दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ४३ विद्यार्थ्यांसाठी आजही मेक्सिकोमध्ये आंदोलन सुरू आहे. मेक्सिकोमधील ‘रूरल नॉर्मल स्कूल’मधील ४३ विद्यार्थी २०१४ मध्ये रहस्यमयीरित्या बेपत्ता झाले होते आणि या विद्यार्थ्यांचे पुढे काय झाले, याचे उत्तर अजूनही प्रशासनाकडे नाही. त्यांची हत्या झाल्याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे आणि या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत. पोलिसांनी एका बसवर केलेल्या कारवाईदरम्यान ४३ विद्यार्थीदेखील बेपत्ता झाल्याचे सांगितले जाते. नक्की प्रकरण काय? दहा वर्षांनंतरही मेक्सिकोतील नागरिक रस्त्यावर का उतरत आहेत? या विद्यार्थ्यांबरोबर काय घडले? त्याविषयी जाणून घेऊ.
२६ सप्टेंबर २०१४ रोजी काय घडले?
इगुआला येथील ग्युरेरो युनिडोस या स्थानिक ड्रग टोळीला पकडण्याची कारवाई सुरू असताना सुरक्षा दलांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. हे विद्यार्थी आंदोलनासाठी एका बसची चोरी करत होते. मेक्सिकोचे तत्कालीन अध्यक्ष एनरिक पेना निएटो (२०१२-२०१८) यांच्या कार्यकाळादरम्यान विद्यार्थी आंदोलनासाठी ग्युरेरो येथील इगुआला येथे एका कार्यक्रमात निषेध करण्यासाठी गेले होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना ड्रग टोळीचे सदस्य समजले होते. पेना निएटो प्रशासनाने आरोप केले की, ग्युरेरो युनिडोसने विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली, त्यांचे मृतदेह मोठ्या आगीत जाळले आणि त्यांची राख नदीत फेकली. परंतु, अमेरिकन कमिशन ऑन ह्युमन राइट्सच्या उत्तराधिकारी ऍटर्नी जनरल यांनी २०१९ मध्ये तयार केलेल्या ट्रूथ कमिशनच्या तपासणीत असे काहीही आढळून आले नाही.
त्यानंतरच्या तपासात असे आढळून आले की, त्या रात्री ग्युरेरो युनिडोस या टोळीला यांना पकडण्यासाठी स्थानिक, राज्य आणि फेडरल पोलिसांचा समावेश असलेले एक मोठे ऑपरेशन केले गेले. इगुआला येथे तळ असल्यामुळे सैन्याला सर्व गोष्टींची माहिती होती. ग्युरेरो येथून अमेरिकेला बसमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर लष्कराचे सदस्य लक्ष ठेवून होते, असेही तपासकर्त्यांनी सांगितले. सरकारी वकिलांनी सांगितले की, सत्य लपवण्याचा निर्णय सरकारच्या उच्च स्तरावर घेण्यात आला आहे.
बेपत्ता विद्यार्थ्यांसाठी कोणाला जबाबदार धरण्यात आले आहे?
दोन आठवड्यांपूर्वी मेक्सिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी विद्यार्थ्यांच्या बेपत्ता होण्याशी संबंधित एका कार्टेल प्रमुखाला अटक केली. गिल्डर्डो लोपेझ अस्टुडिलो याला संघटित गुन्ह्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आणि दक्षिण-मध्य मेक्सिकोतील अल्टिप्लानो सुरक्षा तुरुंगात नेण्यात आले आहे, असे ‘रॉयटर्स’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. एल गिल नावाच्या एका व्यक्तीला या प्रकरणात २०१५ साली अटक करण्यात आली होती, परंतु त्याच्याविरुद्ध पुरावे तयार केले गेल्याचे आढळल्यानंतर २०१९ मध्ये त्याला सोडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बेपत्ता आणि हत्येचा आरोप असलेल्या कार्टेलचे तो नेतृत्व करतो. त्या व्यतिरिक्त, या प्रकरणात १०० हून अधिक लोक ताब्यात आहेत, त्यांच्यावर डझनभर आरोप आहेत, परंतु कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही. मागील प्रशासनाच्या शेवटच्या कार्यकाळात मेक्सिकन न्यायालयांनी सांगितले की, या प्रकरणातील तपासात अनेक त्रुटी आहेत. देशातील सर्वोच्च दर्जाच्या व्यक्ती माजी ऍटर्नी जनरल जेसस मुरिलो करम यांच्यावर अत्याचार, बेपत्ता आणि न्यायात अडथळा आणल्याचा आरोप आहे. त्यात १६ सैनिकांचादेखील समावेश आहे, त्यापैकी बहुतेकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे कुटुंब चिडले आहे.
सध्याचे प्रशासन काय करत आहे?
मेक्सिकन अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांनी विद्यार्थ्यांना शोधण्याचे आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, २०२२ मध्ये जेव्हा या हल्ल्यात लष्कराचा सहभाग असल्याचे पुरावे सापडले, तेव्हापासून प्रशासनाचा सूर बदलला. अध्यक्षांनी लष्कराला त्यांचे संग्रह तपासकर्त्यांसाठी उघडण्याचे आदेश देणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. त्याऐवजी ओब्राडोरने अध्यक्षांपेक्षा अधिक शक्ती आणि जबाबदारी सैन्याकडे हस्तांतरित केली. तपासाचे नेतृत्व करणारे ओमर गार्सिया ट्रेजो यांनी दोन डझन सैनिकांना अटक करण्याचे आदेश मागितल्यानंतर अचानक त्यांची पदावनती करण्यात आली. त्यांची जागा या प्रकरणात वेगळ्या व्यक्तीने घेतली.
कुटुंबीयांचा काय आरोप?
कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे वकील मुख्य अटक अजूनही झाली नसल्याचे सांगतात. पेना निएटो प्रशासनादरम्यान तपासाचे नेतृत्व करणारे टॉमस झेरोन काही व्हिडीओंमध्ये कैद्यांची चौकशी आणि धमकावताना दिसत आहेत. ते असेही म्हणतात की, त्यांना त्या रात्रीच्या लष्करी गुप्तचर नोंदी पाहायच्या आहेत; मात्र, त्याची परवानगी त्यांना नाही. त्यांना अमेरिका सरकारकडून अधिक सहकार्य हवे आहे; ज्यांनी ग्युरेरो युनिडोसच्या सदस्यांवर अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात खटला चालवला आहे. राजकीय शक्ती हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून झाला आहे.
हे प्रकरण अजूनही का तापले आहे?
बेपत्ता प्रकरणांसाठी मेक्सिको कुप्रसिद्ध आहे. मेक्सिकोमध्ये किमान १,१५,००० बेपत्ता प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या बेपत्ता प्रकरणात कार्टेल हिंसा आणि भ्रष्ट अधिकार्यांचा समावेश असल्याने, हे प्रकरण लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचेही अधिकार्यांचे सांगणे आहे, कारण त्यांची हाडे सापडली असल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे.