संदीप नलावडे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सकारात्मक माहिती असलेला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. तंबाखूचा विळखा सैल होण्याची काय कारणे आहेत, याचा आढावा…

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल काय सांगतो?

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराबाबत ‘डब्ल्यूएचओ’ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. २००० पासून जगभरात तंबाखूचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि २०३० पर्यंत त्यात लक्षणीय घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. १९९० ते २०२२ या दरम्यान १८२ राष्ट्रे व युरोपीयन संघटनेतील १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. २००० मध्ये १५ वर्षांवरील प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती (३२.७ टक्के) धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करत होती. मात्र त्यानंतर २२ वर्षांमध्ये या संख्येत सातत्याने घट होत आहे. २०२० मध्ये समान वयोगटातील पाचपैकी एक व्यक्ती (२१.७ टक्के) धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करत आहे. २०३० पर्यंत यात आणखी घट होऊन ही संख्या १८.१ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या या आरोग्य संघटनेला आहे. विशेष म्हणजे तंबाखू उद्योगातील जगातील बड्या कंपन्यांची साखळी असलेल्या ‘बिग टोबॅको’ने तंबाखूजन्य पदार्थांचा वापर वाढविण्याचा प्रयत्न करूनही ही घसरण झाली असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. 

हेही वाचा >>>पगारापासून ते कामाच्या व्याप, देशातील शिक्षकांची नेमकी स्थिती काय? जाणून घ्या…

तंबाखू वापराबाबत पुरुष-स्त्री यांचे प्रमाण काय आहे?

स्त्रियांपेक्षा पुरुष तंबाखूचा वापर अधिक करत असले तरी तंबाखूचा वापर कमी करण्यामध्येही पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे हा अहवाल सांगतो. स्त्रियांपेक्षा अधिक पुरुषांनी धूम्रमान सोडले आहे. २००० मध्ये जगातील एकूण पुरुषांपैकी जवळपास निम्मे (४९.१ टक्के) पुरुष तंबाखूचे ग्राहक होते. तथापि हे प्रमाण २०२० पर्यंत ३५.५ टक्क्यांपर्यंत घसरले आणि २०३० पर्यंत ३०.६ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. महिलांमध्ये तंबाखूचा वापर २००० मधील १६.३ टक्क्यांवरून २०२० मध्ये  ७.९ टक्क्यांपर्यंत घसरला आणि २०३० पर्यंत ५.७ टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.

वयोगटानुसार तंबाखूच्या वापराची आकडेवारी काय?

तरुण आणि वृद्ध व्यक्तींपेक्षा मध्यमवयीन नागरिक तंबाखूचा वापर अधिक करत असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र तंबाखू सोडण्यामध्येही मध्यमवयीन नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. ४५-५४ वर्षे वयोगटातील २७.५ टक्के नागरिक तंबाखू सेवन करतात. त्यानंतर ५५-६४ वर्षे वयोगटातील (२५.८ टक्के), ३५-४४ वर्षे वयोगटातील (२५.६ टक्के), ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे (१२.९ टक्के) नागरिक तंबाखूचे सेवन करत आहेत. १५-२४ वर्षे वयोगटातील १३.३ टक्के नागरिक तंबाखूचे सेवन करत आहेत. तंबाखूच्या वापरामध्ये सर्वसाधारणपणे घट सर्व वयोगटांमध्ये दिसून येते, जे या अहवालाचे एकूण निष्कर्ष दर्शवते.

हेही वाचा >>>रामायण भारताबाहेर कसे लोकप्रिय झाले? आशियातील लाओसपासून आफ्रिकेतील मॉरिशसपर्यंत रामायण कथेचा आश्चर्यकारक प्रवास…

तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराबाबत भारतातील आकडेवारी काय सांगते?

