विविध मंदिरांतील उत्पन्नाचे स्रोत वाढले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये, तसेच मंदिर व्यवस्थापनाच्या अनेक बाबींमध्ये गैरव्यवहाराची चर्चा सुरू झाली आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरही याला अपवाद नाही.

गैरव्यवहाराची चर्चा पुन्हा का?

तुळजाभवानी मंदिरातील दानपेट्यांमध्ये भाविकांनी अर्पण केलेले दागिने वितळवून ते सोने व चांदी बँकेत ठेवल्यास त्या निधीतून नवे विकास प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय तुळजाभवानी विश्वस्त संस्थेने घेतला. जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी दागिन्यांची माेजदाद करण्यासाठी समिती नेमली. या समितीने दिलेल्या तपशिलाप्रमाणे २०७ किलो सोने आणि २५७० किलो चांदी असल्याचे स्पष्ट झाले. पण काही दागिने गायब असल्याचाही अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

गैरव्यवहारांची व्याप्ती किती?

तुळजाभवानी मंदिरात सात दानपेट्या होत्या. त्यांचे लिलाव होत. एक ठरावीक रक्कम संस्थानाकडे भरली, की दानपेटीतील ऐवज लिलाव घेणारा ठेवून घेई. या दानपेटीत सोन्या-चांदीच्या वस्तू कधी भाविकांनी अर्पण केल्याच नाहीत, असे चित्र अगदी २००९ पर्यंत कायम होते. दानपेटीमध्ये २००१ मध्ये ०.२ ग्रॅम सोने आणि ४०८ ग्रॅम चांदी अर्पण केल्याच्या नोंदी एकदा घेण्यात आल्या. त्यानंतर २००७ पर्यंत या दानपेटीत एकाही भाविकाने सोने-चांदी असे काही देवीचरणी अर्पिले नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सिंहासन पेटीचा लिलाव बंद केला. ती घटना मंदिराच्या प्रगतीची खरी कळ ठरली. सन २०११ मध्ये सिंहासन पेटीतील सोने-चांदी याच्या नोंदी तपासल्या तेव्हा पाच किलो सोने आणि ७५ किलो चांदी भाविकांनी अर्पण केल्याचे दिसून आले. पुढे दर वर्षी सोने आणि चांदीच्या वस्तू वाढत गेल्या. गेल्या काही वर्षांत मंदिराचे उत्पन्न वाढत गेले. आता ते ३० कोटी रुपयांच्या घरात आहे आणि मंदिराकडे ४०० कोटी रुपये अनामत रक्कम आहे. नव्याने जेव्हा सोने-चांदी याची मोजणी झाली तेव्हा गेल्या १४ वर्षांत भाविकांनी अर्पण केलेले सोने आहे २०७ किलो आणि चांदी आहे २५७० किलो. तुळजापूरमध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू गायब कशा होत गेल्या, याचा हा गेल्या दोन दशकांतील प्रवास.

देवीच्या अंगावरील दागिन्यांचा खजिना किती मोठा?

तुळजाभवानी मंदिरात भवानीच्या अंगावर घातले जाणारे दागिने सात डब्यांमध्ये ठेवले जातात. वेगवेगळ्या कालखंडातील राजे-रजवाडे यांनी अर्पण केलेल्या दागदागिन्यांचा यात समावेश आहे. परंडा तालुक्यातील दीपा सावळे यांनी मराठी अलंकार आणि दागदागिने या विषयावर पुस्तक लिहिले असून, त्यात तुळजाभवानीच्या मूर्तीवर चढविल्या जाणाऱ्या दागिन्यांचा अभ्यास मांडला आहे. या सात डब्यांमध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी दिलेल्या १०१ मोहरांची माळ मोठी आकर्षक आहे. वेगवेगळ्या कालखंडात अनेक राजे आणि श्रीमंत व्यक्तींनी अर्पण केलेले दागिने या डब्यांमध्ये आहेत. यामध्ये मूर्तीसाठीचे नखशिखान्त दागिने आहेत.

हेही वाचा… विश्लेषण: मोदींपुढे आव्हान खरगेंचे; विरोधकांचा नवा चेहरा किती प्रभावी? २०२४ मध्ये विरोधकांना कितपत संधी?

नेत्र जडावी, चंद्र-सूर्य जडावी, कंठमाळ, गाठे जोड, झुबे, गोफ, सोन्यात मढवलेले रुद्राक्ष, बाजूबंद, वेगवेगळी फुले असा पुरातन खजिना आहे. हे सात डब्यांतील दागिने नवरात्रीत आणि सणांमध्ये मूर्तीवर घातले जातात. हे दागिने हाताळण्याचे नियम आहेत. पण हे नियम कमालीचे जुने आहेत. मंदिराचा एकूण कारभार ‘देऊळ कवायत’वर अवलंबून आहे. ही कवायत १९०९ च्या आसपास ठरविण्यात आली होती. भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू आणि मंदिराचे उत्पन्न याचे दर वर्षी लेखापरीक्षणही होते. मात्र, त्यात खजिना तपासला जात नाही. भाविकांनी दिलेल्या काही मौल्यवान दागिन्यांचा खजिन्यात समावेश होतो. याच्या नोंदी घेताना अनेकदा गैरव्यहार झाल्याचे दिसून येते.

