राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकांना गुरुवारी एका कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘सिल्व्हर ट्रम्पेट’ आणि ‘ट्रम्पेट बॅनर’ प्रदान केले. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची तुकडी भारतीय सैन्यातील सर्वात जुनी तुकडी आहे. १७७३ साली व्हाईसरॉय यांच्या सुरक्षेसाठी या तुकडीची निर्मिती करण्यात आली होती. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरेन हास्टिंग यांनी वाराणसीमध्ये या तुकडीची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत ही तुकडी आपले अस्तित्व आणि महत्त्व टिकवून आहे.
विश्लेषण : ट्विटरची मालकी एलॉन मस्ककडे, आता पुढे काय? तुमचा डेटा सुरक्षित राहणार का?
राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचे कार्य काय?
२७ जानेवारी १९५० मध्ये ब्रिटिश काळातील या तुकडीचे नामांतर राष्ट्रपतींचे अंगरक्षक असे करण्यात आले. राष्ट्रपतींना सुरक्षा पुरवणं हे या तुकडीचे मुख्य काम आहे. या तुकडीत २०० अंगरक्षकांचा समावेश आहे. या तुकडीत शारिरीकरित्या सुदृढ अशा निवडक जवानांचा समावेश असतो. कठिण आणि शारिरीकदृष्ट्या आव्हानात्मक प्रक्रियेतून या अंगरक्षकांची निवड करण्यात येते. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांनी युद्धातदेखील सहभाग घेतला आहे. या अंगरक्षकांची एक तुकडी सध्या सियाचीनमध्ये सेवा देत आहे. या जवानांनी संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेचा भाग म्हणून श्रीलंकेमध्ये ‘आयपीकेएफ’च्या (IPKF) सैन्यासोबत काम केले आहे.
या तुकडीत भरतीचे निकष काय?
राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची किमान उंची सहा फूट असते. या तुकडीत केवळ जाट, शिख आणि राजपुतांचा समावेश आहे. या तुकडीतील जवानांच्या वंशावळीवरुन अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संदर्भातील खटला दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हरियाणाचे रहिवासी गौरव यादव यांनी या तुकडीतील विशिष्ट जातींच्या समावेशाबाबत आक्षेप नोंदवून हा खटला दाखल केला आहे.
विश्लेषण : वृत्तवाहिन्यांच्या चुकांवर नजर असणारीही एक संस्था आहे! NBDSA नेमकं कसं काम करते?
‘सिल्वर ट्रम्पेट’ आणि ‘ट्रम्पेट बॅनर’ काय आहेत?
भारतीय सैन्यातील राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या एकमेव तुकडीला सिल्वर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनरचा बहुमान मिळाला आहे. १९२३ मध्ये तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड रीडिंग यांनी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना हा सन्मान बहाल केला होता. सेवेची १५० वर्ष पूर्ण केल्यानंतर सिल्वर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनरने या तुकडीचा गौरव करण्यात आला होता. त्यानंतर ब्रिटिश काळातील प्रत्येक व्हाईसरॉयने आणि स्वतंत्र भारतातील राष्ट्रपतींनी ही परंपरा कायम ठेवली. या बॅनरवर राष्ट्रपतींच्या नावासंदर्भातील अक्षरं रेखाटली असतात. हे बॅनर अंगरक्षकांच्या तुकडीला असलेल्या विशेषाधिकारांचे प्रतिक आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या तुकडीच्या अंगरक्षकांना १४ मे १९५७ मध्ये सिल्वर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर प्रदान करण्यात आले होते.