बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ११ आणि नांदुरा तालुक्यातील एक अशा एकूण १२ गावात मागील आठवड्यापासून नागरिकांना आकस्मिक केसगळती आणि त्यातून टक्कल पडण्याच्या आजाराने ग्रासले आहे. या मागची कारणे शोधण्याचे आणि उपाययोजना करण्याचे प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत असली तरी अद्याप त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काय आहे केसगळतीचे प्रकरण?
७ जानेवारी २०२५ रोजी शेगाव तालुक्यातील तीन गावांत सुरुवातीला काही नागरिकांना केसगळतीचा त्रास होऊ लागला. काहीच दिवसात अनेकांना टक्कल पडले. त्यामुळे या आजाराची भीती दूरवर पसरली. आठच दिवसांत शेगावच्या अकरा आणि शेजारील नांदुरा तालुक्यातील एका गावात याचे रुग्ण आढळून आले. प्रारंभी जिल्हा आरोग्य विभागाने सामान्य उपचार केले. नंतर रुग्णसंख्या वाढली.
हेही वाचा >>>भांडवली बाजारात पडझड, तरी एसआयपी गुंतवणुकीत वाढ…म्युच्युअल फंडांत गुंतवणूकदारांचा नेमका कल कुठे?
किती गावांत प्रादुर्भाव?
शेगाव तालुक्यातील ११ आणि नांदुरा तालुक्यातील एक अशा एकूण १२ गावात केसगळतीचे रुग्ण आढळून आले. नांदुरा तालुक्यातील वाडी या १९४२ लोकसंख्या असलेल्या गावाचा समावेश आहे. येथील सात रुग्ण तीन कुटुंबातील आणि ३ ते ४५ या वयोगटातील आहेत. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छिंद्रखेड, हिंगणा, घुई, तरोडा खुर्द, पहुरजिरा, माटरगाव आणि निंबी ही गावे बाधित आहेत. या गावातील जल तसेच बाधितांचे रक्त, नख, केस यांचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत.
कारणांवरून मतभिन्नता का?
प्रारंभी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दूषित पाण्यामुळे व पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार झाल्याचे सांगितले होते. नंतर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पाण्यामुळे नव्हे, तर बुरशीमुळे हा आजार झाल्याचे सांगितले. चेन्नईचे डॉक्टर मनोज मुर्हेकर व डॉक्टर राज तिवारी यांनी हा आजार पाणी वा बुरशीजन्य विषाणूमुळे झाल्याचे स्पष्ट केले. आजाराचे मूळ कारण व त्यावर उपाय शोधण्यासाठी आलेल्या यंत्रणांना नेमके कारण कळू शकले नाही, त्यांच्यात मतभिन्नता आढळून आली.
बाधित गावांतील सद्यःस्थिती काय?
केसगळती व टक्कल पडण्यामागे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट न झाल्याने व याबाबत आरोग्य यंत्रणाही ठाम निष्कर्षावर न पोहचल्याने १२ गावांतील गावकरी भयभीत झाले आहेत. या आजाराचे सामाजिक परिणामांचीही चर्चा सध्या सुरू आहे. ही साथ नियंत्रणात न आल्यास काय करायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रुग्णांमध्ये लहान मुले, युवक-युवती, महिलादेखील आहेत. आजाराची चर्चा सर्वत्र झाल्याने गावात बाहेरून कोणी येत नाही. दाढी, कटिंग करायला कुणी तयार नाही. दूरच्या गावांतही गेले तरी गावाचे नाव सांगितल्यावर नकार मिळतो, असे भयावह चित्र आहे.
हेही वाचा >>>‘मिशन मौसम’ प्रकल्पात नेमके काय? किती फायदेशीर?
शासनाची भूमिका काय?
केंद्रीय आरोग्य खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील हे प्रकरण असल्याने त्यांनी तातडीने याची दखल घेऊन आरोग्य यंत्रणांना कामी लावले. बाधित गावांना ‘वायसीएमआर’ दिल्ली, चेन्नई, भोपाळ येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी भेटी दिल्या. अलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी आणि आयुष (आयुर्वेद) या चार प्रमुख वैद्यक शाखांचे तज्ज्ञही येऊन गेले. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पथके आलीत. एवढ्या मोठ्या संस्थांचे तज्ज्ञ येऊन गेलेत, मात्र आजार नेमका कशामुळे व त्यावर उपाय काय, हे कुणालाच सांगता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.