नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ या परीक्षेमध्ये झालेले गोंधळ आणि नंतर गैरप्रकारांच्या संशयावरून रद्द झालेली यूजीसी-नेट ही परीक्षा, यामुळे परीक्षांमधील गोंधळ हा विषय ऐरणीवर आला आहे. या दोन्ही परीक्षांचे संचलन करणारी केंद्र सरकारची स्वायत्त संस्था ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अर्थात ‘एनटीए’वरही टीका होत आहे. परीक्षांतील या गोंधळाच्या निमित्ताने ‘एनटीए’ नेमकी का स्थापन झाली होती, ती कशा प्रकारे परीक्षा घेते, त्यात काय बदल करायला हवेत याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एनटीए’ कधी आणि का स्थापन झाली?

मुळात भारतात प्रवेश परीक्षांचे पीक येऊन आता जेमतेम दोन दशके होत आहेत. त्यामुळे प्रवेश परीक्षा घेण्यासाठी अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्वतंत्र यंत्रणा नव्हती. देशपातळीवर होणाऱ्या वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) घेत होते. मात्र, प्रवेश परीक्षांसाठी सातत्याने वाढत असलेली विद्यार्थीसंख्या आणि त्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रियाबदल करणे ‘सीबीएसई’ला शक्य होत नव्हते. त्यामुळे परीक्षा घेणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, २०१७ मध्ये ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ची स्थापना झाली.

‘एनटीए’चा ध्येय काय आहे?

बहुतांश आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘जीआरई’ आणि ‘टोफेल’सारख्या परीक्षा घेणाऱ्या ‘एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस’च्या (ईटीएस) धर्तीवर ‘एनटीए’ची रचना असावी, अशी कल्पना होती. ‘ईटीएस’ ज्या व्यावसायिक पद्धतीने आणि सातत्याने संशोधन करून दर वर्षी परीक्षांत काही बदल करते, तसेच ‘एनटीए’ने करणेही अपेक्षित आहे. खुद्द ‘एनटीए’नेही आपल्या संकेतस्थळावर अशाच आशयाचा उद्देश नमूद केला असून, ‘संशोधनाधारित, विश्वासार्ह, पारदर्शक, न्याय्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मूल्यमापन करून शिक्षणातील समता आणि दर्जा सुधारणे, असा परीक्षांचा उद्देश असेल,’ असे ‘एनटीए’ने म्हटले आहे. त्यासाठी विषयतज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञानातील सेवा आणि सुरक्षितता व्यावसायिक आदींची मदत घेऊन सध्याच्या परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करण्याचा मनोदयही यात नमूद करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>‘नीट’साठी परीक्षा केंद्र कसं निवडलं जातं? परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी काय उपाययोजना केल्या जातात?

‘एनटीए’चे उद्दिष्ट काय आहे?

उमेदवारांच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी परिणामकारक, पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची चाचणी घेणे, हे ‘एनटीए’चे पहिले उद्दिष्ट आहे. शैक्षणिक, व्यावसायिक आणि चाचणी व्यवस्थेवर संशोधन करून ज्ञान व्यवस्थेत असलेल्या त्रुटी शोधून त्यावर उपाय करणे, परीक्षेचे प्रश्न तयार करण्यासाठी तज्ज्ञ आणि संस्था नेमणे, तसेच शैक्षणिक व व्यावसायिक विकास प्रमाणीकरणाबाबत माहिती गोळा करून आणि संशोधन करून त्याचा प्रसार करणे, अशी ‘एनटीए’ची अन्यही उद्दिष्टे आहेत.

‘एनटीए’ सध्या कोणकोणत्या परीक्षा घेते?

जेईई, नीट, यूजीसी-नेट, जीपॅट, सीमॅट, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची प्रवेश परीक्षा, हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा, ‘आयसीएआर’ची अखिल भारतीय प्रवेश परीक्षा, ‘आयआयएफटी’ची प्रवेश परीक्षा, ‘इग्नू’ची पीएचडी आणि ओपनमॅट परीक्षा, दिल्ली विद्यापीठाची प्रवेश परीक्षा आदी १२ विविध प्रकारच्या परीक्षा ‘एनटीए’ घेते.

हेही वाचा >>>बनावट दारू विषारी कशी होते? पिणाऱ्यांच्या जीवावर का बेतते?

स्वायत्त संस्था असूनही परीक्षांमध्ये गोंधळ का?

‘एनटीए’कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाइन किंवा संगणकाधारित पद्धतीने व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्या चर्चेत असलेली ‘नीट’ किंवा रद्द झालेली यूजीसी-नेट या परीक्षा पेन-पेपर पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. पेन-पेपर पद्धतीने परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिका तयार करून, त्या छापून घेण्यापासून परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविण्यापर्यंतच्या प्रक्रियांत विविध ११ ठिकाणी मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो. यातील कोणत्याही पातळीवर प्रश्नपत्रिका फुटणे शक्य आहे. ते टळावे, यासाठी ऑनलाइन किंवा संगणकाधारित परीक्षा घेणे आवश्यक आहे.

‘एनटीए’च्या नियामक मंडळावर सध्या कोण?

‘यूपीएससी’चे माजी अध्यक्ष प्रा. प्रदीपकुमार जोशी ‘एनटीए’चे अध्यक्ष आहेत. त्यांना विविध प्रकारच्या परीक्षांचे संचलन करण्याचा अनुभव आहे. सनदी अधिकारी सुबोधकुमार सिंग हे ‘एनटीए’चे महासंचालक आणि सदस्य-सचिव म्हणून काम पाहतात. याशिवाय जेईई-ॲडव्हान्स्ड परीक्षेचे आजी, माजी आणि भावी अध्यक्ष असलेले ‘आयआयटी’चे तीन संचालक, ‘आयसर’चे संचालक, ‘सीएसएबी’चे आजी आणि माजी अध्यक्ष असलेले ‘एनआयटी’चे दोन संचालक, आयआयएमएस, ‘जेएनयू’चे आणि ‘इग्नू’चे कुलगुरू, ‘नॅक’चे अध्यक्ष आदी सदस्य या मंडळावर असतात. तसेच, एक स्वतंत्र सदस्यही असतात.

siddharth.kelkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly does the nta organization which is in discussion due to the net scandal do print exp amy
First published on: 22-06-2024 at 07:44 IST