पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून (१७ सप्टेंबर) दक्षिण आफ्रिकेतून आठ चित्ते भारतात आणले होते. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी आणखी १२ चित्ते भारतात आणले गेले. एकूण २० चित्त्यांपैकी २७ मार्चला ‘साशा’ या मादी चित्त्याचा आणि २३ एप्रिलला ‘उदय’ या नर चित्त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल (९ मे) ‘दक्षा’ या मादी चित्त्याच्या मृत्यूने आता या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. २३ एप्रिल रोजी जेव्हा उदयचा मृत्यू झाला होता, तेव्हाच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गांधी सागर अभयारण्य येथे चित्त्यांना हलविण्याची तयारी सुरू केली होती. कुनो अभयारण्य चित्त्यांच्या अधिवासासाठी अपुरे पडत असल्याची बाब तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. चित्त्यासारखे मांसाहारी प्राणी एवढ्या मोठ्या संख्येने आफ्रिका आणि नामिबियातून दुसऱ्या खंडात स्थलांतर करण्याची ही पहिलीच घटना आहे. कुनोमध्ये २० पैकी आता १७ चित्ते उरले आहेत. चित्त्यांच्या मृत्यूची कारणे काय आहेत? छोट्या जागेत ठेवणे चित्त्यांसाठी धोकादायक का असते? याचा घेतलेला आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला?

मध्य प्रदेशच्या वनविभागाने प्रेस नोट काढून दि. ९ मे रोजी दक्षाचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती दिली आहे. ९ मे रोजीच्या सकाळी मादी दक्षा आणि इतर नर चित्ता मैथुनासाठी जवळ आले असताना त्यांच्यात झालेल्या झटापटीत दक्षा जखमी झाली. चित्त्यांमध्ये मैथुन प्रक्रियेदरम्यान नर आणि मादी हिंसक होण्याचा प्रकार सामान्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वन विभागाच्या प्रेस नोटमध्येदेखील ही बाब नमूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत टेहळणी करणाऱ्या पथाकाला नेहमीच मध्यस्थी करणे आणि नर आणि मादीला वेगळे करणे प्रत्यक्षात शक्य होत नाही, असाही खुलासा करण्यात आला आहे.

हे वाचा >> नागपूर : शास्त्रज्ञांच्या सूचनांकडे केलेलं दुर्लक्ष चित्त्यांच्या मुळावर; ‘साशा’, ‘उदय’नंतर आता दक्षाचा मृत्यू

चित्त्यांचे दुर्दैवी मृत्यू अनपेक्षित होते?

चित्यांचा मृत्यूदर अधिक असू शकतो, असे चित्ता प्रकल्प राबविताना गृहीत धरण्यात आले होते. याच कारणामुळे पहिल्या वर्षात ५० टक्के चित्ते जिंवत राहतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. म्हणजेच २० पैकी १० चित्ते जगतील असा हिशेब मांडण्यात आला होता. चित्ता प्रकल्पावर अनेक तज्ज्ञ मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कुनो अभयारण्याची क्षमता २० चित्ते ठेवण्याएवढी नाही, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले होते. कुनो अभयारण्यात या प्रकल्पावर प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही हेच अनुमान होते. चित्ता प्रकल्प तडीस नेताना नेमके याकडेच दुर्लक्ष झाले.

पहिले दोन मृत्यू झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने चंबळ नदीच्या खोऱ्यातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यांत गांधी सागर अभयारण्य तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केला. काही चित्ते राजस्थानमधील मुकुंद्रा व्याघ्र प्रकल्पात हलविले जातील, अशीही चर्चा मध्यंतरी झाली.

चित्ते का मरण पावतात?

दक्षिण आफ्रिकेने चित्त्यांच्या मृत्यूवर संशोधन करून काही आडाखे बांधले आहेत. २९३ चित्त्यांच्या मृत्यूचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. चित्त्यांसाठी विविध कॅम्प लावले जातात, ज्यामध्ये ६.५ टक्के चित्त्यांचा मृत्यू झाला, आजार किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलविल्यामुळे ७.५ टक्के चित्ते मृत पावले आणि ट्रॅकिंग डिव्हाईसमुळे ०.७ टक्के चित्त्यांचा मृत्यू झाला. या तीनही कारणांमुळे मरणाऱ्या चित्त्यांची संख्या १५ टक्क्यांपर्यंत जाते. याचा अर्थ प्रत्येक सात चित्त्यांपैकी एका चित्त्याचा मृत्यू मानवी हाताळणी आणि व्यवस्थापनामुळे झाला असल्याचे दिसून येते.

