गेल्याच आठवड्यात मुंबईत आत्महत्येची एक घटना घडली. या आत्महत्येमागे ‘सेक्सटॉर्शन’ हे कारण असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. वर्षागणिक या ‘सेक्सटॉर्शन’च्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसते आहे. बहुतांश वेळा या गुन्ह्यातील आरोपी हे कुठल्यातरी दुर्गम खेड्यातील असतात, त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करणे पोलिसांसाठी कठीण ठरते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये अडकण्यापेक्षा खबरदारी घेतलेली केव्हाही चांगली, असा सल्ला सायबर गुन्हे तज्ज्ञांकडून देण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर सेक्सटॉर्शन म्हणजे काय?, या प्रकरणात पीडित कसे अडकले जातात आणि हे होवू नये म्हणून कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी हा विषय समजून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरावे.
अलीकडची ‘सेक्सटॉर्शन’ची घटना कोणती?
गेल्याच आठवड्यात एका ३६ वर्षीय व्यक्तीने ‘सेक्सटॉर्शन’मुळे मानसिक तणावाखाली माटुंगा स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली, सदर व्यक्ती मूळची डोंबिवलीची होती. या प्रकरणात एका स्त्रीने फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून त्या व्यक्तीची चित्रफीत तयार केली, आणि त्या चित्रफितीस अश्लील स्वरूप देण्यात आले असे नंतरच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या चित्रफितीचा वापर करूनच मयत व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यात आले, त्या व्यक्तीकडून दोन लाखांची खंडणी मागण्यात आली. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, तर एकदा पैसे दिल्यानंतरही मागणी सुरूच राहिली. त्यामुळेच या जाचाला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे, त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. याप्रकरणी सेक्सटॉर्शनची मागणी करणाऱ्या तिघांविरोधात दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा: Shardiya Navratri 2023: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील?
सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
सेक्सटॉर्शन हा एक सायबर गुन्हा- सायबर फसवणूक आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात आपण सहजच एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संभाषण ‘चॅटिंग’च्या माध्यमातून सुरु करतो, ओळख वाढते, मोबाईल नंबर्सची देवाणघेवाण होते, त्या व्यक्ती सोबत व्हिडीओ कॉल सुरू होतात आणि याचीच परिणती ‘प्रेम, आकर्षण, वासना’ यांसारख्या भावनांमध्ये होते. आणि अखेरीस त्यातूनच न्यूड- नग्न प्रतिमांची अदलाबदल, किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या सगळ्याचे प्रदर्शन होते. बऱ्याच वेळा नग्नता नसली तरी केवळ कॉलच्या माध्यमातून रेकॉड झालेल्या प्रतिमांना तसे स्वरूप दिले जाते. एकदा का आरोपीचे काम झाले की, खंडणीसाठी कॉल येतात. तुम्ही ठरलेली खंडणी दिली नाही तर तुमच्या अश्लील, नग्न प्रतिमा, चित्रफिती प्रसारमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. या प्रकरणांमध्ये केवळ पुरुषच नाही तर महिला पीडितांची संख्याही वाढते आहे.
गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी
‘सेक्सटॉर्शन’च्या या गुन्ह्यासाठी एक ठरावीक मोडस ऑपरेंडी वापरली जाते. सर्वसाधारणपणे पीडितांबरोबर खोटा संबंध निर्माण करणे, चॅट दरम्यान गुप्तपणे व्हिडिओ आणि संदेश रेकॉर्डिंग करणे, किशोरवयीन मुलांशी संपर्क साधण्यासाठी एखादी ओळख वापरणे असे मार्ग सर्रास वापरले जातात. त्याचप्रमाणे अनेकदा वयाने लहान किंवा विरुद्ध लिंगी असल्याचे आरोपीकडून भासवले जाते. लैंगिक प्रतिमा चोरण्यासाठी समाजमाध्यमांवरील खाती हॅक करणे, पिडितांनी फोटो पाठवण्यास नकार दिल्यास आत्महत्येची धमकी, पीडितांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सार्वजनिक सोशल मीडिया प्रोफाइलला भेट देणे, ज्यामध्ये पीडितांच्या फ्रेंड लिस्टमध्ये प्रवेश करणे आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारी इतर वैयक्तिक माहिती शोधणे आदी बाबींचाही या मोडस ऑपरेंडीमध्ये समावेश होतो.
आणखी वाचा: चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?
सेक्सटोर्शन कसे केले जाते?
