राजकीय अस्थैर्य, अविश्वासाचे वातावरण यांमुळे (कु)प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानात सध्या गोंधळ सुरू आहे. मात्र हा गोंधळ राजकीय नसून माहिती व तंत्रज्ञानातील आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटवर नियंत्रण आणि पाळतीसाठी राष्ट्रीय फायरवॉल स्थापल्याच्या वृत्ताचा पाकिस्तान सरकारने इन्कार केला आहे. तर अशा प्रकारे फायरवॉल अमलात आली असून त्यामुळेच इंटरनेटचा वेग मंदावल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तान सरकारने मात्र वापरकर्त्यांनाच दोषी ठरवले असून ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’च्या (व्हीपीएन) अधिक वापरामुळे वारंवार इंटरनेट व्यत्यय येत असल्याचे सांगितले. पाकिस्तानातील इंटरनेट गोंधळ कसा निर्माण झाला याविषयी…
पाकिस्तानमध्ये इंटरनेट पेच का?
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट खूपच धिम्या गतीने सुरू असल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे. या आठवड्यात तर इंटरनेटचा वेग नेहमीच्या क्षमतेपेक्षा निम्म्याहून कमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. इंटरनेटच्या या समस्येचा लाखो वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे, अनेक उद्योग-व्यवसायात व्यत्यय आला आहे. पाकिस्तान सरकारकडे देशभरातून तक्रारी करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के नागरिक इंटरनेटचा वापर करत असून गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांचाही वापर कमी झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. ८ फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकारी कारवाईनंतर समाज माध्यमे वापरण्यास काही प्रमाणात मनाई आली असली तरी इंटरनेटचा वेग लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. वापरकर्ते त्वरित ईमेल पाठवू शकत नाहीत किंवा मेसेजिंग सेवा, व्हॉट्सॲप वापरू शकत नाहीत. व्यापारी आणि डॉक्टर म्हणतात की याचा त्यांच्या दैनंदिन कामावर, विशेषतः स्टेटमेंट्स आणि वैद्यकीय अहवाल प्राप्त करण्यावर विपरीत परिणाम झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाकिस्तान सॉफ्टवेअर हाऊस असोसिएशनने या आठवड्यात एका निवेदनात म्हटले आहे की, या व्यत्ययामुळे देशाच्या आधीच नाजूक अर्थव्यवस्थेला ३० कोटी डॉलरचे नुकसान होऊ शकते. लाहोर शहरातील इंटरनेट सेवा प्रदात्याने सांगितले की, व्यावसायिकांना त्रास होत आहे, कारण ते आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाहीत किंवा फाइल्स पाठविण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या येत आहेत.
हेही वाचा >>>हिंदू धर्मावर विपुल लेखन, योग अभ्यास करणार्या पोलंडमधील महिलेची कहाणी; कोण होत्या वांडा डायनोस्का?
इंटरनेट गोंधळाचे नेमके कारण काय?
पाकिस्तान सरकार घाईघाईने ‘नॅशनल फायरवाॅल’ची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे, असे पाकिस्तान सॉफ्टवेअर हाऊस असोसिएशनने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. गेल्याच महिन्यात पाकिस्तानातील आघाडीच्या माध्यमांनी लवकरच नॅशनल फायरवॉल प्रणाली लागू करणार असल्याचे वृत्त दिले होते. नॅशनल फायरवॉलची स्थापना केल्यास देशातील संपूर्ण इंटरनेट सेवांवर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण असेल. सरकारला जे दाखवायचे असेल, केवळ तेच जनता पाहू शकेल. चीन, इराण, तुर्कस्तान, रशिया या देशांमध्ये नॅशनल फायरवॉल प्रणाली लागू आहे. पाकिस्तानने फायरवॉल प्रणाली चीनकडून खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. फायरवॉल प्रणाली लागू करण्यासाठीच देशभरातील इंटरनेट सेवा विस्कळीत करण्यात आली आहे, असा दावा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तान सरकार चीनप्रमाणेच इंटरनेटवर नियंत्रण करू पाहत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
पाकिस्तान सरकारचे म्हणणे काय?