चित्त्यांचा मृत्यू होण्यामागे शिकार हे एक मोठे कारण समजले जाते. यामुळे जवळपास ५३.२ टक्के चित्ते मरण पावतात. सिंह, बिबटे, तरस आणि जॅकल्स (जंगली कुत्र्यांची प्रजाती) यांच्यात शिकारीच्या कारणामुळे होणारा संघर्ष यासाठी कारणीभूत ठरतो. वार्थहॉग्स (आफ्रिकेतील जंगली डुक्कर), बबून्स (कुत्र्यासारखे लंबुडके तोंड असलेले माकड), हत्ती, मगर, गिधाडे, झेब्रा आणि शहामृग हेदेखील प्रसंगी चित्त्याला मारू शकतात. चित्त्याचा मृत्यूदर हा इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. संरक्षित परिसरात हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आहे. दक्षिण आफ्रिकेतील ८० टक्के चित्ते संरक्षित आणि राखीव क्षेत्राच्या बाहेर जिवंत राहिले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे वाचा >> अन्वयार्थ: चित्ता-मृत्यूंची चिंता

आफ्रिकेत चित्त्यांची शिकार करण्यात सिंह सर्वात पुढे आहेत. भारतात गुजरात वगळता इतर ठिकाणी सिंह फार नाहीत. तसेच चित्ते ठेवलेल्या ठिकाणी बिबट्यांचाही वावर कमीच आहे. दीर्घकालीन विचार करताना चित्ते आणि बिबटे यांना एकत्र ठेवणे परवडणारे नाही. अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानात या दोन प्राण्यांमध्ये होणारा संघर्ष टाळण्यासाठी त्यांना दूर ठेवण्याचे धोरण प्रकल्पतज्ज्ञांनी स्वीकारले आहे.

साशा आणि उदयच्या मृत्यूची कारणे काय आहेत?

साशाचा मृत्यू किडनीशी संबंधित आजारामुळे झाला असल्याचे सांगितले गेले. जर साशाला किडनीचा संसर्ग होऊ शकतो तर इतर चित्त्यांनाही हा धोका उद्भवू शकतो, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच उदयला अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे, जी एक शक्यता आहेच. विषबाधा होण्याचा धोका इतरांनाही होऊ शकतो. तसेच दीर्घकाळ बंदिस्त वातावरणात (अभयारण्यात केलेल्या तात्पुरत्या चौक्या) ठेवल्यामुळे चित्त्यांमध्ये नैराश्य आले आहे का? भारतात आणण्यापूर्वी आफ्रिका आणि भारतात आणल्यानंतर काही दिवस विलगीकरण कक्षात असताना चित्त्यांना जे मांस खायला दिले गेले, त्यामुळे त्यांच्या शरीरातील सूक्ष्मजीवांच्या संख्येत काही बदल झाले आहेत का? असे काही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.

सध्याच्या चित्ता प्रकल्पासाठी काय पर्याय आहेत?

दक्षिण आफ्रिकेने राबविलेल्या उपाययोजनांचा आधार घेऊन चित्ता प्रकल्प राबविला जाऊ शकतो. आरक्षित अभयारण्यात कमी संख्येने चित्ते ठेवले जाऊ शकतात. तसेच भारतात चित्ते आणण्यापूर्वी अभयारण्यात पुरेशी सिद्धता झालेली नव्हती. त्यामुळे आता चित्त्यांना सुरक्षित अधिवास पुरविण्यासाठी घाई करावी लागत आहे.

चित्ता भारतातून १९५२ मध्येच नामशेष

१९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशातील जंगलात सोडण्यात आलेले चित्ते नामिबियातील आहेत. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये आठ चित्ते सोडले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते चित्ते सोडणे हा भारतातील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि वैविध्य आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात आठ चित्ते आणले. या चित्त्यांची चर्चा चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदाच भारतात चित्ते पाहिले गेले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What causes cheetah deaths and why confining them may not help kvg
Show comments