हृषिकेश देशपांडे
अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू व काश्मीरमधील ही पहिलीच मोठी निवडणूक. राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. श्रीनगर लोकसभा मतदारसंघात तीन दशकांनंतर विक्रमी मतदान पाहता येथील मतदार नव्या आशेने परिस्थितीकडे पाहात असल्याचे दिसत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसभेच्या पाच तर लडाखमध्ये एकमेव जागा आहे. काश्मीर खोऱ्यात भाजप, काँग्रेस हे पक्ष रिंगणात नाहीत. तर जम्मूतील दोन जागांवर मात्र याच दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये लढाई आहे.
काश्मीरमधील समीकरणे
श्रीनगर, अनंतनाग-राजौरी तसेच बारामुल्ला हे तीन मतदारसंघ काश्मीर खोऱ्यात येतात. त्यातील अनंतनागला यावेळी राजौराचा भाग जोडला. गेल्या निवडणुकीत या तिन्ही जागा फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या. हे तीनही मतदारसंघ मुस्लीमबहुल आहेत. भाजपचे काश्मीर खोऱ्यात फारसे अस्तित्व नाही. श्रीनगर मतदारसंघात यंदा जवळपास ४० टक्के मतदान झाले. हा १९९६ नंतरचा मतदानाचा हा विक्रम आहे. यामुळे काश्मिरी जनतेची लोकशाही तसेच देशाच्या घटनेवरील श्रद्धा दृढ झाल्याचे यातून स्पष्ट होते. काश्मीरमधील राजकीय समीकरणे पाहिली तर विरोधी पक्षांच्या आघाडीत फूट पडली. नॅशनल कॉन्फरन्स, मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी तसेच काँग्रेस या इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांचा काश्मीर खोऱ्यात जनाधार आहे. यंदा नॅशनल कॉन्फरन्सनचे तीनही जागांवर उमेदवार जाहीर केल्यावर पीडीपीला स्वतंत्र लढण्याखेरीज पर्याय नव्हता. नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिल्याने त्यांची बाजू भक्कम झाली आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण: भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर किरगिझस्तानमध्ये हल्ला; नेमके काय घडले?
भाजपची खेळी
खोऱ्यात भाजपचा एकही उमेदवार नसताना अचानक प्रचाराच्या मध्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते. त्यामुळे येथील प्रमुख राजकीय पक्षही बुचकळ्यात पडले. शहा यांनी काँग्रेस, पीडीपी तसेच नॅशनल कॉन्फरन्सच्या विरोधात मतदान करण्याचा कार्यकर्ते तसेच भाजपच्या सहानुभूतीदारांना सल्ला दिला. भाजपने येथे कोणालाही थेट पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र अल्ताफ बुखारी यांची अपनी पार्टी ही काश्मीर खोऱ्यात भाजपला जवळची मानली जाते. यामुळे खोऱ्यात थोडेफार भाजपचे पाठीराखे आहेत त्यांचे मतदान अपनी पार्टीला होईल असा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत काश्मीर खोऱ्यात तीन जागांवर भाजपला सुमारे चार ते दहा टक्के मते मिळाली. श्रीनगरमध्ये विस्थापित काश्मिरी पंडितांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला.
