अभय नरहर जोशी

ब्राझीलच्या ॲमेझॉन खोऱ्यास शतकातील सर्वांत भीषण दुष्काळाचा फटका बसला आहे. ब्राझीलची जीवनदायिनी असलेल्या ॲमेझॉन नदीची पातळी गेल्या शतकाहून जास्त काळापासून प्रथमच अतिशय खालावली आहे. ॲमेझोनास या ब्राझीलमधील सर्वांत मोठ्या राज्यातील नागरी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुष्काळामुळे आतापर्यंत चार लाख ८१ हजार नागरिक थेट प्रभावित झाले असून, या खोऱ्यातील तीन कोटी रहिवाशांवर त्याची टांगती तलवार आहे. ॲमेझॉनसह तिच्या उपनद्या आटल्याने जलवाहतूक ठप्प आहे. त्यामुळे येथील स्थानिक रहिवासी, दुर्गम भागातील आदिवासी समुदायाचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला आहे. वन्यजीवांनाही मोठा धोका निर्माण झाला असून, बरेचशे मृत्युमुखी पडत आहेत, त्या विषयी…

तीव्र दुष्काळ का आणि कसा?

ब्राझील सरकार या दुष्काळामागे हवामानातील टोकाचे बदल आणि ‘एल निनो’चा परिणाम असल्याचे सांगत आहे. हवामान बदल आणि ‘एल निनो’ परिणामामुळे उत्तर भागातील ॲमेझॉन खोऱ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. ऐतिहासिक सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे नदीची पातळी कधी नव्हे एवढी विक्रमी प्रमाणात घटली. या नदीपात्रातून येथील स्थानिक रहिवाशांची जलवाहतूक, दळणवळण चालते. मात्र, पाणीपातळीच घटल्याने ही वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा पुरवठा होणे दुरापास्त झाले आहे. ॲमेझॉन खोऱ्यात अधिवास असलेल्या सुमारे तीन कोटी लोकसंख्येला या दुष्काळाचा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. ॲमेझोनास राज्याची राजधानी मानौस आणि २० हून अधिक शहरांत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अनेक उपनद्याही कोरड्या पडल्या असून, दुर्गम भागातील जंगलात हजारो रहिवासी एकाकी अवस्थेत अडकून पडले आहेत. उपजीविका आणि वाहतुकीसाठी नद्यांवरच अवलंबून असलेली संपूर्ण गावे आता आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. या दुर्गम भागात या रहिवाशांना अन्न, औषध आणि पाणी हवाई मार्गाने द्यावे लागत आहे.

हेही वाचा – विश्लेषण : भाजपकडून वसुंधराराजेंना पर्याय? राजस्थानच्या रणात पक्षश्रेष्ठींचे ‘रजपूत कार्ड’!

मालवाहतुकीवर थेट परिणाम कसा?

पाण्याच्या शोधात व्याकूळ झालेल्या रहिवाशांना या भागात आपल्या हातांनी विहिरी खोदाव्या लागल्या आहेत. उदाहरणार्थ येथील ६७ वर्षीय मच्छीमार व्यावसायिक रायमुंडो सिल्वा डो कार्मो यांनी मानौसमधील ‘लागो दो पुराकेक्वारा’ तलावाच्या कोरड्या भागात स्वतः विहीर खोदली आहे. दैनंदिन वापरासाठी या पाण्याचा वापर ते करत आहेत. पाणी पातळी घटल्याने वाहने, स्वयंपाकाचा गॅस, इंधन पुरवठा करणारी त्यांची मोठी मालवाहू नौका रिओ नेग्रो नदीच्या काठावर पडून आहे. जलस्तर मोठ्या वेगात घटत असताना माझी मालवाहू नौका ॲमेझॉनची उपनदी असलेल्या मदैरा नदीत २८० किलोमीटर (१७५ मैल) दूर असलेल्या बोरबा येथून माल घेऊन येत होती. मात्र, वेगाने घटत्या जलस्तरात माझ्या नौकेला वाचवण्यासाठीची मदत फार मंद गतीने मिळाली, अशी खंत या नौकेचे कॅप्टन ज्युनियर सीझर दा सिल्वा यांनी व्यक्त केली. मदैरा नदी झपाट्याने कोरडी पडल्याने तिच्या काठावरील खडक उघडे पडले आहेत. असे दृश्य आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

जलचरांवर कोणते दुष्परिणाम?

