History of Slavery जगाच्या इतिहासात गुलामगिरी हे महत्त्वाचे पर्व आहे. गुलामगिरीचा इतिहास हा मानवी इतिहासाइतकाच जुना आहे. वसाहतवादी कालखंडात गुलामगिरी या अमानुष प्रथेचे पालन मोठ्या प्रमाणात करण्यात आले. याच कालखंडात आशिया आणि आफ्रिका खंडातून मोठ्या प्रमाणात गुलामांची निर्यात युरोपीय देशांमध्ये करण्यात आली. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये युरोपीय देशांकडून या संदर्भात माफी मागण्याची लाटच आली आहे. अलीकडेच १६ फेब्रुवारी रोजी येल विद्यापीठाने त्यांच्या इतिहासातील गुलामगिरीशी असलेल्या संबंधांसाठी औपचारिक माफी मागितली. आयव्ही लीग स्कूलकडून प्रकाशित करण्यात आलेल्या एका निवेदनात ते याविषयी खुलासा करतात. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे “आमच्या विद्यापीठाचा गुलामगिरीशी असलेला ऐतिहासिक संबंध आणि भूमिका जाणून आहोत. इतिहासात प्रारंभिक कालखंडात येलच्या प्रमुखांनी गुलामगिरीत ज्या प्रकारे सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो”. याशिवाय ‘येल अ‍ॅण्ड स्लेव्हरी: ए हिस्ट्री’ या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आहे. येल इतिहासाचे प्राध्यापक डेव्हिड डब्ल्यू ब्लाइट हे या पुस्तकाचे मुख्य लेखक आहेत. या पुस्तकात येल आणि गुलामगिरी यांच्या गडद भूतकाळाविषयी माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: नेदरलँडची इतिहासात केलेल्या गुन्ह्याबद्दल माफी- का? कशासाठी?

भारत आणि येल यांचा संबंध

येल अ‍ॅण्ड स्लेव्हरी: ए हिस्ट्री या पुस्तकात इतर गोष्टींबरोबरच एलीहू येल (१६४९-१७२१) यांचा भारताशी असलेला संबंध विशद करण्यात आलेला आहे, एलीहू येल यांचेच नाव विद्यापीठाला देण्यात आले. येल हे अनेक दशके भारतात वास्तव्यास होते. मुख्यतः त्यांनी त्यांची बहुतांश कारकीर्द मद्रास (आताचे चेन्नई) प्रांतात घालवली, इतकेच नाही तर गुलामांच्या व्यापारासह इतर व्यापारातून भरपूर संपत्तीही कमावली होती.

एलिहू येलचे पोर्ट्रेट (सौजन्य: Yale University Art Gallery/ विकिपीडिया)

मसॅच्युसेट्स ते मद्रास

एलिहू येल यांचा जन्म १६४९ साली बोस्टन, मसॅच्युसेट्स येथे एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला. येल तीन वर्षांचे असताना त्यांच्या घरच्यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. ते पुन्हा कधीही अमेरिकेत परतले नाहीत. १६७० मध्ये २१ व्या वर्षी येल हे ईस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून रुजू झाले आणि काही वर्षातच त्यांची नियुक्ती भारतात झाली. १६७२ साली ते मद्रासला आले. कापडाच्या व्यापाराव्यतिरिक्त जिवंत माणसांच्या खरेदीविक्रीत येल यांच्या कंपनीचा सहभाग होता किंवा येल यांची कंपनी सक्रिय होती.

गुलामांच्या व्यापारात येल यांचा सहभाग

येल यांच्या कारकिर्दीत ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमधून मोठ्या प्रमाणावर व्यापार केला. मसाले आणि कापडाच्या व्यापाराव्यतिरिक्त, कंपनी जिवंत माणसांची विक्री आणि खरेदी यामध्ये देखील गुंतलेली होती. येल अ‍ॅण्ड स्लेव्हरी: ए हिस्ट्री या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे येल यांनी “ईस्ट इंडिया कंपनीसाठी गुलाम केलेल्या लोकांच्या व्यापारावर देखरेखीचे काम केले”. इतिहासकार जोसेफ यानीली यांनी नमूद केल्याप्रमाणे १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात, येल यांनी मद्रासमधील ब्रिटिश किल्ला असलेल्या फोर्ट सेंट जॉर्ज येथील गव्हर्निंग कौन्सिलवर काम केले. याच कालखंडात एका विनाशकारी दुष्काळामुळे स्थानिक गुलामांच्या व्यापारात वाढ झाली. त्याच वेळी येल आणि कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांनी श्रमिक अधिशेषाचा फायदा घेऊन, शेकडो गुलाम विकत घेतले आणि त्यांना सेंट हेलेना येथील इंग्रजी वसाहतीत पाठवले” (‘एलिहू येल वॉज अ स्लेव्ह ट्रेडर’ डिजिटल इतिहास @ येल,२०१४). येल वैयक्तिकरीत्या किती लोकांचे मालक होते, याबद्दल आज तपशील नाही. त्यांनी बहुधा “कापड, रेशीम, मौल्यवान दागिने आणि इतर वस्तूंच्या व्यापारातून आपली बहुतेक संपत्ती कमावली. परंतु, ब्लाइट यांनी नमूद केल्याप्रमाणे, “हा व्यापार गुलामांच्या व्यापाराचा अविभाज्य होता. येल हे मद्रास येथे ब्रिटिश गव्हर्नर असताना त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग गुलामांच्या व्यापारातून जमा झाला होता, असेही ते नमूद करतात. ब्रिटिशकालीन बंदर गुलामगिरीच्या वेगवेगळया पद्धतींसाठी व्यग्र असल्याचे दस्तावेजीय पुरावे उपलब्ध असल्याचे ते नमूद करतात”.

