जगातील बहुतेक खासगी आस्थापना, कारखाने यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आहे. मात्र युरोपमधील प्रगतीशील राष्ट्र असलेले जर्मनी मात्र यात बदल करणार असून आठवड्यात चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी असा प्रयोग करणार आहे. जर्मनीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा करण्याचे कारण काय याचा आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या कालावधीसंबंधी जर्मनीमध्ये काय बदल करण्यात आला आहे?

जगातील बहुतेक देशांत कर्मचाऱ्यांसाठी पाच किंवा सहा दिवसांचा आठवडा असतो. म्हणजे सहा दिवस काम आणि एक दिवस साप्ताहिक सुट्टी किंवा पाच दिवस काम आणि दोन दिवस साप्ताहिक सुट्टी. मात्र बहुतेक देशांमधील कंपन्यांनी यात बदल करण्यास सुरुवात केली असून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी असा प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. आता युरोपमधील आर्थिकदृष्ट्या बडे राष्ट्र असलेल्या जर्मनीनेही असा प्रयोग त्यांच्या देशात करण्यास सुरुवात केली आहे. जर्मनीमधील ४५ कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा लागू करण्यास मान्यता दिली असून १ फेब्रुवारीपासून हे बदल लागू करण्यात येणार आहे. या कंपन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून चार दिवस काम देतील आणि तीन दिवस विश्रांती देणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

हेही वाचा : एनपीएस, आयएमपीएस, फास्ट टॅग केवायसी… एक फेब्रुवारीपासून कोणते नवीन आर्थिक नियम लागू होणार? 

जर्मनीने असा निर्णय घेण्याचे कारण काय?

युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जर्मनीचे नाव घेतले जाते. मात्र हा देश सध्या आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहे. गेल्या वर्षी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला हा देश मंदीत सापडला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी जर्मनीची धडपड सुरू आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा हा प्रयोग करण्यात येत आहे. १ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सहा महिन्यांच्या प्रायोगिक कार्यक्रमानुसार, शेकडो कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारावर ठेवून दर आठवड्याला एक दिवस सुट्टी अतिरिक्त मिळेल. कंपन्यांसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता. चार दिवसांच्या कामामुळे कंपन्यांच्या विद्यमान कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढेल आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्याही दूर होईल, असे मानले जात आहे. अधिक सुट्टी मिळाल्यामुळे कर्मचारी केवळ निरोगी आणि आनंदीच राहू शकत नाही, तर अधिक उत्पादनक्षमही होऊ शकतो, असे काही कामगार संघटनांकडून सांगण्यात आले. चार दिवसांचा आठवडा झाला आणि कर्मचाऱ्यांनी योग्य काम केले तर अनेक गोष्टींची बचत होऊ शकते, असे काही कंपन्यांकडून सांगण्यात आले.

कंपन्यांचे म्हणणे काय?

जर्मनीमध्ये करण्यात येणारा हा प्रयोग जर्मन श्रमिक बाजारात होत असलेल्या एका व्यापक बदलास अधोरेखित करतो, जेथे कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे कंपन्यांवर त्यांची जागा भरण्यासाठी दबाव येत आहे. करोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने जर्मनी अशा प्रकारचा प्रयोग करून कर्मचारी, कंपनी आणि अर्थव्यवथेचे हित साधण्याचा प्रयत्न करत आहे. कमी तास काम केल्याने उत्पादकतेमध्ये किती फायदा होत आहे, हे पाहण्याचे काम जर्मनीतील ४५ कंपन्या करणार आहेत. ‘‘चार दिवसांचा आठवडा हा प्रयोग यशस्वी झाला तर आम्हाला दीर्घकाळात कमी खर्च होईल,’’ असे इव्हेंट प्लॅनर सॉलिडसेन्स या कंपनीचे सहसंस्थापक सोरेन फ्रिके यांनी सांगितले. या प्रयोगामुळे गुंतवणुकीचे फायदे मिळतील आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा वाढ होईल याची खात्री असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : विश्लेषण : कल्याण-डोंबिवलीत बेकायदा बांधकामे कशी बोकाळली? ती रोखली जातील का?

