What is Fossilized Dinosaur Dung? सरड्या सारखे दिसणारे मात्र सुरुवातीच्या काळात आकाराने लहान असणारे असे डायनासोर २३० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरू लागले. त्यावेळी पृथ्वीवर असलेल्या तीक्ष्ण दातांच्या, मोठ्या आणि अधिक भयानक सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ते अगदीच लहान वाटत होते. परंतु ३० दशलक्ष वर्षांनी या प्राचीन सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी अनेक नामशेष झाले आणि डायनासोरनी पृथ्वीवर अधिराज्य गाजवले. या प्राण्यांनी जगभर राज्य कसे केले हे ठरवणे कठीण आहे, कारण त्यांच्या प्रारंभिक कालखंडातील अवशेष योग्य अवस्थेत जतन न झाल्याने अवशेषांची कमतरता आहे. त्यामुळेच संशोधकांच्या एका गटाने अलीकडेच डायनासोरच्या जीवाश्मयुक्त विष्ठा आणि उलटीचा अभ्यास केला. ‘जीवाश्मयुक्त विष्ठा आणि उलटीला ब्रॉमालाइट्स म्हणतात. अलीकडेच नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात वैज्ञानिकांनी या घटकांवर संशोधन करून सुमारे ३० दशलक्ष वर्षांतील प्रारंभिक डायनासोर हे आजच्या पोलंडचा भाग असलेल्या प्राचीन प्रदेशातील अन्नसाखळीत कसे नेमके बसले याचा अभ्यास केला आहे.
डायनासोरची विष्टा नेमका कोणता इतिहास सांगते?
सर्वात प्रसिद्ध ब्रॉमालाइट्स म्हणजे जीवाश्मयुक्त विष्ठा त्यास ‘कॉप्रोलाइट्स’ देखील म्हणतात. ब्रॉमालाइट्समध्ये पचन प्रक्रियेतील इतर अवशेष जसे की उलटी आणि पचनव्यवस्थेतील अन्नाचे अवशेष देखील जतन होतात. त्यामुळे प्राचीन परिसंस्थांमध्ये संबंधित प्राण्याने कोणाचे भक्षण केले याचा शोध संशोधकांना घेता येतो.
अधिक वाचा: Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
ब्रॉमालाइट्स
“ब्रॉमालाइट्स अनेकदा विनोदाचा विषय ठरतो,” असे पुराजैवशास्त्रज्ञ स्टीफन ब्रुसाटे यांनी सांगितले. ते सांगतात, हे ब्रॉमालाइट्स प्रारंभिक डायनासोरांच्या परिसंस्थेबद्दल महत्त्वपूर्ण पुरावे जतन करतात. “लाखो वर्षांपूर्वीच्या भक्ष्य आणि भक्षक यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी हे अगदी योग्य साधन आहे”. ट्रायसिक कालखंडातील डायनासोरवरील संशोधन प्रामुख्याने जीवाश्म हाडांवर केंद्रित झाले आहे. मात्र, स्वीडनमधील उप्साला विद्यापीठाचे पुराजैवशास्त्रज्ञ मार्टिन क्वार्नस्ट्रॉम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याऐवजी पोलिश बेसिनमधील ब्रॉमालाइट नमुन्यांवर लक्ष केंद्रित केले. मध्य पोलंडमधील हा भूगर्भीय प्रदेश उत्तर ट्रायसिक कालखंडापासून ज्युरासिक कालखंडापर्यंत विस्तारतो. पुराजैवशास्त्रज्ञांनी या प्रदेशातील विविध जीवांची जीवाश्म हाडे, पावलांचे ठसे तसेच शार्क, विशाल उभयचर आणि डायनासोरसह विविध प्राण्यांची जीवाश्मयुक्त विष्ठा आणि उलटीचे नमुने शोधले आणि तपासलेही.
अभ्यास कसा करण्यात आला?
या नव्या अभ्यासामध्ये ५०० हून अधिक ब्रॉमालाइट नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. ज्यांचे एकूण वजन २२० पौडांपेक्षा अधिक होते. हे नमुने खडकांच्या रेकॉर्डमधील पाच वेगवेगळ्या कालखंडांमधून गोळा करण्यात आले. काही ब्रॉमालाइट्सना आडव्या छेदांमध्ये कापण्यात आले, तर काहींना मायक्रो-CT स्कॅन करून तपासण्यात आले.
संशोधनात आढळलेली निरीक्षणे
या पद्धतींमुळे प्राचीन जीवांच्या आहाराच्या सवयींबद्दल सविस्तर माहिती मिळाली:
काही ब्रॉमालाइट्समध्ये झाडांची पाने आणि सुस्थितीत असलेल्या कीटकांचे अवशेष सापडले. ज्यामध्ये अँटेना अजूनही शाबूत होते. इतरांमध्ये माशांची हाडे आणि तुटलेल्या दातांचे तुकडे सापडले. या तपशीलवार विश्लेषणामुळे प्राचीन परिसंस्थांतील जीवांचे आहार आणि भक्ष्य- भक्षक संबंध समजून घेण्यास मदत झाली.