आरोपी ज्या व्यक्तीला फसवायचे आहे, त्या व्यक्तीशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. प्रसार माध्यमांवर अनेकदा मैत्रीसाठी विनंती वारंवार केली जाते. मुख्यतः तरुणवयीन त्याचप्रमाणे किशोरवयीन मुले त्यांचे लक्ष्य असतात. असे असले तरी गेल्या दोन वर्षांत असे लक्षात आले आहे की, मध्यमवयीनांची संख्याही तेवढीच वाढते आहे, परंतु या वयोगटातील लोकांकडून लोकलज्जेस्तव त्या गुन्ह्यांची तक्रार करणे टाळले जाते. दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार यामध्ये अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. तर आजपर्यंत झालेल्या एकूणच गुन्ह्यांचे स्वरूप पाहता अल्पवयीन मुलांबरोबरीनेच वय वर्षे ४० च्या आसपास असलेल्या मध्यमवयीन पुरुषांचा समावेशही पीडितांमध्ये अधिक आहे. कोण किती खंडणी देवू शकेल आणि त्यानंतर वाच्यता कोण करणार नाही, याचाही विचार आरोपींनी गुन्हा घडताना केलेला असतो, असे अनेक तपासांमध्ये लक्षात आले आहे.
आमिष दाखवले जाते
आरोपी तरुण तसेच किशोरवयीन मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांची प्रशंसा किंवा खुशामत करतात; काही वेळेस रोमँटिक (प्रेम संबंध) नातेसंबंधाचे वचन देखील दिले जाते. ते पीडितांसोबत घनिष्ट मैत्री निर्माण करण्यासाठी खऱ्याखुऱ्या संभाषणांना सुरुवात करतात. काहीवेळा हे गुन्हेगार मुलांना मॉडेलिंग आदींचे आमिषही दाखवतात. ऑनलाइन गेम क्रेडिट्स किंवा कोड; अथवा पैसे, क्रिप्टोकरन्सी आणि भेटकार्डे यांसारखी आमिषे दाखवून त्याच्या बदल्यात त्यांचे फोटो (प्रतिमा) मिळवतात. जेथे शक्य नाही तेथे अशा स्वरूपाच्या गोष्टी मिळविण्याकरिता संगणक हॅक करतात. हे गुन्हेगार सामान्यत: एका प्लॅटफॉर्मवर पीडित व्यक्तीशी प्रथम संपर्क साधतात, नंतर त्यांना दुसर्या किंवा तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर संपर्क साधण्यास सांगतात, एनक्रिप्टेड संदेश पाठवतात. ज्यामुळे त्यांच्या गुन्ह्यांचा मागोवा घेणे अधिक कठीण होते.
आभास हा…
सेक्सटोर्शन प्रकरणात खोटी अकाऊंट्स तयार केली जातात, फेसबुक किंवा इतर ठिकाहून सामान्य दिसणाऱ्या महिलेचे फोटो डाउनलोड केले जातात. या अकाऊंट्ससाठी त्या सामान्य महिलांचे फोटो डीपी म्हणून वापरले जातात, तसेच त्या अकाऊंट्सना सामान्य दिसणाऱ्या महिलांची नावे ही दिली जातात, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ती अकॉऊंट्स खरी वाटतील. या प्रकरणात प्रत्यक्ष संभाषण व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉलवर होते, मूलतः बहुतांश वेळेस कधीच खरी स्त्री नसते, या संभाषणात पीडीत समोरचा फ्रंट कॅमेरा वापरत असताना; आरोपी मात्र नेहमी मोबाईलच्या मागच्या बाजूस असलेला रेअर कॅमेरा वापरतो; आणि पॉर्न साईट वरून एका स्त्रीचे अर्धवट नग्न शरीर दिसेल याची काळजी घेतो. आणि कॉल संपताच टार्गेटला पैशांची मागणी करणारा मेसेज येतो.
बाहेर पडणे अधिक गुंतागुंतीचे
बहुतांश वेळा पैसे किंवा खंडणी देवून आपली यातून सुटका होईल असे पीडितांना वाटते. त्यामुळे पैसे देवून हा प्रकार मिटविण्याचा प्रयत्न केला जातो, आणि गुन्हा नोंदविला जात नाही. परंतु हे सत्र तसेच सुरु राहते, पीडितांना भारतभरातून आसाम, ओडिसा, पश्चिम बंगाल, राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून कॉल्स येतात. राजस्थानमधील भरतपूर-अलवर पट्ट्यातील टोळ्या या ‘सेक्स्टॉर्शन रॅकेट’ चालविण्यात अग्रेसर आहेत, असे पोलीस तपासात लक्षात आले आहे.