गैरकारभार कसे चव्हाट्यावर आले?

मंदिरात भाविकांकडून होणारे दान आणि त्यातील ‘गोंधळ’ याचे तपशील माहिती अधिकार आल्यानंतर बाहेर येऊ लागले. तत्पूर्वीपासून मंदिरातील गैरव्यवहारावर चाप लावण्यासाठी पुजारी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर गंगणे हे काम पाहत. त्यांनी पुढे अनागोंदीचे अनेक तपशील मिळवले. त्याच्या तक्रारी न्यायालय आणि धर्मादाय संस्थांकडे केल्या. या प्रकरणांत मग सरकारी पातळीवर चौकशी सुरू झाली. दानपेटीतील मौल्यवान वस्तू व रोकड यात गैरव्यवहार करणाऱ्या ४२ जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल करण्याची शिफारस होती. मंदिराच्या आर्थिक कारभाराकडे दुर्लक्ष केल्याच्या ठपक्यावरून १९९१ ते २०१० या कालावधीमध्ये काम करणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील ११ अधिकाऱ्यांसह, नऊ उपविभागीय अधिकारी, नऊ तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या शिफारशी करण्यात आल्या. मौल्यवान दागिन्यांची लूट करणाऱ्यांची राज्य गुन्हा अन्वेषण विभागानेही चौकशी केली; पण पुढे काही होऊ शकले नाही. तुळजापूर मंदिराचा कारभार विश्वस्त कायद्यानुसार चालवला जातो. ज्याचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. पण गुन्हा दाखल केल्यानंतरही कोणावर कारवाई होत नाही, असेच चित्र आहे. दाखल झालेल्या तक्रारी, त्या आधारे होणारे दोषारोप पत्र यात अनेक प्रकारच्या उणिवा ठेवल्या जातात. परिणामी कारवाईच होत नसल्याचा आरोप किशोर गंगणे कागदपत्रे दाखवून करतात.

मंदिर प्रशासनात सुधारणा झाल्या?

शेगाव येथील गजाननमहाराजांचे मंदिर किंवा शिर्डीच्या मंदिरात व्यवस्थापनाच्या अनागाेंदी तशा फार कमी. उणीव असणे आणि हेतुत: अफरातफर असणे यात फरक आहे. शेगावच्या मंदिराचा कारभार पाहण्यासाठी शिवशंकरभाऊ पाटील यांनी नि:स्वार्थपणे आपली हयात खर्ची घातली. शिर्डीच्या मंदिराचा कारभार पाहण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे नियुक्ती केलेली आहे. तशी तुळजापूरच्या मंदिरात नाही. मात्र, काही जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या आर्थिक कारभाराला शिस्त लावली. तुळजापूरमध्ये डॉ. प्रवीण गेडाम, कौस्तुभ दिवेगावकर यांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. दिवेगावकर यांच्या काळात सशुल्क दर्शन पास दिले जाऊ लागले. त्यामुळे मंदिराचे उत्पन्न वाढत गेले. एका बाजूला मंदिराचे उत्पादन वाढत असताना भाविकांच्या सोई मात्र त्या प्रमाणात वाढत नसल्याचे तुळजापूर आणि पंढरपूर या दोन तीर्थस्थळी दिसून येते. मंदिर उत्पादनातून नव्या योजनांऐवजी सरकारी निधीतून सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मानसिकता आहे. अलीकडेच एक हजार कोटींहून अधिक रक्कम तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सरकारने जाहीर केली आहे. पूर्वीही निधी मिळत असे; पण विकासकामांचा निधी आणि मंदिरात विविध स्रोतांतून येणारा पैसा याचे नियोजन करण्याची यंत्रणा मात्र तुलनेने कमकुवत आहे. मंदिराचा कारभार धर्मादाय कायद्यान्वये चालवायचा, मंदिरातील नियम १९०९ च्या देऊळ कवायतीनुसार चालवायचे, की सरकार म्हणून कारभारावर लक्ष ठेवायचे याच्या चौकटी नीट आखण्याची गरज असल्याचे मत आता पुजारी मंडळाकडून व्यक्त होत आहे. आता दर्शन मंडपामुळे दर्शनरांगेला शिस्त लागली असल्याचे सांगण्यात येते.

suhas.sardeshmukh@expressindia.com

Story img Loader