अनिकेत साठे
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक समजले जाणारे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र धर्मस्थान आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री या गावात निघालेल्या संदल मिरवणुकीच्या वेळी दुसऱ्या धर्माच्या गटाने मंदिरात प्रवेश करून धूप, आरती आणि फुले वाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्याला राजकीय रंगही चढू लागला आहे. मात्र, त्या दिवशी नेमके काय घडले आणि या वादावर स्थानिकांचे म्हणणे काय आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
नेमके काय घडले ?
शनिवारी रात्री त्र्यंबक गावातून संदल मिरवणूक निघाली होती. त्यात २५ ते ३० जण सहभागी झाले होते. वाजतगाजत आलेली मिरवणूक रात्री पावणेदहा वाजता मंदिराच्या उत्तर महाद्वाराजवळ थांबली. मंदिर बंद होण्याची वेळ असल्याने भाविक प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. मिरवणुकीतील एका युवकाच्या डोक्यावरील टोपलीत फुले होती. पायरीजवळ धूप दाखविण्यासाठी त्याच्यासह काही जण पुढे गेले. त्यांना प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी रोखले. या घटनाक्रमाचे मिरवणुकीत सहभागी झालेल्यांकडून भ्रमणध्वनीव्दारे चित्रीकरण करण्यात आले. याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. प्रवेश करण्यावरून काहीवेळ गोंधळ झाल्यानंतर मिरवणूक पुढे निघून गेली.
आक्षेप काय ?
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू धर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नाही, असा फलक आहे. असे असताना मंदिरात जाण्यासाठी दुसऱ्या धर्मातील काही युवकांनी पाच ते दहा मिनिटे सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातल्याची पुरोहित आणि देवस्थानची तक्रार आहे. याद्वारे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून या घटनेची सखोल चौकशीची मागणी देवस्थानने केली.
विश्लेषण: १४४ कलम इतकं स्वस्त झालंय का? प्रतिबंधात्मक आदेश नित्याची बाब बनू पाहताहेत?
मिरवणुकीशी संबंधित चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या. पोलिसांनी शांतता समितीची बैठक बोलावून दोन्ही गटांना समज देत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी लावून धरली. राज्य शासनाने चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी त्र्यंबकला भेट देऊन आढावा घेतला. मंदिरात जबरदस्तीने प्रवेशाचा प्रयत्न, धूप, आरती व फुले वाहून धार्मिक भावना दुखावत सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी चार जणांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दावे-प्रतिदावे कोणते ?
गेल्या वर्षीही संदल मिरवणुकीत असाच प्रकार घडला होता, याकडे देवस्थानचे प्रमुख पुजारी तथा विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल लक्ष वेधतात. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज त्यांनी मांडली. त्र्यंबकेश्वर देवस्थानने लेखी तक्रारीद्वारे या घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे डोक्यावर चादर धरून संदल मिरवणूक निघाली होती, त्या सलीम सय्यद यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सर्व नियम लहानपणापासून ज्ञात असल्याचे नमूद केले. आपले वडील मिरवणुकीवेळी पायरीजवळ धूप दाखवून निघून जात असत. आजवर आपण तसे केले होते. यावेळी मात्र त्यास वेगळे वळण मिळाले. शनिवारी कुणाचाही मंदिरात प्रवेश करण्याचा वा चादर चढविण्याचा उद्देश नव्हता, असे सय्यद यांनी म्हटले आहे. शांतता समितीचे सदस्य नबीयून शेख यांनी गावात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविदांने राहत असल्याचे नमूद केले. संदलवेळची प्रथा बंद करण्याविषयी लेखी देण्याचीही तयारी संबंधित युवकांनी दर्शविल्याचे ते म्हणाले. अल्पसंख्यांकांपैकी एका गटाने संदल मिरवणुकीवेळी काही प्रथा असल्याचे अमान्य केले. अशी कोणतीही प्रथा नसून जर कोणी तसे कृत्य करण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई करावी, असे म्हटले आहे.
मंदिरावरच सर्व अवलंबून कसे ?
सुमारे १२ हजार लोकसंख्येच्या त्र्यंबकेश्वर गावात सर्व धर्मियांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. हिंदू धर्मियांचे प्राबल्य असणाऱ्या गावात केवळ दोन ते तीन टक्के अल्पसंख्यांक आहेत. सर्वांचा उदरनिर्वाह इतरांप्रमाणे मंदिरावर अवलंबून आहे. पूजा साहित्य, नारायण नागबली विधीसाठी लागणारे कपडे, प्रसाद, भांडी विक्रीची अन्य धर्मियांची दुकाने आहेत. दरवर्षी त्यांच्याकडून दोन ते तीन वेळा संदल, उरुस काढला जातो. मात्र यापूर्वी कधीही असे घडले नव्हते, असे त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष आणि देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी म्हटले आहे.
सीबीआयचे नवे संचालक प्रवीण सूद कोण आहेत? काँग्रेसने केले आहेत गंभीर आरोप!
स्थानिकांची भावना काय ?
त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. शनिवार, रविवार आणि सोमवारी ३० ते ५० हजारच्या दरम्यान गर्दी असते. त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे साडेपाचपासून रात्री नऊपर्यंत दर्शनासाठी खुले असते. गर्दीच्या काळात रांगेतून दर्शनासाठी तीन ते पाच तास लागतात. तुलनेत लवकर दर्शन होण्यासाठी देवस्थानचा प्रति व्यक्ती २०० रुपयांच्या देणगी दर्शनाचा पर्याय आहे. भाविकांवर त्र्यंबकेश्वरांचे अर्थचक्र फिरते. शनिवारच्या घटनेचा विपर्यास झाल्यामुळे सर्वत्र वेगळा संदेश गेल्याची काहींची भावना आहे. त्याचा भाविकांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो, अशी त्यांना साशंकता आहे. शेकडो कुटुंबांचे अर्थचक्र भाविकांशी निगडीत आहे. त्यावर परिणाम झाल्यास हातावर पोट असणाऱ्यांना झळ बसणार असल्याचे काही जण सांगतात.