इंटरनेटसंबंधी करण्यात आलेले सर्व आरोप पाकिस्तान सरकारने खोडून काढले आहेत. पाकिस्तानच्या माहिती- तंत्रज्ञान आणि दूरसंपर्कमंत्री शाझा फातिमा ख्वाजा यांनी सरकार इंटरनेट सेवा अवरोधित किंवा धिमे करत असल्याच्या दाव्याचे खंडन केले. ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’चा (व्हीपीएन) अधिक वापर झाल्यामुळे इंटरनेट सेवा धिमी झाल्याचे सांगत त्यांनी वापरकर्त्यांनाच दोषी ठरवले. इंटरनेट समस्या टाळण्यासाठी पावले उचलली जात असल्याचेही फातिमा यांनी सांगितले. मात्र सरकारने दिलेले स्पष्टीकरण माहिती-तंत्रज्ञानतज्ज्ञ, डिजिटल अधिकार वकील आणि व्यावसायिकांनी नाकारले आहे. पाकिस्तान सरकारचे म्हणणे म्हणजे ‘अविश्वसनीय तर्क’ असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>गुजरातच्या या महाराजांची पोलंडच्या घरोघरी पूजा, रस्तेही त्यांच्याच नावावर; कारण काय? कोण होते महाराजा जाम साहेब?
इंटरनेटवर नियंत्रण का हवे आहे?
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर २०२२ मध्ये पाकिस्तानी कायदेमंडळात अविश्वास ठराव आणल्यानंतर त्यांची जागा पाकिस्तानी मुस्लीम लीगच्या (एन.) शाहबाज शरीफ यांनी घेतली. विविध प्रकरणात गुन्हे दाखल केल्यामुळे इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. मात्र त्यांचे समर्थक नेहमीच शरीफ सरकारविरोधात प्रचार करण्यासाठी समाज माध्यमांचा जोरदार वापर करत आहेत. समाज माध्यमांवर शरीफ सरकारवर, त्यांच्या धोरणांवर नेहमीच तोफ डागली जात आहे. इम्रान खान यांचे समर्थक ‘एक्स्’ समाजमाध्यमाचे सर्वाधिक वापरकर्ते असून जवळपास २.१ कोटी फॉलोअर्ससह ते या प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय पाकिस्तानी आहेत. केवळ इम्रान समर्थकच नव्हे तर
शरीफ सरकारमुळे पाकिस्तानात राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप करून अनेक सामान्य नागरिकही इंटरनेटवर सरकारविरोधात टीकास्त्र सोडत आहेत. आपल्या विरोधकांची टीका बंद करण्यासाठी शरीफ यांचे सरकार इंटरनेटवर नियंत्रण मिळवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. इंटरनेटवर नियंत्रण मिळविल्यास सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनाही रोखता येऊ शकते.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम?
पाकिस्तानमधील वायरलेस अँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशन या संस्थेने पाकिस्तानातील इंटरनेट गोंधळाचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. सरकारच्या सुरक्षा आणि पाळत ठेवण्याच्या निर्णयामुळे देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे गंभीर नुकसान होत आहे. इंटरनेटवर आधारित असलेल्या व्यवसाय, उद्योग यांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक व्यवसाय-उद्योगांनी पाकिस्तानातील गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून इतर देशांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा असलेले उद्योग पाकिस्तानात स्थिरावण्यासाठी संघर्ष करत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाकिस्तान सॉफ्टवेअर हाऊस असोसिएशनने या आठवड्यात एका निवेदनात म्हटले आहे की, या व्यत्ययामुळे देशाच्या आधीच नाजूक अर्थव्यवस्थेला ३० कोटी डॉलरचे नुकसान होऊ शकते.
sandeep.nalawade@expressindia.com