केजीएफ या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतरच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच केजीएफ चॅप्टर टू हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढलेत. आतापर्यंत या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. केजीएफ हे नावं कोलार गोल्ड फील्डस या नावाचा शॉर्टकट आहे. सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट कर्नाटकमधील कोलारमध्ये असणाऱ्या सोन्याच्या खाणींसंदर्भातील गोष्टीवर आधारित आहेत. या अशा खाणी आहेत जिथे खाणकाम करणारे मजूर हाताने खाणी खोदूनही त्यांना सोनं मिळायचं. १२१ वर्षांच्या इतिहासामध्ये या खाणींमधून ९०० टन सोनं काढण्यात आलंय. पण या खाणींची नेमकी कथा काय आहे जी सुपरस्टार यशच्या या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलीय. या खाणींमधून सोनं काढण्यास कधीपासून सुरुवात झाली, नेमकं हे प्रकरण काय आहे याच साऱ्या प्रश्नांवर टाकलेली नजर…
जगातील सर्वात खोल खाण
खरं तर हा एक खाणींचा समूह आहे. जी खाण चित्रपटामध्ये दाखवण्यात आलीय ती कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील मुख्य शहरापासून ३० किलोमीटर दूर रोबर्ट्सपेट नावाच्या तहसीलमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोनेंगड गोल्ड माइन्सनंतर कोलार गोल्ड फील्ड्स ही जगातील सर्वात खोल खाण आहे. म्हणजेच कोलार गोल्ड फील्डस ही जगातील दुसरी सर्वात खोल खाण आहे.
…अन् सोनं सापडलं
या खाणींसंदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. या कथा ऐकून ब्रिटीश सरकारमधील लेफ्टनंट जॉन वॉरेन हे या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते. या खाणींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जॉन यांनी गावकऱ्यांना एक आवाहन केलं. जी कोणती व्यक्ती खाणींमधून सोनं काढून आणेल त्याला बक्षीस दिलं जाईल, असं जॉन यांनी जाहीर केलं. बक्षीस मिळवण्यासाठी गावकरी बैलगाड्याभरुन खाणींमधून माती काढायचे आणि ती जॉन यांच्याकडे घेऊन जायचे. जॉन यांनी ही माती तपासून पाहिली असता त्यांना खरोखरच त्यामध्ये सोन्याचे अंश आढळून आले.
नक्की वाचा >> विश्लेषण : रॉकी भाईची ‘डोडम्मा’ खऱ्याखुऱ्या आयुष्यातही आहे फारच खतरनाक; जाणून घ्या KGF मधील अनोख्या मशीन गनची गोष्ट
५६ किलो सोनं मिळवलं…
त्यावेळी जॉन यांनी खाणींमधून ५६ किलो सोनं गावकऱ्यांच्या मदतीने काढलं. त्यानंतर १८०४ ते १८६० दरम्यान सोनं काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र अनेकांच्या काही कवडीही लागली नाही. या कालावधीमध्ये खाणकाम करणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाल्याने खाण बंद करण्यात आली.
सोन्याचे मोठे साठे सापडले…
१८७१ मध्ये या खाणींसंदर्भात संशोधन सुरु करण्यात आलं. निवृत्त ब्रिटीश सैनिक मायकल फिट्सगेराल्ड लेवेली यांनी १८०४ मध्ये एशियाटिक जर्नलमध्ये प्रकाशित एक अहवाल वाचला होता ज्यात या खाणींचा उल्लेख होता. लेवेली यांना ही माहिती वाचून फारच आश्चर्य वाटलं आणि ते निवृत्त झाल्यावर या खाणींच्या शोधात थेट भारतात आले. त्यांनी खाणींच्या आजूबाजूच्या १०० किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रवास केला आणि काही जागा निश्चित केल्या जिथे खोदकाम केल्यानंतर सोनं मिळण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे खरोखरच त्यांनी चिन्हांकित केलेल्या ठिकाणी सोन्याचे साठे आढळले.
पहिली परवानगी मैसूरच्या महाराजांनी दिली…
पहिल्यांदा या खाणींमधून मोठ्याप्रमाणात सोनं मिळाल्यानंतर जॉन यांनी १८७३ मध्ये मैसूरच्या महाराजांकडून खाणींच्या ठिकाणी खोदकाम करायला परवाने जारी करण्याची परवानगी मागितली. महाराजांने २ फेब्रुवारी १८७२ रोजी परवानगी दिली. त्यानंतर जॉन यांनी गुंतवणूकदार शोधले आणि खाणींचं खोदकाम करण्याचा पहिला परवाना ब्रिटनमधील जॉन टेलर अॅण्ड सन्स या कंपनीला दिलं.
९५ टक्के सोनं या खाणींमधून…
प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार त्यावेळी भारतामध्ये जेवढं सोनं निर्माण व्हायचं त्यापैकी ९५ टक्के सोनं हे केजीएफमधून यायचं. या खाणींमधून निघाणाऱ्या सोन्यामुळेच भारत जमिनीमधून सोनं काढणाऱ्या देशांमध्ये सहाव्या स्थानी पोहोचला. या खाणीमधून एकूण ९०० टन सोनं काढण्यात आल्याचं सांगितलं जातं.
ब्रिटीशांकडेच राहिला ताबा…
१९३० मध्ये कोलार गोल्ड फील्डमधील सोन्याचा साठा कमी होऊ लागला. भारत स्वातंत्र्य होईपर्यंत या खाणींवर इंग्रजांचं नियंत्रण होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५६ मध्ये या खाणींचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आले. सध्या ही खाण एक निर्जन स्थळ आहे. सोनं काढण्यासाठी जे मोठे खड्डे खोदण्यात आलेले तिथं आज पाणी साचलेलं आहे.
आजही इथं सोनं आहे पण…
तज्ज्ञांच्या मते या खाणींमध्ये अजूनही सोनं आहे. मात्र सध्याची या खाणींची परिस्थिती पाहता हे सोनं काढण्यासाठी जेवढा खर्च येईल तो सुद्धा बाहेर काढण्यात येणाऱ्या सोन्याच्या विक्रीतून निघणार नाही.