एलीहू येल (मध्यभागी), दुसरा ड्यूक आणि लॉर्ड कॅव्हेंडिश, आणि बाल गुलाम (सौजन्य: Yale University Art Gallery/ विकिपीडिया)

गुलाम बालकाचे चित्र

येल आणि गुलामगिरीला जोडणारा महत्त्वाचा पुरावा म्हणून एका चित्राकडे पाहिले जाते. हे चित्र १९७० मध्ये येल सेंटर फॉर ब्रिटिश आर्टला दान केले गेले होते. या चित्रात १८ व्या शतकातील महागड्या पोशाखात येल यांच्यासह केंद्रस्थानी चार गोरे पुरुष दाखवले आहेत. ते टेबलाभोवती आहेत आणि धूम्रपान करत वाइन पित आहेत. तर याच चित्राच्या उजव्या कोपऱ्यात एक लहान कृष्णवर्णीय बालक वाइन ओतण्याचे काम करत आहे. या बालकाचा पोशाख उत्तम असून त्याच्या गळ्यात चांदीचा पट्टा आहे. हा चांदीचा पट्टा गुलामगिरीचे प्रतीक आहे. या पट्ट्याची रचना उच्चदर्जीय आहे. जेणेकरून गुलाम तो तोडून पळून जाऊ शकणार नाही. या चित्रातील बालक नक्की भारतीय आहे की आफ्रिकन यावरून वाद असला तरी हे चित्र तत्कालीन गुलामगिरीचे वास्तव दर्शविते.

अधिक वाचा: महाभारत खरंच घडले होते का? काय सांगतात पुरातत्त्वीय पुरावे?

येल विद्यापीठाचे नाव कसे पडले?

येल हे भारतातून १६९९ साली इंग्लंडला परतले. तोपर्यंत त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीसाठी काम करून बेकायदेशीर मार्गाने भरपूर धनार्जन केले होते. किंबहुना १६९२ साली त्यांच्यावर पैशाचा अपहार, अफरातफरी, घोटाळ्याचा असे आरोप ठेऊन त्यांना पदच्युत करण्यात आले होते. भारतातून निघताना त्यांच्यावर क्रूर, विक्षिप्त, लोभी असे अनेक ठपके होते. त्यांनी कंपनीच्या घोड्यासह फरार झालेल्या एका भारतीय मुलाला फाशी देण्याचा आदेश दिला होता. यातूनच या माणसाची क्रूरता लक्षात येते. ते परत इंग्लंडला आल्यावर इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. “कलाकृती, दागिने, चिनी पोर्सिलीन, कापड, उत्कृष्ट फर्निचर आणि ग्रंथ यांचे ते संग्राहक होते.” नंतरच्या कालखंडात ते न्यू हेवन, कनेक्टिकट, अमेरिकेतील कॉलेजिएट स्कूलसाठी मोठे देणगीदार म्हणून पुढे आले.

एलिहू येल यांनी येल कॉलेजला भेट दिलेले ब्रिटनच्या किंग जॉर्ज प्रथम यांचे पोर्ट्रेट
(सौजन्य: Yale University Art Gallery/ विकिपीडिया)

कॅल्विनिस्टांनी १७०१ साली या शाळेची स्थापना केली, प्रारंभिक कालखंडात या शाळेला अनेक आर्थिक समस्याना तोंड द्यावे लागले. १७१३ आणि १७२१ या कालखंडा दरम्यान, येल यांनी कॉलेजिएट स्कूलला पाठिंबा देण्यासाठी शेकडो पुस्तके, किंग जॉर्ज १ चे पोर्ट्रेट आणि इतर वस्तू देणगीस्वरूप दिल्या. या वस्तु विकून शाळेची इमारत बांधण्यात आली. त्यामुळेच कॉलेजिएट स्कूलने एलिहू येल यांच्या योगदाना सन्मानार्थ १७१८ साली येल कॉलेज नावाची इमारत बांधली. त्या दिवसापासून ही इमारत अमेरिकेतील उच्च शिक्षणाची तिसरी सर्वात जुनी संस्था या नावाने ओळखली जाऊ लागली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly is the connection between yale university and indian slavery why did they apologize svs
Show comments