What Does ‘Allahu Akbar’ Mean? पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्या प्रसंगी काय घडले असे सांगणारे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्यातीलच एक व्हिडीओ ऋषी भट्ट नावाच्या पर्यटकाचा आहे. हल्ला झाला त्यावेळी तो झिपलाइनवर राइड घेत होता, त्यामुळे याचे प्राण वाचले. नंतर त्या घटनेबद्दल सांगताना ऋषी भट्ट म्हणाले की, गोळीबाराच्या वेळेस त्यांच्या झिपलाइन ऑपरेटरनेही अल्लाहू अकबर म्हटले होते. काही क्षणातच गोळीबार सुरू झाला. गोळीबाराच्या वेळी ते झिपलाईन राईड घेत होते, त्यामुळेच ते वाचले.

‘अल्लाहू अकबर’चा घोष

ते म्हणाले, राईड संपताच मी तातडीने सेफ्टी बेल्ट काढला आणि माझ्या पत्नी आणि मुलाच्या दिशेने धावलो. पत्नीने मला सांगितलं की, दहशतवाद्यांनी दोघांना ठार केलं आहे. त्यांना धर्म विचारण्यात आला आणि नंतर गोळ्या घालण्यात आल्या. मीदेखील त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन मृतदेह पाहिले. तर, पुण्यातील एका महिलेने अशाच प्रकारचा अनुभव सांगितला. या महिलेच्या पतीला दहशतवाद्यांनी ठार केलं. तिने सांगितलं की, दहशतवादी पुरुषांना कलमा म्हणायला लावत होते. तर, काही महिलांनी आपली ओळख लपवण्यासाठी कपाळावरील टिकली काढून टाकली आणि जीव वाचवण्यासाठी ‘अल्लाहू अकबर’चा घोष केला.

आयफेल टॉवरचा हल्ला

किंबहुना जगभरात अशाच दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यात आल्याच्या घटना सर्वश्रुत आहेत. २ डिसेंबर २०२३ रोजी जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर एका व्यक्तीने अल्लाहू अकबर अशी घोषणा देत, तेथे असलेल्या पर्यटकांवर हल्ला केला, त्या हल्ल्यात तीन पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

गैरसमज कुणामुळे?

अशाच स्वरूपाच्या घटना इतर काही ठिकाणी घडल्या होत्या त्याही वेळेस याच घोषणांचा वापर आक्रमकांनी केला होता. ही घोषणा इस्लामशी संबंधित आहे. त्यामुळे दहशतवादी, किंवा तत्सम इस्लामी माथेफिरूंनी अशी घोषणा देऊन दुष्कृत्य केल्यामुळे सहाजिकच या घोषणेला नकारात्मक वलय प्राप्त झाले आहे. किंबहुना या जयघोषाचा नेमका मथितार्थ काय असू शकतो हे जाणून न घेता, ते काहीतरी चुकीचेच असल्याचा समज होतो. त्यामुळे अल्लाहू अकबर हा जयघोष नेमका काय आहे हे समजून घेणे निश्चितच महत्त्वाचे ठरणारे आहे.

अल्लाहू अकबर म्हणजे नेमके काय?

प्रचलित अर्थानुसार अल्लाहू अकबर म्हणजेच ‘देव सर्वात महान आहे’ असा त्याचा अर्थ होतो. आपल्या ऐकण्यात अल्लाहू अकबर हे नेहमी येत असले तरी या वाक्प्रचाराला/ घोषणेला/ प्रार्थनेला अरबी भाषेत ‘तकबीर’ असे संबोधले जाते. त्यामुळे या प्रार्थनेला आपण सामान्यतः घोषणा, जयघोष, किंवा नारा असे जरी म्हणत असलो तरी मुस्लिम धर्मात याचा उल्लेख ‘तकबीर’ असाच केला जातो. तकबीर हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. जगभरातील मुस्लिम आणि अरब लोकांद्वारे हा वाक्प्रचार विविध संदर्भांसाठी वापरला जातो. औपचारिक नमाज (प्रार्थना), अजान (इस्लामिक प्रार्थना), संकटाच्या वेळी किंवा आनंद, किंवा दृढनिश्चय किंवा अवज्ञा व्यक्त करण्यासाठी ही प्रार्थना केली जाते.

