विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तान संघ आणि त्यांचा सहभाग हे चर्चेचे विषय ठरले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंध लक्षात घेता हे अपेक्षितच होते. नेहमीप्रमाणे ऐन वेळी हा विषय मिटला आणि पाकिस्तानचा सहभाग निश्चित झाला. पाकिस्तानला विजेतेपदासाठी दावेदार मानले जात होते. मात्र, स्पर्धा सुरू झाली आणि पाकिस्तानचा फुगा फुटला. जर-तरचे समीकरणही पाकिस्तानचे आव्हान राखू शकले नाही. पाकिस्तानच्या अपयशामागे नेमकी काय कारणे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.
पाकिस्तान आणि विश्वचषक स्पर्धेच्या चर्चेला सुरुवात कशी झाली?
आशिया चषक स्पर्धेपासून या चर्चेला खरी सुरुवात झाली. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतील सामने पाकिस्तानात खेळणार नाही हे निश्चित झाल्यावर पाकिस्तानने मग आम्हीही विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात जाणार नाही अशी आवई उठवली. पाकिस्तानच्या या धमकीचा काही एक परिणाम झाला नाही. आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळविण्याचा निर्णय झाला. पाकिस्तानात चार सामने खेळविण्याचा हट्ट आशियाई समितीने पुरवला. तरीही, यामुळे पाकिस्तानचा अहंकार दुखावला गेला. त्यांनी विश्वचषक स्पर्धेत न जाण्यासाठी विविध कारणे पुढे केली. आधी सुरक्षाव्यवस्था, नंतर ठरावीक शहरात न खेळण्याची भूमिका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने घेतल्या. मात्र, अखेर बीसीसीआयच्या ताकदीला टक्कर देणे त्यांना जड गेले आणि पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात दाखल झाला.
विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघाची स्थिती नेमकी काय होती?
विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होताना पाकिस्तान आयसीसी क्रमवारीत अव्वल मानांकित संघ होता. पण, स्पर्धेवर मानांकनाचा काही फरक पडत नाही. तुमची मैदानावर होणारी कामगिरी निर्णायक असते. बाबर आझम हा क्रमवारीतील अव्वल फलंदाज, मोहम्मद रिझवानसारखा जबाबदार फलंदाज, शाहीन आफ्रिदी हा भेदक गोलंदाज, शादाब खानची फिरकी गोलंदाजी अशी ताकद चांगली होती. स्पर्धा उपखंडात असल्यामुळे पाकिस्तान संघाकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. ताकदवान संघासमोर आव्हान उभे करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती.
पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीचे अपयश महागात पडले का?
फखर झमान, अब्दु्ल्ला शफिक, इम्रान उल हक, बाबर, रिझवान असे एकापेक्षा एक सरस फलंदाज होते. आव्हानाचा पाठलाग करताना किंवा आव्हान उभारण्याची पाकिस्तानला निश्चित चिंता नव्हती. पण, याच आघाडीच्या फळीला आलेले अपयश पाकिस्तानसाठी सर्वांत मारक ठरले. यातही बाबर आपला लौकिक दाखवू शकला नाही. विराट कोहलीनंतर सातत्य टिकविणारा फलंदाज म्हणून बाबरकडे बघितले जात होते. त्याने निराशा केली. फखर झमान पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यावर त्याला संघातून वगळले. त्याला दुखापतही झाली. नवोदित अब्दुल्ला शफिक एखाद दुसरी चांगली खेळी खेळला. पण, सातत्य नव्हते.
हेही वाचा… विश्लेषण: दीपावलीत जळगाव सुवर्णनगरीला झळाळी का? सोन्याची उलाढाल किती होते?
बाबरला कर्णधार म्हणून खेळाडूंवर विश्वास दाखवता आला नाही. सुरुवातीच्या अपयशानंतर संघाबाहेर फेकला गेलेल्या फखरने पुन्हा संधी मिळाल्यावर न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानला सनसनाटी विजय मिळवून दिला. पण, तोवर उशीर झाला होता. रिझवान अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. शिवाय तो मोक्याच्या वेळी तंदुरुस्ती दाखवू शकला नाही.
फिरकीचे अपयशही पाकिस्तानला भोवले?
शादाब खान आणि मोहम्मद नवाझ हे पाकिस्तानचे प्रमुख फिरकी गोलंदाज होते. आशियाई स्पर्धेतच या दोघांना अपयश आल्यावर पाकिस्तानात विश्वचषकासाठी या दोघांना वगळावे अशी मागणी होत होती. मात्र, निवड समितीने या दोघांवरच विश्वास दाखवला. स्पर्धा उपखंडात सुरू असताना आणि अन्य देशांचे फिरकी गोलंदाज यशस्वी होत असताना पाकिस्तानच्या या दोन्ही फिरकी गोलंदाजांना आलेले अपयश ही पाकिस्तानची मोठी डोकेदुखी ठरली. संपूर्ण स्पर्धेत या दोघांनी प्रत्येकी केवळ दोन गडी बाद केले. नवोदित उसामा मीरने मधली षटके चांगली टाकली, पण तो दडपणाचा सामना करू शकला नाही. बाबरने इफ्तिकार अहमदच्या कामचलाऊ फिरकीला महत्त्व दिले, पण त्यानेही निराशा केली.
फिरकीप्रमाणे वेगवान गोलंदाजांनीही निराशा केली का?
शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ हे वेगवान गोलंदाज नक्कीच प्रतिस्पर्ध्यांचा डाव गुंडाळण्याची क्षमता बाळगून आहेत. मात्र, शाहीन एकटाच प्रभाव पाडू शकला. स्पर्धेत त्याने १८ फलंदाज बाद केले. पण, शाहीनला गोलंदाजीच्या सुरुवातीच्या षटकांत एकदाही यश मिळाले नाही. हारिस रौफ ट्वेन्टी-२० मध्ये भेदक वाटला. पण, ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये तो याही वेळी प्रभाव पाडू शकला नाही. सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांत सलग दुसऱ्या स्पर्धेत तो आघाडीवर राहिला. हसन अलीने कायम शाहीनच्या साथीत गोलंदाजीची सुरुवात केली. मात्र, त्याची कामगिरीही निराशाजनक राहिली. या सगळ्यात नसीम शाहची गैरहजेरी पाकिस्तानला जाणवली.
अपयशातून मार्ग काढणारी दुसरी फळी पाकिस्तानकडे आहे का?
सध्या तरी पाकिस्तानकडे दुसरी फळी तयार नाही. अजूनही पाकिस्तानात फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात नाही. देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा फारसा चांगला नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचाही दर्जा उंचावण्याची गरज आहे. माजी कर्णधार मिस्बा उल हकने पाकिस्तानमधील दरी भरुन काढण्यासाठी विशेष शिबिरे घेण्याची गरज असल्याचे व्यक्त केलेले मत याबाबतीत खूप महत्त्वाचे ठरते.