प्रारंभिक डायनासोरच्या आहाराचा शोध
अनेक ब्रॉमालाइट्सच्या विश्लेषणातून स्पष्ट झाले की, प्रारंभिक डायनासोर हे संधीसाधू सर्वभक्षी (opportunistic omnivores) होते, प्रामुख्याने कीटकांवर त्यांची उपजीविका चालत असे. यानंतरच्या कालखंडातील डायनासोरची विष्ठा प्रामुख्याने मांसभक्षी (carnivores) आणि शाकाहारी (herbivores) डायनासोरची होती.
आहारात बदल:
- सुरुवातीचे डायनासोर: प्रामुख्याने कीटकभक्ष्यी होते.
- नंतरचे डायनासोर: लहान मांसभक्ष्यी आणि शाकाहारी डायनासोर उदयास आले.
- मोठे शाकाहारी डायनासोर: नंतरच्या ब्रॉमालाइट्समधून मोठ्या शाकाहारी डायनासोर ‘सॉरोपोडोमॉर्फ्स’ यांच्या आहाराचे पुरावे मिळाले.
- मोठे मांसभक्षी डायनासोर: प्रारंभिक ज्युरासिक काळातील जमा केलेल्या ब्रॉमालाइट्समधून मोठ्या शिकारी डायनासोरचे अस्तित्व दिसून आले, त्यांनी मोठ्या शाकाहारी प्राण्यांची शिकार केली होती.
या अभ्यासामुळे प्रारंभिक डायनासोरच्या आहारातील आणि त्यांच्या पर्यावरणाशी अनुकूल होण्यात झालेल्या बदलांचा सखोल अंदाज आला.”या संशोधनाचे निष्कर्ष असे दर्शवतात की, डायनासोरनी हळूहळू जगावर नियंत्रण मिळवले,” असे उप्साला विद्यापीठातील पुराजैवशास्त्रज्ञ आणि क्वार्नस्ट्रॉम यांचे सहलेखकग्रेगॉर्ज नीड्झविड्झ्की (Grzegorz Niedzwiedzki) सांगतात. “ट्रायसिक कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यात असे काहीतरी घडले की ज्यामुळे डायनासोरना ज्युरासिक कालखंडात प्रवेश करण्याचा मोठा मार्ग खुला झाला.” त्यामुळे नेमके काय घडले, हे समजण्यासाठी संशोधकांच्या टीमने ब्रॉमालाइट नमुन्यांमधून करण्यात आलेल्या निरीक्षणांची तुलना हाडांच्या जीवाश्मांशी आणि प्राचीन हवामानाच्या (पॅलिओक्लायमेट) डेटा बरोबर केली.
अधिक वाचा: 1,700-year-old Roman egg: १,७०० वर्ष जुन्या अंड्यानं उलगडली रोमन काळातील गुपितं!
महत्त्वाचे निष्कर्ष
- भौगोलिक आणि ज्वालामुखीत बदल: टेक्टॉनिक्स आणि ज्वालामुखीच्या क्रियाकलापांमुळे पोलिश बेसिनमधील स्थानिक हवामान बदलले आणि वनस्पती अधिक वैविध्यपूर्ण झाल्या.
- शाकाहारी डायनासोरसाठी लाभ: या समृद्ध वनस्पतींनी शाकाहारी डायनासोरसाठी एक प्रकारची “भोजन मेजवानी” उपलब्ध करून दिली. या डायनासोरांच्या विष्ठेत अधिक वैविध्यपूर्ण वनस्पती आढळल्या, ज्या अधिक विशिष्ट शाकाहारी प्राण्यांच्या (उदा. डाइसिनोडोंट्स – गेंड्यांपेक्षा मोठ्या सस्तन प्राण्यांच्या पूर्वज) तुलनेत अधिक होत्या.
वनस्पतींच्या वैविध्यामुळे शाकाहारी डायनासोर अधिक प्रबळ झाले आणि त्यांना ज्युरासिक कालखंडात मोठ्या प्रमाणावर विकसित होण्याची संधी मिळाली. “नव्या प्रकारच्या वनस्पती खाण्याची आणि पचवण्याची क्षमता ही शाकाहारी डायनासोरना आधीच्या वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांपेक्षा अधिक फायदा देणारी ठरली असावी,”असे क्वार्नस्ट्रॉम यांनी नमूद केले. पोलिश बेसिनमधील जीवाश्म रेकॉर्डमध्येही हा बदल दिसून येतो, जिथे डाइसिनोडोंट्स ज्युरासिक कालखंडाच्या सुरुवातीपर्यंत नाहीसे झाले, तर प्रारंभिक सॉरोपोड्स आणि इतर वनस्पती खाणारे डायनासोर मोठ्या प्रमाणावर फोफावले. या संशोधनाने जरी प्रामुख्याने पोलिश बेसिनवर लक्ष केंद्रित केलेले असले, तरी संशोधकांचे मत आहे की इतर भागांमध्येही याच प्रकारचे पर्यावरणीय बदल घडले असावेत. “कदाचित ट्रायसिक आणि ज्युरासिक युगातील कॉप्रोलाइट्स जगभरात अनेक ठिकाणी सापडतील,”असे नीड्झविड्झ्की म्हणाले.