गोविंदा रे गोपाळा… अशी हाळी घालत समस्त गोविंदा पथके गुरुवारी सकाळी मानाची दहीहंडी फोडून मार्गस्त होऊ लागली. लाखमोलाच्या दहीहंड्यांच्या आकर्षणामुळे दुपारी मुंबईतील समस्त गोविंदा पथकांची वाहने ठाण्याच्या दिशेने वळू लागली. मात्र उत्सवाचा आनंद लुटतानाच प्रत्येक गोविंदाच्या मुखी प्रो गोविंदाची चर्चा रुंजी घालत होती. हे आहे दहीहंडीचे नवे वास्तव. नेमका काय आहे हा प्रो गोविंदा, त्यात कोणाला सहभागी होता येते, त्याचे नियम काय याबाबत घेतलेला हा आढावा.
पारंपरिक गोविंदा ते प्रो गोविंदा
कुणे एकेकाळी मुंबई-ठाण्यात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्साव साजरा करण्यात येत होता. म्हणजे गल्लीतील तरुण मंडळी एकत्र येऊन दहीहंडी फोडून, कच्छी बाजा, बेन्जो, नाशिकबाजावर थिरकत, पावसात ओलेचिंब भिजत मनमुरादपणे हा उत्साव साजरा करीत होती. त्याचबरोबर चित्ररथाच्या माध्यमातून पौराणिक कथांना उजाळा दिला जाता होता. तसेच चित्ररथांच्या माध्यमातून अनिष्ट प्रथा, सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर आसूडही ओढण्यात येत होते. कालौघात उंच दहीहंडी फोडण्याची पथकांमध्ये चुरस सुरू झाली आणि मुंबई-ठाण्यात आठ – नऊ थर रचले जाऊ लागले. दरम्यानच्या काळात अपघाताचा धोका लक्षात घेऊन दहीहंडीची उंची आणि १४ वर्षांखालील मुला-मुलीच्या थरातील सहभागाबाबत आक्षेप घेण्यात आला. ही लढाई अगदी न्यायालयातही पोहोचली. परंतु न्यायालयाने याबाबतचा निर्णय सरकारवर सोपविला. या उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची टूम निघाली आणि त्यातूनच प्रो गोविंदाचा जन्म झाला.
हेही वाचा – मराठा आरक्षणाचा वाद मिटणार की पेटणार?
प्रो गोविंदा म्हणजे काय?
विविध सांघिक स्पर्धांप्रमाणेच प्रो गोविंदाही एक स्पर्धाच. बंदिस्त मैदानात अटी – शर्तींनुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करीत खेळली जाणारी गोविंदा पथकांमधील ही एक चुरस. कुठेही गोंधळ नाही, थराच्या संचात ठरलेल्या गोविंदांचाच सहभाग, ठरलेल्या वेळात थर रचायचे आणि ते सुखरूपपणे उतरवायचे. कमीत कमी वेळेत थर रचून सुखरुपपणे खाली उतरविणारे पथक प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरते. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे निवड चाचणीमध्ये यशस्वी होणारी पथकेच प्रो गोविंदासाठी पात्र ठरतात. मुंबईत आयोजित करण्यात आलेला पहिलाच प्रो गोविंदा एकूणच शिस्तीत पार पडला आणि गोविंदा पथकांसाठी स्पर्धेचे एक नवे दालन खुले झाले.
प्रो गोविंदाचा असा झाला श्रीगणेशा
आतापर्यंत मुंबई – ठाण्यात प्रो गोविंदाबाबत केवळ चर्चाच सुरू होती. मात्र प्रो गोविंदाबाबत स्पष्टता नसल्याने कुणा आयोजकाने त्याचे आयोजन करण्याचे धाडस केले नव्हते. मात्र यंदा राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकून प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या मदतीने पहिल्या-वहिल्या प्रो गोविंदाची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांची चाचणी ठाण्यात पार पडली, तर अंतिम फेरी मुंबईमधील वरळीतील एनएससीआय संकुलातील बंदिस्त मैदानात पार पडली आणि अखेर प्रो गोविंदाचा श्रीगणेशा झाला.