कबीर, अकबर आणि तकबीर यांच्यात नेमका संबंध काय?

कबीर शब्द आपल्या सर्वांनाच माहीत आहे. प्रसिद्ध संत कवी कबीर यांच्यामुळे या नावाची महती भारतीयांसाठी विशेषच आहे. कबीर हा शब्द प्रोटो-सेमिटिक मूळ k-b-r मधून आला आहे, ज्याचा अर्थ “मोठा”, “जुना” किंवा “महान” असा होतो. (सेमिटिक भाषा म्हणजे हिब्रू, अरामी, अरबी आणि इथिओपिकसह आफ्रो-आशियाई भाषा कुटुंबाच्या उप-कुटुंबातील एक भाषा). कबीर हा मूलतः अरबी शब्द आहे. कबीर हे विशेषण आहे, त्याचा अर्थ “ज्याच्याकडे मोठेपणा आहे” असा आहे.

कबीर ते अकबर

अल-कबीर हे अल्लाहच्या नावांपैकी एक आहे. अरबी शब्द अकबर हे कबीर या विशेषणाचे इलेक्टिव्ह रूप आहे, ज्यावेळेस हा शब्द तकबीरमध्ये वापरला जातो त्यावेळेस त्याचे भाषांतर सर्वात मोठा/ मोठे असे होते, तकबीर ही k-b-r या धातुच्या स्टेम II ची मौखिक संज्ञा आहे (सेमिटिक क्रियापदांचे रचनेच्या आधारावर विविध गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. हे गट स्टेम म्हणून ओळखले जातात), ज्याचा अर्थ “मोठा” असा आहे, ज्यावरून अकबर (Great) हा शब्द आला.

अल्लाहू अकबर

अल्लाहू म्हणजे अल्लाह, म्हणजे ‘विशिष्ट (इस्लामिक) देव’. एकूणच अल्लाहू अकबर म्हणजे (इस्लामिक) देव सर्वांपेक्षा मोठा आहे. “अल्लाहू अकबर” हा इस्लामिक विश्वास प्रणालीचा सर्वात महत्वाचा पैलू असून याद्वारे ईश्वराची महानता आणि सर्वोच्च सामर्थ्य स्वीकारणे हे होय. “अल्लाहू अकबर” म्हणताना, आस्तिक हे सत्य मान्य करतो की तो स्वत: महान नाही. यामुळे आस्तिकामध्ये नम्रतेची भावना निर्माण होते, हे या जयघोषाचे सार आहे. असे असले तरी यामागील गूढार्थ देखील आहे.

ही प्रार्थना जशी मुलाच्या जन्मानंतर देवाची स्तुती करण्यासाठी वापरली जाते तशीच इस्लामिक अंत्यसंस्कार आणि दफन प्रथेच्या वेळीही उच्चारली जाते. ईद-अल-अधा या सणाच्या वेळी आणि त्याच्या आधीच्या दिवसांत, मुस्लिम तकबीरचे पठण करतात. हे विशेषतः अराफाच्या दिवशी होते. धबीहा करत असताना देवाच्या नावाचा उच्चार करताना “बिस्मिल्ला अल्लाहू अकबर” असे म्हणतात. “अल्लाहू अकबर” ही प्रार्थना/ घोषणा उत्सवापासून दु:खाच्या वेळेपर्यंत विविध परिस्थितींमध्ये केली जाते. तकबीरचा उपयोग आनंद किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी केला जातो. इतकेच नाही तर युद्धाच्या वेळी ही हा घोष करतात. ऐतिहासिकदृष्ट्या, तकबीरचा उपयोग विजयाचा जयघोष म्हणूनही केला जातो. इब्न इशाकच्या ८ व्या शतकातील पुस्तकात मुहम्मदच्या जीवनात मुहम्मदने युद्धादरम्यान तकबीरची घोषणा केल्याचे दोन प्रसंग सांगितले आहेत. म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात अल्लाहू अकबर ही प्रार्थना/घोषणा केली जाते.

