आयटी क्षेत्रात मिळणार्‍या सोयी-सुविधा, मोठमोठे पॅकेज अशा अनेक कारणांमुळे अनेकांना आयटी कंपनीत काम करण्याची इच्छा असते. परंतु, आयटी कंपनीतील कामाचा तणाव सर्वांनाच झेपेल असं नाही. अनेक आयटी कर्मचाऱ्यांना कामाच्या निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काम करावे लागत असल्याने ते त्रस्त आहेत. कर्नाटकमध्येही आता एका प्रस्तावावरून वाद सुरू झाला आहे. कर्नाटक सरकारने आयटी कर्मचार्‍यांसाठी कामाची वेळ १४ तास करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. खासगी उद्योगांमध्ये स्थानिकांसाठी नोकऱ्या राखीव ठेवण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर मोठा गदारोळ झाल्यानंतर या प्रस्तावावरही नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अद्याप या विषयावर काहीही सांगितलेले नाही. या प्रस्तावात नक्की काय? कामाच्या वाढलेल्या तासांचा एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकचा नवा प्रस्ताव काय?

प्रस्तावात असे म्हटले आहे की, सरकार कर्नाटक शॉप्स आणि कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना दिवसाचे १४ तास काम करता येईल. जर आठवडा पाच दिवसांचा असेल, तर कर्मचार्‍यांना आठवड्यातून ७० तास काम करावे लागेल. ‘कर्नाटक आयटी/आयटीएस एम्प्लोयी युनियन (केआयटीयू)’ च्या मते, हा बदल अमलात आणल्यास देशाचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूवर सर्वात मोठा परिणाम होईल.

हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा युक्रेनला भेट देणार? या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष; कारण काय?

‘केआयटीयू’ने या दुरुस्तीला विरोध करत म्हटले आहे की, हा कामगाराच्या मूलभूत अधिकारावरील हल्ला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याची तयारी ठेवावी, असे सुचविल्यानंतर हा प्रस्ताव आला आहे. त्यांच्या या विधानावरदेखील अनेकांनी टीका केली होती आणि आठवड्यातून ७० तास काम करणे अशक्य असल्याचे सांगितले होते.

अनेक आयटी कर्मचाऱ्यांना कामाच्या निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काम करावे लागत असल्याने ते त्रस्त आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

काम करण्यासाठी योग्य कालावधी किती?

कर्नाटक सरकारच्या या निर्णयाने पुन्हा एकदा काम करण्यासाठी योग्य तास किती? हा प्रश्न निर्माण केला आहे. काही मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कामगार यांनी हे निदर्शनास आणून दिले आहे की, जास्त तास म्हणजे अधिक उत्पादनक्षमता. वैज्ञानिक संशोधनातही हे सिद्ध झाले आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, काम करण्यासाठी दिवसाचे ७.६ तास योग्य आहेत. दिवसाचे ७.६ तास म्हणजे आठवड्याचे ३८ तास होतात. आणखी एका संशोधनात असे दिसून आले आहे की, आपल्यापैकी बहुतेक जण जास्तीत जास्त पाच तास कामावर लक्ष केंद्रित करू शकतात; ज्याचा अर्थ आठवड्याला २५ तास असा होतो. भारतात सरासरी कामाचे आठ तास आहेत, जे आठवड्याला ४० होतात. इतर देशाशी तुलना केल्यास आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने शेअर केलेल्या अलीकडील आकडेवारीनुसार, अमेरिकेत आठवड्यात ३८ तास काम केले जाते, चीनमध्ये ४६.१, जपानमध्ये ३६.६ आणि कॅनडामध्ये ३२.१ तास काम केले जाते.

जास्त तास काम केल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

विविध संस्था आणि स्वतंत्र संशोधकांनी आठवड्यातील ४० तासांच्या पलीकडे काम करण्याचे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक परिणाम पाहिले आहेत. ४० तासांच्या पलीकडे काम करण्याचे परिणाम घातक आहेत. काही गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू होऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. पहिली बाब म्हणजे ४० तासांपेक्षा जास्त काम म्हणजे बरेच तास एका जागी बसून राहणे. जास्त वेळ बसून राहिल्याने एखाद्या व्यक्तीचे वजन लक्षणीयरीत्या वाढू शकते. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स विकसित होण्याची शक्यता असते, या स्थितीत पायांच्या शिरांवर सूज येते, तसेच स्नायू कडक होतात आणि थकवाही येतो.