पहिल्या प्रो गोविंदासाठी अशी होती नियमावली…
मुंबई – ठाण्यातील केवळ उंच थर रचण्याचा सराव करणाऱ्या निवडक ३५ पथकांसाठीच प्रो गोविंदाची दालने खुली झाली होती. या पथकांची ठाण्यात चाचणी फेरी पार पडली आणि त्यातून १४ पथके अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली. अंतिम फेरीत प्रत्येक पथकाला तीन फेऱ्यांमध्ये सहा, सात आणि आठ थर रचण्याची अट घालण्यात आली होती. पहिल्या फेरीत १४ पथके सहभागी झाली. मैदानात एकाच वेळी दोन पथकांना कमीत कमी वेळेत सहा थर रचून पुन्हा सुखरुप उतरविण्याची अट घालण्यात आली होती. या फेरीत सात पथके बाद झाली. उर्वरित सात पथकांना दुसऱ्या फेरीत सात थर रचण्याची संधी देण्यात आली. कमी वेळेत थर रचून उतरविणारी चार सर्वोत्कृष्ट पथके अंतिम फेरीत दाखल झाली. तिसऱ्या फेरीत दाखल झालेल्या चार पथकांची थर रचण्याची क्रमवारी चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आली. थरामध्ये २०० गोविंदाचा सहभाग, थरावरून उतरताना पाय घसरला, अथवा अन्य गोविंदाच्या खांद्यावरून घसरत खाली उतरल्यास एकूण वेळेत दोन सेकंद वाढविण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे आपसूकच थर रचणे, उतरविण्याचा वेळ वाढण्याची भीती होती.
याच पथकांसाठी प्रो गोविंदा…
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने प्रो गोविंदा या साहसी खेळाचे दालन खुले झाले असले तरी त्यात सर्वच गोविंदा पथकांना सहभागी होता येणार नाही. आतापर्यंत आठ थर रचणाऱ्या गोविंदांनाच त्यात सहभागी होता येणार आहे. मुंबई – ठाण्यातील गोविंदा पथकांची संख्या प्रचंड आहे. मात्र त्यापैकी आठ थर रचणाऱ्या गोविंदा पथकांची संख्या ५० – ६० च्या घरात आहे. त्यामुळे प्रो गोविंदामध्ये सहभागी होता यावे यासाठी अन्य गोविंदा पथकांना कसून तयारी करावी लागणार आहे.
हेही वाचा – विश्लेषण : रा. स्व. संघासाठी ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’च; जुन्या ठरावांमध्येही उल्लेख!
लहान पथकेही आग्रही
उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा प्रो गोविंदाच्या माध्यमातून सुरू झाली आहे. या स्पर्धेत केवळ उंच थर रचणाऱ्या गोविंदा पथकांनाच सहभागी होता आले. मात्र कमी उंचीचे थर रचणाऱ्या गोविंदा पथकांसाठीही कमी उंचीचे थर आणि काही अटी शिथिल करून प्रो गोविंदाचे आयोजन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तरच समस्त गोविंदा पथकांना या साहसी खेळात सहभागी होता येईल. अन्यथा प्रो गोविंदामध्ये सहभागी होण्यासाठी उंच थर रचण्याचा सराव करण्याच्या नादात अपघातांना आयते आमंत्रण मिळेल, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.
उत्सवाचे रूप हरवण्याची भीती
मुंबईत पहिला प्रो गोविंदा पार पडला आणि काही मंडळींनी नाके मुरडायला सुरुवात केली. वर्षभरात तीन-चार वेळा तरी प्रो गोविंदाचे आयोजन व्हायला हवे असे थर रचण्याचा आनंद लुटणाऱ्या गोविंदांचे म्हणणे आहे. मात्र तसे झाले तर गोपाळकाल्याचे उत्सवपण हरवून जाईल. जन्माष्टमीची पूजा, मानाच्या दहीहंड्या बांधणे, त्या फोडण्यासाठी पथकांना आमंत्रित करणे, चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणे, पौराणिक कथांना उजाळा देणे आदी उत्सवातील आनंद हरवून जाईल, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.