दहशतवाद्यांकडून वापर

मुस्लीम दहशतवादी या घोषणेचा उल्लेख अनेकदा करताना दिसतात. दहशतवाद्यांनी या प्रार्थनेचा/ घोषणा वापर लढाईसाठी केला आहे. या वापराचा इतर मुस्लिमांनी निषेध केलेला असला तरी दहशतवादी कृत्यांमुळे या प्रार्थनेला नकारात्मक वलय प्राप्त झाले आहे. मूलतः जीवनाच्या कोणत्याही प्रसंगी या घोषणेला स्थान असल्याने मुस्लिम दहशतवादी आपल्या क्रूर कृत्यांच्यावेळीही ही घोषणा करतात, असे इतर मुस्लिमांकडून सांगण्यात येते. या घोषणेचा दहशतवादाशी संबंध प्रसारमाध्यमांनी वाढवला आहे, तसेच काल्पनिक चित्रपट आणि विविध टीव्ही शो देखील त्याचा उपयोग सिनेमॅटिक ट्रॉप म्हणून करतात, त्यामुळे दहशतवाद आणि अल्लाहू अकबर याचा संबंध अधिक दृढ झाल्याचे मत प्राध्यापक खालेद ए. बेदौन यांनी ‘द न्यू क्रुसेड्स: इस्लामोफोबिया अँड द ग्लोबल वॉर ऑन मुस्लिम’ या पुस्तकात मांडले आहे.

इलाह आणि अल्लाह हे वेगळे शब्द

ही एक बाजू असली तरी नाण्याला दुसरी बाजूदेखील आहे. मूलतः इस्लामिक धारणेनुसार अल्लाहच्या नावाचे भाषांतर गॉड, ईश्वर, परमेश्वर असे केले जाऊ शकत नाही. अल्लाह नामाचे भाषांतर होत नाही. अल्लाहचे नाव सर्व भाषांमध्ये स्थिर आहे. अल्लाह म्हणजे देव किंवा गॉड नाही, अरबी भाषेत गॉड, देवता यांसाठी ‘इलाह’ हा शब्द येतो, या शब्दाचे मूळ प्रोटो सेमेटिक मध्ये आहे. इलाह आणि अल्लाह हे वेगळे शब्द आहेत, “ला इलाहा इल्लल्लाह”, “मुहम्मदूं रसूल अल्लाह” म्हणजेच अल्लाह शिवाय दूसरा देव कोणीही नाही”. यात इलाह आणि अल्लाह असे दोन वेगळे शब्द आले आहेत.

अकबर म्हणजे ग्रेटर

अरबी भाषेतील इलाहचे, एल-इलाह होऊन अर्माइक भाषेत अल्लाह होते म्हणजे ठराविक गॉड किंवा देव बाकीच्या धर्मांमध्ये त्यांच्या उपास्य देवतांसाठी भाषेनुसार संदर्भ वेगवेगळे येतात परंतु अल्लाहसाठी तो नियम नाही, वर नमूद केल्याप्रमाणे अरबी भाषेत कबीर म्हणजे ग्रेट-मोठा, तर अकबर म्हणजे ग्रेटर-सर्वोच्च. अल्लाह हू अकबर यामध्ये ‘माझा इष्ट हा सर्वश्रेष्ठ आहे’, अशी भावना दडलेली असल्याचे काही इस्लामचे अभ्यासक सांगतात, म्हणून वरकरणी अल्लाहू अकबरचे भाषांतर ग्रेट गॉड असा असला तरी त्यामागील भावार्थ माझा धर्म-देव मोठा आहे, असा आहे. कुराणाच्या ९ व्या धड्यातील ३३ व्या श्लोकात ‘सर्व धर्मांवर विजय आणि काफिरांना विरोध’ असा संदर्भ आढळतो, त्यामुळे अकबर या शब्दातून झळकणारी वर्चस्वाची भावना आणि दहशतवाद यांचा संबंध प्रस्थपित होतो, असेही अभ्यासक नमूद करतात.

ख्रिश्चनांद्वारे वापर

अल्लाह हू अकबर ही एक प्रार्थना- जयघोष आहे. याचा वापर अरबी भाषिक ख्रिश्चनदेखील करतात. देव, परमेश्वर, ईश्वराला अरबीमध्ये “अल्लाह” म्हटले जाते. त्यामुळेच ईश्वराप्रती आपल्या भावना प्रकट करण्यासाठी पॅलेस्टिनी ख्रिश्चनांमध्ये ही प्रार्थना केली जाते. हे जरी खरे असले तरी या अल्लाहू अकबरचा संबंध इस्लामशी नसून भाषाशास्त्राशी आहे.