तज्ज्ञांच्या मते उष्णतेची लाट आणि तीव्र दुष्काळामुळे नदीतील मासे आणि शंभरावर डॉल्फिन (येथे ज्यांना पोर्तुगीज भाषेतील ‘बोटो’ नावाने संबोधतात) मृत्युमुखी पडले आहेत. हे डॉल्फिन आधीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुष्काळामुळे सोलिमोस नदी आटल्याने प्रभावित झालेल्या पिरान्हा तलावात मृत माशांचा खच पडला आहे. त्यातून येथील नौकाचालकांना मार्ग काढावा लागत आहे. शाश्वत विकासासाठी कार्यरत संस्था ‘ममिराऊ इन्स्टिट्यूट’चे संशोधक तेफे सरोवरातील पाण्याचे नमुने आणि मृत पाण्यांच्या चाचण्या घेत आहेत. यामागील नेमके कारण ते शोधत आहेत. येथील लाखो स्थानिक रहिवाशांना या प्रतिकूल स्थितीचा थेट फटका बसत आहे. येथील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जलवाहतुकीवर अवलंबून असतो. आता हे सर्व ठप्प आहे. हवामान संबंधित आणीबाणी जाहीर करण्याची त्यांचे सरकारकडे आग्रही मागणी आहे. दुर्गम भागातील संपर्कव्यवस्था नसलेल्या गावांमध्ये अन्न पुरवठा करण्यासाठी गेल्या महिन्यात ब्राझील सरकारने मानवतावादी दृष्टिकोनातून कृतिदल स्थापले. मात्र, आम्हाला अजून मदतीची आवश्यकता असल्याची मागणी या गावांतील ग्रामस्थ करत आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : ‘हेतुपुरस्सर कर्जबुडव्यां’ची संख्या का वाढते आहे? रिझर्व्ह बँकेचे याबाबत नवे धोरण काय?

दुष्काळाची तीव्रता कधीपर्यंत राहणार?

या प्रदेशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आणि ॲमेझोनास राज्याची राजधानी असलेल्या मनौस शहरातील बंदरात नुकतीच १३.५९ मीटर (४४.६ फूट) पाणीपातळी नोंदवली गेली, जी एका वर्षापूर्वी याच काळात १७.६ मीटर होती. या पातळीची नोंद १९०२ पासून ठेवण्यात येत आहे. तेव्हापासूनची ही सर्वांत कमी पातळी आहे. याआधी २०१० मध्ये सर्वांत कमी पातळी नोंदवली गेली होती. त्यालाही या ताज्या नीचांकाने मागे टाकले आहे. जलवाहतूक ठप्प झाल्याने बहुतांश मालवाहतूक ही ट्रॅक्टरने किंवा पायी केली जात आहे. या भागातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून येथे पावसाचा थेंबही पडलेला नाही. गेल्या दुष्काळांपेक्षा उष्म्याची मोठी लाट आली आहे. ब्राझील सरकारचे आपत्ती सूचना केंद्र ‘सेमाडेन’ने दिलेल्या माहितीनुसार ॲमेझॉन खोऱ्याच्या काही भागांत १९८० नंतर प्रथमच जुलै ते सप्टेंबरदरम्यान अत्यल्प पाऊस पडला. ब्राझीलच्या विज्ञान मंत्रालयाने या दुष्काळामागे यंदाच्या ‘एल निनो’ या हवामान घटकामुळे असे झाल्याचे सांगितले. या घटकामुळे जागतिक स्तरावर टोकाचे हवामान बदल घडतात. या मंत्रालयाच्या अंदाजानुसार ‘एल निनो’चा प्रभाव सर्वोच्च स्तरावर पोहोचेपर्यंत म्हणजे किमान डिसेंबरपर्यंत तरी हा तीव्र दुष्काळ कायम राहील.

abhay.joshi@expressindia.com