चार दिवसांच्या आठवड्यांचा प्रयोग अन्य देशांत झाला आहे का?

करोनाचा फटका बसल्यानंतर जगातील अनेक देशांनी चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग केला. चार दिवसांचा आठवडा सुरू करणारा बेल्जियम हा युरोपमधील पहिला देश. फेब्रुवारी २०२२ मध्ये या देशातील अनेक कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा सुरू केला. मात्र असे करताना कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे चार दिवसांचे काम करण्याचे तास वाढविले आहेत. कर्मचाऱ्यांनी चार दिवस काम करायचे की पाच दिवस हे ठरविण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. पोर्तुगालमधील काही कंपन्यांनीही गेल्या वर्षी जूनपासून चार दिवसांचा आठवडा सुरू केला आहे. ब्रिटनमध्ये चार दिवसांच्या आठवड्याची सहा महिन्यांची चाचणी यशस्वी झाल्याचे कंपन्यांनी जाहीर केल्यानंतर आता कामकाजाचा आठवडा लहान करण्याच्या दृष्टीने योजना आखली जात आहे. स्पेन, स्कॉटलंड, आइसलँड या देशांनीही या प्रयोगाला सुरुवात केली आहे, तर स्वीडनमध्ये कंपनी व कर्मचाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. जपानमध्येही काही कंपन्यांनी हा प्रयोग करून कार्यक्षमता वाढल्याचे सांगितले. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील ९२ टक्के कामगार कामाचा आठवडा कमी करण्याच्या बाजूने आहेत. सुधारित मानसिक आरोग्य व वाढीव उत्पादकता हे फायदे या कर्मचाऱ्यांनी नमूद केले. कॅनडामध्येही करोना काळानंतर कामकाजाचे पर्यायी वेळापत्रक आणि नवीन कार्यशैलीचा विचार करत असून य देशातील बड्या कंपन्या चार दिवसांचा आठवडा सुरू करण्याच्या विचारात आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : नॅक मूल्यांकनातील प्रस्तावित बायनरी पद्धत काय?

भारतात या प्रयोगाला यश मिळेल?

केंद्र सरकारने कामगार नियमांमध्ये अशी तरतूद केली आहे की कंपन्यांना कामाचा आठवडा चार दिवसांचा करता येऊ शकेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना तीन दिवस साप्ताहिक सुट्टी देण्याची मुभा या तरतुदीनुसार देण्यात आली आहे. मात्र हा निर्णय घेताना आठवड्याची ४८ तास काम ही मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच कंपन्यांनी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचा निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांना चार दिवस १२ तास काम करावे लागणार आहे. तीन दिवसांच्या साप्ताहिक सुटीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कुटुंबासोबत व्यतीत करायला मिळणार असून घरगुती कामे करण्यासही वेळ मिळणार आहे. मात्र चार दिवस १२ तासांपेक्षा अधिक वेळ काम करावे लागणार असल्याने या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना १२ तासांचे काम करण्याचा शीण येऊन त्याच्या उत्पादकतेवरही परिणाम होऊ शकतो. मुंबईसारख्या शहरात कर्मचाऱ्यांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर यांसाठी तीन ते चार तास प्रवासात व्यतीत करावे लागतात. दिवसाला १२ तासांचे काम करावे लागल्यास तब्बल १६ ते १७ तास घराबाहेर राहावे लागणार असल्याने कार्यालयीन दिवसांत कुटुंबाकडे सपशेल दुर्लक्ष करावे लागेल, त्याशिवाय शारीरिक आणि मानसिक थकवा येण्याचीही शक्यता आहे. महिला वर्ग आणि कुटुंबाची अधिक जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक काळ कुटुंबाशिवाय राहणे शक्य होणार नाही. रुग्णालय, रेल्वे, बँका, मॉल, हॉटेल यांसह अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रामध्ये चार दिवसांचा आठवडा हा पर्याय निवडणे शक्यच होणार नाही.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the reasons of four day week in germany will it start in india print exp css