राजस्थान रडारवर
सेक्सटोर्शन रॅकेट्स मिनी कॉटेज इंडस्ट्रीज (छोटेखानी कुटिरोद्योग) प्रमाणे चालवले जातात. या बहुतांश टोळ्या राजस्थानातून कार्यरत आहे. भरतपूर, अलवर पट्ट्यातील गावागावांमध्ये अर्थार्जनाचा स्रोत म्हणून याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे हे उद्योग आरोपींच्या घरातूनच चालविले जातात. मोबाईल, लॅपटॉप, सिम कार्ड्स, इत्यादी सारख्या कमी साधनांच्या वापरातून या टोळ्या कार्यरत आहेत. स्थानिक पातळीवर त्यांची ओळख ‘लाडकीवाला’ म्हणून आहे. या बाबत गावात सगळ्यांना माहीत असले तरी, कोणीही तक्रार करत नाही. उलट पोलिसांच्या धाडीत त्यांच्याच समर्थनार्थ गावकरी उभे राहतात. या कामात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.
आणखी वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?
आकडेवारी काय सांगते?
‘लोकसत्ता’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत गेल्या काही वर्षांत सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली असली तरी गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी आहे. मुंबईत २०२१ मध्ये सेक्सटॉर्शनचे ५४ गुन्हे दाखल झाले, त्यातील ३० गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी ५२ आरोपींना अटक केली. तर २०२२ मध्ये ७८ गुन्हे दाखल झाले मात्र तयातील केवळ २५ गुन्ह्यांचीच उकल करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणांत ३४ आरोपींना अटक झाली. २०२२ मध्ये दाखल झालेल्या सेक्सटॉर्शनच्या २० गुन्ह्यांमध्ये १० लाखांहून अधिक रक्कमेची खंडणी आरोपींनी उकळली. या वर्षी सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. जुलै महिन्यापर्यंत मुंबईत सेक्सटॉर्शनचे ३८ गुन्हे दाखल झाले असून केवळ चारच प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
काय खबरदारी घ्याल?
प्रत्यक्षात परिचयाच्या नसलेल्या कोणाचीही ऑनलाइन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, असा सल्ला सायबरतज्ज्ञ नेहमीच देतात. कोणत्याही अनोळखी व्यक्ती बरोबर ईमेल किंवा सोशल मीडिया हँडल्स शेअर करू नका. तुम्ही ओळखत नसलेल्या व्यक्तीने तुमची वैयक्तिक माहिती विचारली तर ‘नाही’ म्हणा. तुमचा पासवर्ड कधीही कोणाशीही शेअर करू नका. पाळीव प्राण्यांची नावे, जन्मतारीख इत्यादी अंदाज लावण्याइतके सोपे पासवर्ड वापरू नका. तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांकडून आलेल्या ई-मेलमधील लिंकवर क्लिक करू नका; असे केल्याने हॅकर्स तुमच्या उपकरणाशी जोडला जावू शकतो.
काय टाळाल?
घरात किशोरवयीन मुले असतील आणि त्यांना धमक्या आल्या तर त्याविरोधात तक्रार करण्यास शिकवा. ते तणावग्रस्त किंवा लाजिरवाणे असले तरी, त्यांच्याशी ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल बोला आणि त्यांना संशयास्पद ईमेल किंवा मेसेजेस आले तर काय करायचे, याची कल्पना द्या. शिवाय सायबरतज्ज्ञ सांगतात की, तुमच्या घरातील रेकॉर्डिंग उपकरणांपासून सावध रहा. काही कमी सुरक्षित उपकरणे, जसे की बेबी मॉनिटर्स आणि नॅनी-कॅम यांच्या माध्यमातून लैंगिक शोषण केले जावू शकते. गृहीत धरा की, तुमचा वेबकॅम किंवा रेकॉर्डिंग डिव्हाइस तिसऱ्या व्यक्तीकडून सक्रिय केले जाऊ शकते. तुमचा फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक कॅमेरा उपकरणे गोपनीय ठिकाणी सक्रिय राहणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही तुमचा वेबकॅम वापरत नसताना झाकून ठेवा; तुमच्या वेबकॅममध्ये अंगभूत कव्हर नसल्यास, ते झाकण्यासाठी स्टिकर किंवा टेपचा तुकडा वापरा. अशा प्रकरणांत घाबररून जाण्यापेक्षा जवळच्या व्यक्तीला विश्वासात घेवून सगळं सांगा, त्यामुळे मदत मिळू शकते. भावनाविवश होवून कुठलाही चुकीचा निर्णय घेवू नका, असा सल्लाही सायबरतज्ज्ञ आणि सायबरपोलीस देतात.