अमेरिकेने २ एप्रिल रोजी रीतसर ‘टॅरिफ कार्ड’ जारी करून कोणकोणत्या देशांवर किती आयातशुल्क आकारले जाईल, याची यादीच सादर केली. त्यांत नेमके कोणते निकष लावले, आकडेवारी, सूत्र काय वापरले याविषयी तपशील गोंधळात टाकणारा आहे. काही देशांविरुद्ध चढ्या दराने जशास-तसे शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लावले जाणार हे अपेक्षित होते. पण काही छोट्या देशांविरुद्ध प्रचंड टॅरिफ आकारून ट्रम्प प्रशासनाने साऱ्यांनाच गोंधळात टाकले.
कधी एक महिना, कधी एक वर्ष…
उत्तर अमेरिका खंडातील सेंट पिअरे अँड मिकेलों या देशाचे नावही कोणाला ठाऊक नसेल. ही आहे एक फ्रेंच स्वायत्त वसाहत. पण सध्या हे नाव गाजत आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या देशावर ५० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेतील एक अत्यंत गरीब देश लेसोथोवरही ही वेळ आली. अमेरिकेला सर्वाधिक निर्यात युरोपिय समुदायाकडून होते, पण त्यांच्यावरही २० टक्केच टॅरिफ आकारणी प्रस्तावित आहे. तर इतर फ्रेंच स्वायत्त वसाहतींपेक्षा पाच पट हे शुल्क आहे. वास्तविक सेंट पिअरे अँड मिकेलोंकडून केवळ एकदाच अमेरिकेत ३४ लाख डॉलर मूल्याच्या वस्तू पाठवल्या गेल्या. हा काळ होता गतवर्षी जुलै महिन्याचा. दोन वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारे त्या देशातून अमेरिकेत निर्यात झाली. आयात जवळपास काहीच नव्हती. स्वित्झर्लंडसाठी वेगळाच न्याय. गतवर्षी या देशातून नेहमीपेक्षा अधिक सोन्याची निर्यात अमेरिकेत झाली. यामुळे स्वित्झर्लंडकडे द्विपक्षी व्यापारात आधिक्य (ट्रेड  सरप्लस) आले. पण केवळ तेवढ्यावरून स्वित्झर्लंडवर ३२ टक्के टॅरिफ लादण्यात आले. २०२२चा डेटा विचारात घेतला असता, तर हा दर १९ टक्केच आला असता. 

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

हिरे आणि व्हॅनिलामुळे शुल्कवाढ!

टॅरिफ आकारल्यामुळे परदेशातून येणाऱ्या वस्तू महाग होतील आणि त्यांची मागणी कमी होईल. या वस्तू मग अमेरिकेतच निर्मिल्या जातील अशी ट्रम्प यांची अटकळ आहे. पण सगळ्याच गोष्टींची निर्मिती अमेरिकेत होऊ शकत नाही. उदा. बोटस्वाना या आफ्रिकेतील देशावर ३८ टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे. कारण या देशातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांची निर्यात होते. त्यामुळे बोटस्वानाची निर्यात त्या देशातून होणाऱ्या आयातीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे रेसिप्रोकल टॅरिफ त्या देशावरही लावण्यात आले. पण यामुळे अमेरिकेत हिरे कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित होतो. तीच बाब मादागास्कर या आणखी एका आफ्रिकी देशाबाबतची. येथून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात व्हॅनिला बियांची निर्यात होते. या देशात अमेरिकी निर्यात फारशी होत नाही. त्यामुळे या देशावर ४७ टक्के इतके प्रचंड टॅरिफ आकारण्यात येईल. त्यामुळे व्हॅनिला महाग होणार, पण तितक्या प्रमाणात निर्मितीची अमेरिकेची क्षमताच नाही. 

बेटावर केवळ पेंग्विन, तरी टॅरिफ!  

हर्ड आयलँड आणि मॅकडोनाल्ड आयलँड्स हे ऑस्ट्रेलियन भूभाग अंटार्क्टिक खंडाचा भाग आहेत. येथे पेंग्विन आणि वॉलरस, सीलसारखे काही जलचर सस्तन प्राणी राहतात. या बेटांना देश समजून ट्रम्प प्रशासनाने त्यांच्यावर किमान प्राथमिक असे १० टक्के शुल्क आकारले आहे. कारण या प्रदेशांच्या नावापुढे इंटरनेट डोमेन नेम (.hm) आहे! असे निकषही टॅरिफ आकारण्यासाठी गृहित धरले गेले आहेत. 

टॅरिफसाठी कोणते सूत्र?

‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार विभागाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या देशाचे अमेरिकेबरोबर व्यापारात आधिक्य आहे (अमेरिकी निर्यात कमी, संबंधित देशाकडून आयात अधिक), त्या देशाच्या आधिक्याच्या आकड्याने आयातीच्या एकूण मूल्याला भागायचे. त्यातून येणाऱ्या संख्येच्या अर्धी संख्या हा त्या देशासाठीचा नवा टॅरिफदर. उदा. चीनचा विचार केल्यास, त्या देशाचे अमेरिकेबरोबर व्यापार आधिक्य २०२४मध्ये २९५ अब्ज डॉलर होते. अमेरिकेत चीनकडून होणाऱ्या आयातीचे मूल्य ४३८ अब्ज डॉलर होते. या दोन आकड्यांचे गुणत्तर ६८ टक्के इतके आहे. त्याच्या निम्मे म्हणजे ३४ टक्के हे अमेरिकेचा चिनी मालासाठीचे नवीन टॅरिफ. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly is america formula for tariff determination print exp ssb