‘द फॅमिली डॉक्टर’च्या जनरल फिजिशियन आणि औद्योगिक आरोग्यातील प्रॅक्टिसिंग फिजिशियन डॉ. पद्मिनी नरहरी यांनी ‘डेक्कन हेराल्ड’ला सांगितले की, आठवड्यातून ७० तास काम केल्याने एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक स्थितीवर निश्चितपणे परिणाम होतो, विशेषत: आयटी क्षेत्रात काम करत असल्यास. कारण आयटी क्षेत्रातील कर्मचारी तीन ते सहा तास सलग सिस्टीमवर बसले असतात. तरुणांना स्पॉन्डिलायटिस आणि इतर समस्या जसे की त्यांच्या पाठ, मान आणि खांद्यामध्ये वेदना होऊ शकतात; ज्यामुळे त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती कमी होत जाते.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांचा धोका

संगणकावर काम करणार्‍या व्यक्तींनी दीर्घकाळ संगणक वापरल्याने त्यांच्या दृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. स्क्रीनकडे जास्त वेळ टक लावून पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे दृष्टी कमकुवत होणे, डोकेदुखी आणि डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. शिवाय संगणकाचा दीर्घकाळ वापर केल्याने तणाव आणि चिंताही वाढू शकते. निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काम केल्यास, त्याचा हृदयावरही परिणाम होतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसातून १० तासांपेक्षा जास्त काम केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांचा धोका ६० टक्क्यांनी वाढतो. एका डॉक्टरने असेही नमूद केले आहे की, जास्त काम केल्याने स्ट्रोक, इस्केमिक हृदयरोग, जास्त वजन, प्री-डायबेटिस, नैराश्य आणि इतर गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो.

अकाली मृत्यूचा धोका वाढतो?

याव्यतिरिक्त, संशोधनात असे दिसून आले आहे की, आठवड्यातून ४० तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या लोकांना टाइप २ मधुमेहाचा धोका जास्त असतो. हैदराबादमधील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये सांगितले, “जास्त वेळ काम केल्याने अनेक गंभीर आजार आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो.” त्यांनी या पोस्टमध्ये अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासांचादेखील उल्लेख केला. ते म्हणाले, “दर आठवड्याला ५५ किंवा त्याहून अधिक तास काम केल्याने स्ट्रोकचा धोका ३५ टक्के जास्त असतो आणि इस्केमिक हृदयरोगाने मृत्यू होण्याचा धोका १७ टक्के जास्त असतो. तसेच आठवड्यातून ५५ तासांपेक्षा जास्त काम केल्याने दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत असल्याच्या एका अभ्यासाविषयीही त्यांनी सांगितले.

मानसिक आरोग्यावरही परिणाम

आठवड्यातून ४० तासांपेक्षा जास्त काम केल्याने केवळ एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होतो असे नाही, तर त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, आठवड्यातून ४० तासांपेक्षा जास्त काम केल्याने नैराश्याचा धोका दुप्पट होतो. वेलनेस विदिनच्या संस्थापक आणि कॉर्पोरेट्ससाठी मानसिक आरोग्य प्रशिक्षक डॉ. रॅचेल जयसीलन यांनी ‘डेक्कन हेराल्ड’ला सांगितले की, ७० तासांचा कामाचा आठवडा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करू शकतो. नातेसंबंध, आरोग्य आणि आर्थिक नियोजन यांसारख्या बाबींमध्ये समतोल आवश्यक आहे आणि दीर्घ कालावधीसाठी काम केल्यास हा समतोल राखणे शक्य होणार नाही.

हेही वाचा : गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे भारतात ५ लाख लोकांचा मृत्यू? काय आहे कारण?

दीर्घकाळ काम केल्याने कामातील समाधान कमी होणे आणि कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, असे वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील इंटरनल मेडिसिन सल्लागार डॉ. हनी सावला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला सांगितले. आठवड्यातून ७० तासांहून अधिक वेळ काम केल्याने लोकांना चिंता आणि निराशा येऊ शकते; ज्यामुळे लोक दारू किंवा इतर अमली पदार्थांकडे वळू शकतात. मानसिक आरोग्यतज्ज्ञ हेदेखील सांगतात की, निराशेची भावना कमी न झाल्यास हिंसादेखील वाढू शकते. लोकांना पॅनिक डिसऑर्डर, फोबियास आदी समस्यादेखील उद्भवू शकतात. कामाच्या वाढलेल्या तासांमुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि कामाच्या ठिकाणी गैरहजेरी वाढते; ज्यामुळे संस्था तसेच कर्मचाऱ्यांसाठी इतर समस्या निर्माण होतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What does working for 70 hours a week do to the body rac