खोऱ्यातील जागांचे चित्र
श्रीनगरच्या जागेवर नॅशनल कॉन्फरन्सचा प्रभाव आहे. ते ही जागा राखतील असा अंदाज आहे. येथे पीडीपी तसेच अपनी पार्टीला विजयापर्यंत जाता येईल अशी शक्यता नाही. येथे तिरंगी सामना आहे. बारामुल्ला मतदारसंघात चुरस आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला येथून रिंगणात उतरलेत. त्यांचा सामना पीडीपीचे फय्याज अहमद मिर, तसेच अपक्ष शेख इंजिनिअर रशीद व जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन अशी ही चौरंगी लढत आहे. लोन यांना भाजपची मते मिळतील अशी शक्यता आहे. अपनी पार्टी व लोन यांची आघाडी झाली. शेख इंजिनिअर हे कारागृहात असून, त्यांचे पुत्र प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. गेल्या वेळी इंजिनिअर यांना २२ टक्के मते मिळाली होती. नॅशनल कॉन्फरन्सविरोधात येथे मतांची विभागणी होणे ओमर यांच्या पथ्यावर पडेल. पूर्वीचा अनंतनाग मतदारसंघाला आता राजौरी जोडले. राजौरी तसेच पुंछमधील हिंदू मते असलेला भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला. पीडीपीच्या सर्वेसर्वा मेहबुबा मुफ्ती येथून लढत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सशी त्यांचा सामना आहे. येथून मेहबुबांना जर विजय मिळवता आला नाही तर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्न निर्माण होईल.
हेही वाचा >>>विश्लेषण: पंतप्रधान कृषी सिंचन योजना राज्यात का रखडली?
मतदानाच्या टक्केवारीबाबत उत्सुकता
जम्मूतील दोन मतदारसंघात यापूर्वीच मतदान झाले आहे. तेथे मतदारांचा उत्साह होता. तर श्रीनगरमध्ये तीस वर्षांनंतर शांततेत तसेच नव्या आशेने अधिक मतदान झाले. आता बारामुल्ला तसेच अनंतनाग-राजौरी मतदारसंघातही श्रीनगरची मतदानाची ४० टक्क्यांची सरासरी ओलांडली जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यातून मोठा संदेश जागतिक समुदायात जाणार आहे. त्यामुळेच अनुच्छेद हटवल्यानंतर ही निवडणूक महत्त्वाची आहे.
हिंदुबहुल उधमपूरमध्ये चुरस
हिंदुबहुल जम्मू व उधमपूर या दोन्ही जागा भाजपने गेल्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतांनी जिंकल्या आहेत. यंदा जम्मूत भाजपचे खासदार जुगलकिशोर शर्मा यांच्यापुढे काँग्रेसचे फारसे आव्हान नाही. मात्र उधमपूरमध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना काँग्रेस उमेदवाराने कडवी टक्कर दिली आहे. जम्मूतील दोन्ही जागांवर नॅशनल कॉन्फरन्स तसेच पीडीपीने उमेदवार दिलेला नाही. त्यांनी येथे काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मतविभागणी टळणार असल्याने भाजप पहिल्यापासून सावध होते. मात्र जम्मूत या दोन्ही जागा भाजप राखण्याची शक्यता प्रबळ दिसते. लडाखमधील एकमेव जागेवर भाजप व काँग्रेस यांच्यात चुरस दिसते. ही जागा भाजपकडे असून, विद्यमान खासदाराला भाजपने डावलले आहे. येथील मतदारसंघाच्या रचनेत बदल झाल्याने अंदाज बांधणे अवघड झालंय.
विधानसभेवर परिणाम
लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबरपर्यंत जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम विधानसभेच्या एकूणच रणनीतीवर होईल. अपनी पार्टीच्या कामगिरीवर काश्मीर खोऱ्यात किती जागा लढवायचा हे भाजप निश्चित करेल असा अंदाज आहे. विधानसभा मतदारसंघाचे परिसीमन झाल्यानंतर जम्मूत मतदारसंघ वाढलेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यावर केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. यात पहाडी समुदायाला आरक्षणाचा मुद्दा किंवा पायाभूत सुविधांची कामे, लाभार्थी वर्ग याच्या आधारे काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम मते मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जम्मूत अधिकाधिक जागा जिंकून काश्मीर खोऱ्यात मित्रपक्षांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने काही ठिकाणी विजय मिळवल्यास सत्ता मिळवता येईल असा भाजपचा होरा आहे. त्यामुळेच लोकसभेला काश्मीर खोऱ्यातील तीन जागा न लढवता भाजपने झाकली मूठ कायम ठेवल्याचे मानले जाते.
hrishikesh.deshpande@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd