गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात येणाऱ्या फुलणार जंगल परिसरात मध्यंतरी पोलीस-नक्षल चकमकीत एका सी-६० पथकाच्या जवानाला वीरमरण आले. गेल्या चार वर्षात पहिल्यांदाच नक्षलविरोधी विशेष पथक अशी ओळख असलेल्या सी-६० मधील जवान शहीद झाल्याने गडचिरोली पोलीस दलाला धक्का बसला आहे. यनिमित्ताने सी-६० पथकाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सी-६० ची स्थापना कशी झाली?
ऐंशीच्या दशकात गडचिरोलीत प्रवेश केलेल्या नक्षलवादी चळवळीचा धोका लक्षात घेऊन १९९२ मध्ये सी-६० कमांडोंची फोर्स तयार करण्यात आली होती. सुरवातीला यामध्ये पोलीस फोर्समधील खास प्रशिक्षण घेतलेल्या ६० जवानांचा समावेश करण्यात आला होता. ही तुकडी बनविण्याचे काम तेव्हाचे एसपी के.पी रघुवंशी यांनी केले होते. टप्प्याटप्प्यात या दलाचा विस्तार करण्यात आला. आजघडीला सी-६० चे जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरीत मिळून २५ हून अधिक पथक कार्यरत आहे.
येथील जवानांना गोरिल्ला युद्धासाठी देखील तयार केले जाते. त्यांना हैदराबाद, बिहार आणि नागपूरमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. या फोर्सला महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट फोर्स मानले जाते. दररोज गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीवरून आजुबाजुच्या भागात कारवाया केल्या जातात. सी-६० चे जवान आपल्यासोबत जवळपास १५ ते २० किलोचे वजने घेऊन जातात. यामध्ये शस्त्रे, जेवण, पाणी, प्रथमोपचार साहित्य आदी असते. ही देशातील एकमेव अशी फोर्स आहे जी जिल्हास्तरावर तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाला त्याच्या कमांडरच्या नावाने ओळखले जाते.
या दलातील जवान इतरांपेक्षा वेगळे का?
नक्षलविरोधी पथक सी-६० ची आज राज्यातच नव्हे तर देशात एक वेगळी ओळख आहे. या धर्तीवर तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात देखील ग्रेहॉऊंड्स, बस्तर फाईटर, एसओजी सारखे दल बनविण्यात आले आहे. पण ते राज्यस्तरावर. सी-६० जिल्हास्तरावर कार्यरत आहे. गडचिरोली व्यतिरिक्त गोंदिया जिल्ह्यातील दोन तालुक्यात हे दल कार्यरत आहे.
सी-६० मध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक तरुणांना अनेक चाचण्या, खडतर आव्हानांचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक मनोबल पाहिले जाते. जवानांना अद्ययावत हत्यारे आणि गॅजेट्स चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांची गुप्तचर यंत्रणादेथील प्रभावी असते. कारण त्या भागात त्यांचेच मित्र, नातेवाईक वास्तव्यास असतात. स्थानिक भाषा येत असल्याने त्यांना इतरांपेक्षा लवकर माहिती मिळते. स्थानिकांना देखील त्यांच्याशी संवाद साधताना अडचणी येत नाहीत. बहुतांश जवान स्वतःच या फोर्समध्ये दाखल होण्यासाठी येतात. यांच्यापैकी बऱ्याच जवानांचे नातेवाईक नक्षल्यांनी मारलेले असतात. स्थानिक भाषा गोंडी तसेच मराठी त्यांना येते. यामुळे बाहेरून जवान आणण्यापेक्षा तेथीलच पीडित तरुण बदल्याच्या भावनेने नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या ताकदीने लढतात.
नक्षलवाद्यांमध्ये सी-६० ची दहशत का आहे?
