CRINK हा शब्द चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया या देशांच्या एकत्रित युतीसाठी वापरला जातॊ (C-चीन, R-रशिया, I-इराण, NK-उत्तर कोरिया). युक्रेनला वश करण्यासाठी हे चारही देश एकत्र आले आहेत. नाटो देशांच्या विरोधातील या देशांची युती CRINK म्हणून ओळखली जाते. या चारही देशांची युती आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या प्रकारचे आव्हान म्हणून उभी राहत आहे. या देशांमधील साहचर्य नाटोला इंडो- पॅसिफिक झोन मधील समविचारी देशांशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्यास भाग पाडते आहे. प्रथमच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि जपानमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ब्रुसेल्समध्ये नाटोच्या संरक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भाग घेतला. नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी त्याप्रसंगी पत्रकारांना सांगितले की, हे चारही देश नाटोच्या सहयोगी देशांबरोबर अधिकाधिक सहभागी होत आहेत, हे अत्यंत सकारात्मक आहे. इंडो-पॅसिफिक झोनमधील सद्यस्थितीतील धोका पाहता हे संबंध महत्त्वाचे आहेत.

रशिया युक्रेनविरुद्ध मदतीसाठी मित्र राष्ट्रांकडे वळला आहे

इराणने युक्रेनियन शहरांना नियमितपणे झळ पोहोचवणाऱ्या शाहद ड्रोनचा पुरवठा रशियाला केला आहे. किंबहुना लष्करी सल्लागारही तैनात केले आहेत. अमेरिका आणि युक्रेनने दावा केला आहे की, इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे देखील पाठवली आहेत, परंतु ही बाब तेहरानने नाकारली आहे. या दरम्यान उत्तर कोरियाकडून मोठ्या प्रमाणात तोफखाना दारुगोळा तसेच क्षेपणास्त्रांचा पुरवठा रशियाला होत आहे. हळूहळू युक्रेनमध्ये पुढे सरकत असलेल्या रशियन सैनिकांसाठी हे महत्त्वाचे आहे. याशिवाय उत्तर कोरियाने युद्धात लढण्यासाठी हजारोंचे सैन्य पाठवले आहे, असे कीवचे म्हणणे आहे. व्लादिमीर पुतीनच्या सैन्याला बीजिंग अर्थात चीन मदत करत असल्याचे वॉशिंग्टनने स्पष्टपणे सांगितले असले तरी चीनने रशियाला शस्त्रास्त्रे पुरवत नसल्याचा दावा केला आहे.

अधिक वाचा: BRICS Summit: ब्रिक्स म्हणजे काय? यंदाची शिखर परिषद भारतासाठी महत्त्वाची का आहे?

असे असले तरी दुसऱ्या बाजूला चीन रशियन इंधनदेखील विकत घेत आहे. गेल्याच आठवड्यात, रशियन आणि चिनी अधिकारी बीजिंगमध्ये भेटले आणि एकत्र काम करण्याच्या आणाभाकाही झाल्या. अलीकडच्या काही महिन्यांत दोघांनी संयुक्त लष्करी कवायतीही केल्या आहेत. रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांनी बैठकीनंतर सांगितले की, “आमची मते समान आहेत, आम्ही परिस्थितीचे एकसमान मूल्यांकन करतो, आम्ही एकत्र काय काम करू शकतो याची आम्हाला समज आहे.” दुसऱ्या बाजूला युक्रेनचे सहयोगी कीवला महत्त्वपूर्ण लष्करी मदत पुरवत आहेत. परंतु पुरवठा निर्बंधासह केला जात आहे. तर मॉस्कोचे भागीदार शस्त्रसाठ्याचा पुरवठा मुक्तहस्ते करत आहेत.

क्रिंक जवळ येण्यामुळे काय घडत आहे?

क्रिंक जवळ येण्यामुळे नाटोला जगाच्या दुसऱ्या बाजूच्या लोकशाही देशांशी आपले संबंध घट्ट करण्यास भाग पडत आहे. फिलिपिन्स- तैवान यांना चीनपासून असणारा धोका नोटाशी जवळीक निर्माण करण्यास उपयुक्त ठरत आहे. यासंदर्भात व्यक्त होताना रुटे म्हणाले, आम्ही चीनच्या मोठ्या सैन्य उभारणीबद्दल चिंता व्यक्त करतो. अमेरिका, नेदरलँड्स आणि ब्रिटन हे नाटो देशांपैकी आहेत. ज्यांनी चीनच्या विरोधात अन्य देशांशी करण्यात येणाऱ्या युतीत पुढाकार घेतला आहे. जपान आणि दक्षिण कोरियाला भेट देण्यासाठी अमेरिकेने आयोजित केलेल्या अशाच कार्यक्रमानंतर मार्क रुटे या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आघाडीच्या नाटो मुत्सद्दींसाठी दौऱ्याचे नेतृत्त्व करणार आहेत. परंतु, नाटोमध्ये पूर्वेकडील देशांशी संबंध वाढविण्यावर एकमत नाही. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनने उत्तर अटलांटिकच्या मूळ प्रदेशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा आग्रह धरून टोकियोमध्ये नवीन कार्यालय स्थापन करण्याच्या नाटोच्या योजनेला रोखण्यासाठी फ्रान्स पुढाकार घेत आहे. रशियाच्या सीमेवर असलेल्या काही मध्य युरोपीय नाटो देशांनाही नाटोने मॉस्कोशी संभाव्य युद्धासाठी त्यांचा प्रदेश तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि इंडो-पॅसिफिक अमेरिकेकडे सोडावे असे वाटते. दुसरीकडे, चीन अनेक वर्षांपासून नाटोला चार इंडो-पॅसिफिक देशांच्या जवळ न जाण्याचा इशारा देत आहे.

अधिक वाचा: मुंबईत तैवानचं आर्थिक केंद्र; चीनने दर्शवला विरोध, काय आहेत कारणं?

तर पोलंड आणि रोमानिया सारख्या काही युरोपियन देशांसाठी दक्षिण कोरिया मुख्य भागीदार म्हणून उदयास आला आहे. “२०२४ पर्यन्त दक्षिण कोरिया आणि NATO यांच्यातील संबंध कधीही इतके निकटचे नव्हते,” असे कोरियन तज्ज्ञ रॅमोन पाचेको पार्डो यांनी एप्रिल महिन्यात Vrije Universiteit Brussels’ Centre for Security, Diplomacy and Strategy मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे. युरोपियन देशांच्या तुलनेत दक्षिण कोरिया जलद गतीने संरक्षण उत्पादनात वाढ करू शकतो, असे या लेखात म्हटले आहे. तर इतर काही अभ्यासकांच्या मते नाटोला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाव आहे आणि भविष्य लक्षात घेता त्या प्रदेशातील त्यांच्या भागीदारांमध्ये नियमित संयुक्त लष्करी सरावासारखे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.