चंदीगड आणि आसपासच्या परिसरात ८ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळला होता. पश्चिमी चक्रावातामुळे (Western Disturbance) उत्तरेतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. चंदीगड हवामान विभागाचे संचालक ए. के. सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी पश्चिमी चक्रावात ओसरायला सुरुवात होईल.
पश्चिमी चक्रावात (Western Disturbances) म्हणजे काय?
भूमध्य समुद्रात (Mediterranean region) निर्माण होणाऱ्या वादळास पश्चिमी चक्रावात अर्थात Western Disturbances म्हणतात. मान्सूनपेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहे. भूमध्य समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते, या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते. वाऱ्याची दिशा ज्या बाजूला वाहील, त्या दिशेला आर्द्रतायुक्त हवा वाहून जाते. पश्चिमी चक्रावात हे पुन्हा पुन्हा येऊ शकतात किंवा दोन चक्रावातमधील अंतर कधी जास्त तर कधी कमी असते.
स्कायमेट या खासगी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रावात हे अतिरिक्त उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. जे भूमध्य समुद्रात निर्माण होते. युरोप आणि आखाती देशांच्या मध्यभागी हा समुद्र असल्यामुळे त्याला भूमध्य समुद्र म्हणतात. भूमध्य समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर हा दाब वाऱ्यासह इराण, इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश ओलांडून हिमालयाला येऊन आदळतो. परिणामी, उत्तर भारतात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो. हे वारे बाहेरून आल्यामुळे त्याला वेस्टर्न असे म्हटले जाते.
हे वाचा >> मुसळधार पावसात उत्तराखंडमध्ये दिसले ‘शेल्फ क्लाऊड्स’? नेमका प्रकार काय आहे? जाणून घ्या
ए. के. सिंह म्हणाले की, उत्तरेतल्या राज्यांमध्ये आधीच पुरेसा पाऊस पडत आहे. त्यात पश्चिमी चक्रावाताने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमा ओलांडल्या आहेत. उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात धडकल्यानंतर मुसळधार पाऊस पडेल. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर नियमित पाऊस सुरू राहील; पण त्याची तीव्रता कमी होईल.
हवामान विभागाने २ जुलै रोजी म्हणजे सहा दिवसांआधी पश्चिमी चक्रावातची पूर्वसूचना दिली होती. जून महिन्याच्या शेवटीही पश्चिमी चक्रावात उत्तर भारतात धडकले होते आणि तीन दिवस सक्रिय होते.
मान्सूनपेक्षा पश्चिमी चक्रावात वेगळे कसे?
सिंह म्हणाले की, मान्सून आता सर्वांच्या परिचयाचा आहे. भारतात मान्सूनचे आगमन जून-जुलैमध्ये होते आणि सप्टेंबरपर्यंत मान्सून सक्रिय राहतो. तथापि, पश्चिमी चक्रावातचा निश्चित असा वेळ नाही, ते कधीही येऊ शकते. तसेच मान्सूनचा कालावधी जवळपास तीन महिने एवढा असतो. पण, पश्चिमी चक्रावात हा खूप कमी वेळेसाठी असतो.
आणखी वाचा >> दरवर्षी अतिमुसळधार पावसाच्या प्रमाणात वाढ; कारणे काय? जाणून घ्या
पश्चिमी चक्रावातचा अंदाज कसा वर्तवितात?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रावात येणार की नाही, याची माहिती केवळ सहा दिवस आधी देणे शक्य असते. पश्चिमी चक्रावाताचा अंदाज व्यक्त करण्यासाठी हवामान विभागाकडून भूमध्य समुद्रातील हालचालींवर दर अर्ध्या तासाने लक्ष ठेवण्यात येते. सिंह म्हणाले की, आता इतक्यात लगेचच उत्तर भारत आणि चंदीगड येथे आणखी पश्चिमी चक्रावत धडकण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही, पण भविष्यात आणखी पश्चिमी चक्रावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.