सी-६० ची स्थापना करताना नक्षलग्रस्त भागातीलच तरुणांना यामध्ये भरती करण्यात आले. याचे मोठे कारण म्हणजे नक्षलवाद्यांसारखेच ते या भागाला ओळखतात. त्यांना या भागाची माहिती असते, भाषेची माहिती असते. याचा नक्षलविरोधी अभियानात फायदा होतो. आजपर्यंत या पथकाने ३०० हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले आहे. दोन दशकातील चकमकीचा आढावा घेतल्यास नक्षल या पथकाला का घाबरतात हे लक्षात येते. तीन वर्षांपूर्वी गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील मार्दीनटोला जंगल पारिसरात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सदस्य आणि महाराष्ट्राच्या मोठा नेता मिलिंद तेलतुंबडेला सी-६० च्या जावानांनी ठार केले होते. यात काही मोठ्या नेत्यांसहा २९ नक्षलवादी मारले गेले होते. २०१८ मध्ये देखील बोरिया कसनासूर चकमकीत तब्बल ३९ नक्षलवादी ठार झाले होते. डोंगराळ आणि घनदाट जंगलातून वाट काढत सी-६० जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक नक्षलविरोधी मोहीम यशस्वी केल्या. यामुळे अलीकडच्या काळात गिरीधर, तारक्का सारख्या मोठ्या नक्षल नेत्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनीही सी-६० बद्दल नक्षलवाद्यांच्या मनात आजही दहशत असल्याचे मान्य केले आहे.
पाच वर्ष सुरक्षित मोहिमा कशा पार पडल्या?
११ फेब्रुवारी रोजी भामरागड तालुक्यात झालेल्या चकमकीत पाच वर्षानंतर पहिल्यांदाच सी-६० चा जवान शहीद झाला. एकेकाळी हे प्रमाण अधिक होते. परंतु मागील पाच वर्षात गडचिरोलीतील पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या दिमातीला असलेले प्रमुख अभियान अधिकारी यांच्या प्रभावी नियोजानामुळे एकही जवान हुतात्मा झालेला नव्हता. यासाठी जवानांना नियमित प्रशिक्षण देणे, तांत्रिक उपकरणांचा वापर, खबऱ्याचे ‘नेटवर्क’ आणि अभियानापूर्वी केली जाणारी सुनियोजित तयारी, यामुळे हे शक्य झाले. फुलणार चकमकीत प्रचंड घनदाट जंगल आणि दोन्ही बाजुनी असलेल्या टेकड्या यामुळे जवानांचा अंदाज चुकला. मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास, २०२० मध्ये मे आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या दोन चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले. २०२१ मधील मार्च, एप्रिल, मे या महिन्यात झालेल्या चकमकीत ४७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. यात नक्षलवाद्यांचा मोठा नेता आणि केंद्रीय समितीच्या सदस्य मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला. अधूनमधून चकमकी होत असतात. २०२४ मध्ये वंडोली आणि कोलामार्का जंगलात झालेल्या चक. चकमकीत १६ नक्षल्याना कंठस्नान घालण्यात आले. या महिमेदरम्यान एकही पोलीस जवान शहीद झाला नाही. यामागे सी-६० पथकाचे मोठे योगदान आहे.
सी-६० दलावर हल्ला करण्याला नक्षल्यांमध्ये महत्वाचे का?
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीच्या प्रवेशानंतर सात वर्षांनी सी-६० स्थापना कारण्यात आली. तत्पूर्वी सीमा भागात नक्षलवाद्यांचे मोठे वर्चस्व होते. मात्र, सी-६० च्या स्थापनेनंतर नक्षल चळवळीला अनेक मोठे हादरे बसले. त्यामुळे या पथकावर यशस्वी हल्ला करून त्यांना मोठे नुकसान पोहोचवणे हे नक्षलवाद्यांचा प्राथमिकतेत असते. नुकताच आत्मसंर्पण केलेला नक्षल नेता गिरीधर याने याबाबत एका मुलाखतीत दुजोरा दिला आहे. गेल्या तीस वर्षात गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या विविध हल्ल्यात २१३ पोलीस जवान शहीद झाले आहे. यापैकी १७० जवान गडचिरोली पोलीस दलातील होते. तर उर्वरित राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील जवान होते. गडचिरोलीच्या इतिहासात बेळगाव,लाहेरी,हत्तीगोटा,मरकेगाव, जांभूळखेडा याठिकाणी नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर केलेल्या हल्ल्याने गडचिरोली पोलिसांना मोठे नुकसान झाले होते. यातील काही चकमकीचे तर नक्षल्यानी चित्रीकरण देखील केले आहे. जांभूळखेडा स्फोटात तर शहीद १५ जवानांचे मृतदेह देखील ओळखणे कठीण झाले होते. मात्र, त्यानंतर नक्षलवाद्यांना कुठलेही मोठे यश मिळाले नाही.