जागतिक सरासरीपेक्षा चांगले संकेत देणाऱ्या देशांपैकी भारत एक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा हा अहवाल सांगतो. २०२० मध्ये जवळपास ४६ टक्के भारतीय पुरुष तंबाखूचे सेवन करत होते. (जागतिक सरासरीपेक्षा ३.१ टक्के कमी) २०२० पर्यंत भारातील १४.३ टक्के पुरुष तंबाखू सेवन करत असल्याचे दिसून आले. (जागतिक सरासरीपेक्षा तब्बल २१ टक्के कमी) अहवालाच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत हे अंतर २२.४ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एकूण आकडेवारीनुसार, भारतीयांमध्ये तंबाखूचा वापर २००० मध्ये २७.६ टक्के (जागतिक आकडेवारीपेक्षा पाच टक्के कमी) होता, तो २०२० मध्ये आठ टक्क्यांवर (जागतिक आकडेवारीपेक्षा १३.७ टक्के कमी ) घसरला. २०३० साठीचे अंदाज भारतीय संख्येत आणखी घसरण दर्शवितात. या वर्षापर्यंत भारतातील ८.२ टक्के पुरुष, तर ०.६ टक्के महिला आणि एकूण ४.५ टक्के नागरिक तंबाखूचा वापर करतील. 

तंबाखू उद्योगांच्या प्रयत्नांविरोधात ‘डब्ल्यूएचओ’ने काय इशारा दिला आहे?

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचे प्रमाण कमी होत असले तरी जगातील बडे तंबाखू उद्योग कंपन्या मात्र हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने याबाबत सावधगिरीची नोंद केली आहे. ‘डब्ल्यूएचओ’चे आरोग्य संचालक (जाहिरात विभाग) रुएडिगर क्रेच यांनी इशारा दिला की, तंबाखू उद्योग कंपन्या त्यांच्या उत्पादनांना ई-सिगारेट किंवा अन्य नव्या शीर्षकाखाली मुलांमध्ये प्रचार करण्यासाठी वापरत आहेत. विशेषत: तरुणांमध्ये अशा प्रकारच्या जाहिरातील भुरळ पाडत आहेत. ते देशांच्या तंबाखूविरोधी प्रयत्नांना कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. २०१० ते २०२५ या कालावधीत तंबाखूच्या वापरात ३० टक्के घट होण्याचे जगाचे लक्ष्य आहे, मात्र तंबाखू उद्योगांच्या प्रयत्नांमुळे हे लक्ष्य चुकण्याची शक्यता ‘डब्ल्यूएचओ’ने व्यक्त केली. भारतासह एकूण ५६ राष्ट्रे हे लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला काँगो प्रजासत्ताक, इजिप्त, इंडोनेशिया, जॉर्डन, मोल्दोव्हा आणि ओमान या राष्ट्रांमध्ये तंबाखूचा वापर वाढल्याने हे लक्ष्य गाठण्यात बाधा येत आहे.  

हेही वाचा >>>विश्लेषण : चीनच्या लोकसंख्येत अनुकूल धोरणानंतरही घट कशी? राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची वेळ का?

ई-सिगारेटबाबत ‘डब्ल्यूएचओ’चा इशारा काय?

सिगारेटचा वापर आरोग्यासाठी धोकादायक असल्याने अनेक तंबाखू उद्योग कंपन्यांनी ई-सिगारेटला प्रोत्साहन दिले. तंबाखूजन्य पदार्थ वापरणाऱ्या किशोरवयीनांपैकी किमान एकतृतीयांश ई-सिगारेट वापरत आहेत. मात्र ही भुरळ आहे. विविध फ्लेवर्स व उत्पादनांचे प्रकार तरुणांना लक्ष्य करत आहेत. जागतिक स्तरावर १३-१५ वयोगटातील ३.७० कोटी किशोरवयीन मुले तंबाखूचा वापर करतात, त्यापैकी १.२० कोटी मुले ई-सिगारेट किंवा नवी धूरविरहित उत्पादने वापर करत आहेत. ‘डब्ल्यूएचओ’ने सर्व देशांना ई-सिगारेटवरील नियंत्रण धोरणे राखण्यासाठी आणि मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने २०१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा (पीईसीए)  केला, जो ई-सिगारेटचा वापर, विक्री, उत्पादन आणि अगदी जाहिरातीवर बंदी घालतो.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the reasons for the large decline in tobacco use worldwide print exp amy
Show comments