदोलनाचे मुख्य कारण?

चालू वर्षात जगातील तब्बल ६४ देशांत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या काळात आपापल्या देशातील मध्यमवर्गीयांना, ग्राहकांना महागाईची झळ बसणार नाही, याची काळजी घेतली जात असल्यामुळे त्या त्या देशांमधील सरकारे शेतीमालाचे दर पाडत आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर युरोपियन युनियनसह विविध देशांमध्ये शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारची कसरत सुरू आहे. निवडणुकीसह वाढता उत्पादन खर्च, शेतीतून घटलेले उत्पन्न, घातक वायू उत्सर्जन धोरणाचा दबाव, कृषीवरील अनुदानकपात आणि त्यातून निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता ही शेतकरी आंदोलनाची प्रमुख कारणे आहेत.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the reasons for farmers movement in 65 countries of the world print exp amy
Show comments