इस्लामाबादमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी ही बैठक पार पडणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींसह अनेक देशांच्या प्रमुखांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे,” असे बलोच म्हणाल्या. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले, “भारत सीमेपलीकडील घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यास तयार आहे. मग त्या सकारात्मक असो वा नकारात्मक.”
रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या अध्यक्षांनी २००१ मध्ये शांघाय येथे झालेल्या शिखर परिषदेत ‘एससीओ’ची स्थापना केली होती. ‘एससीओ’त भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. जातीय आणि धार्मिक तणाव दूर करण्याबरोबर व्यवसाय आणि गुंतवणूक वाढवणेदेखील या संघटनांचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारतील का? भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली तेव्हा नक्की काय घडले? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ, भारतीय आता होत आहेत अधिक श्रीमंत; हे कसं घडतंय? जाणून घ्या
जवाहरलाल नेहरू : जुलै १९५३ आणि १९६०
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. काश्मीरसह दोन राष्ट्रांमधील अनेक गंभीर समस्या सोडवण्याचा हा भारत आणि पाकिस्तानचा पहिला प्रयत्न होता. १९४७ आणि १९४८ मध्ये काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदा युद्ध झाल्यानंतर सुमारे पाच वर्षांनी, २५ ते २७ जुलै १९५३ या कालावधीत नेहरूंनी पाकिस्तानला भेट दिली. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान मोहम्मद अली बोगरा यांच्या निमंत्रणावरून नेहरूंनी कराचीला भेट दिली आणि आपल्या समकक्षांशी चर्चा केली. पाकिस्तान त्यावेळी आर्थिक संकटात होता आणि नेहरूंना वाटले की त्यावेळी पाकिस्तानचे नेते निराश आहेत. नेहरूंनी काश्मीरचे राजकारणी गुलाम मुहम्मद बक्षी यांना पत्र लिहिले, “त्यांनी माझ्याकडे केलेले आवाहन क्षुल्लक होते, ते अगदी हताश होते. बोगरा यांना भारताबरोबर शांततापूर्ण संबंध हवे होते, पण काश्मीरमधील स्थिती त्यांना सांभाळता आली नाही.”
‘द प्रिंट’नुसार, दोन्ही पंतप्रधानांमध्ये काही गोष्टींवर एकमत झाले. परंतु, आपल्या मंत्रिमंडळातील नेत्यांना त्यासाठी तयार करणे बोगरा यांना जमले नाही. त्या काळात पाकिस्तानवर राज्य करणाऱ्या जनरल अयुब खान यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. या भेटीत दोन्ही पंतप्रधानांनी नवीन जनमत प्रशासक नेमण्यास सहमती दर्शवली होती. परंतु, या प्रशासकाचे राष्ट्रीयत्व आणि मतदान कसे होणार यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला. सप्टेंबर १९६० मध्ये नेहरूंनी पाकिस्तानचा दुसरा दौरा केला आणि फील्ड मार्शल मोहम्मद अयुब खान यांची भेट घेतली. कराची, मुरी, नथियागली, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये नेहरूंचे मोठ्या जनसमुदायाने स्वागत केल्यामुळे ही भेट पहिल्या भेटीपेक्षा खूपच यशस्वी ठरली.
अयुब खान यांनी त्यांच्या आठवणींविषयी लिहिताना नेहरू आणि त्यांच्या भेटीविषयीही लिहिले होते. “मला पाहून पंडित नेहरू खूश झाले असावे असे मला वाटले नाही, परंतु माझ्या चर्चेतील विषयांमुळे ते खूप प्रभावित झाले. मी त्यांना सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कोणत्याही तर्कशुद्ध रचनेने तयार झालेले नाहीत; तर परिस्थितीनुरूप बदलले आहेत.” ते पुढे म्हणाले, “त्यानंतर मी त्यांच्याबरोबर काश्मीर समस्येवर चर्चा केली. काश्मीरमधील जनतेनेच या प्रकरणी निर्णायक भूमिका मांडली पाहिजे, असे मी त्यांना सांगितले. जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या दृष्टिकोनातून समाधानकारक तोडगा काढणे अत्यावश्यक होते. श्रीमान नेहरूंनी माझ्या कल्पनांशी सहमती दर्शवून सीमेवर होणाऱ्या घटना आणि गोळीबार संपवण्याच्या गरजेवर भर दिला,” ही आठवण ‘फ्रंटलाईनर’च्या वृत्तात देण्यात आली आहे.
या दौऱ्यात काश्मीरचा प्रश्न सुटला नसला तरी नेहरूंनी १९ सप्टेंबर १९६० रोजी पाकिस्तानबरोबर कराची येथे ऐतिहासिक सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली. या कराराचा उद्देश सध्याच्या सिंचनाच्या पाण्याच्या वापराबाबत दोन्ही देशांमधील वाद संपवण्याचा होता. सीमेवरील सुविधा १ एप्रिल १९६० पासून लागू झाल्या.
राजीव गांधी : १९८८ आणि १९८९
१९८८ मध्ये राजीव गांधी यांनी पाकिस्तानला भेट दिली. जवळपास तीन दशकांनंतर भारतीय पंतप्रधानांनी पहिल्यांदाच पाकिस्तानला भेट दिली होती. २९ ते ३१ डिसेंबर १९८८ या काळात राजीव गांधी यांनी पाकिस्तानात चौथ्या सार्क शिखर परिषदेला हजेरी लावली होती. बेनझीर भुट्टो यांनी एका दशकात पाकिस्तानात लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पहिल्या सरकारची सत्ता हाती घेतली होती. राजीव गांधी त्यांची आई तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर भारताचे पंतप्रधान झाले होते. ‘एशियन एज’नुसार, राजीव यांनी त्याच वर्षी एका भाषणात त्यांच्या शेजारी देशांच्या धोरणाची रूपरेषा सांगितली होती. “आम्हाला शांतता, मैत्री आणि सहकार्याच्या भावनेने शेजाऱ्यांपैकी प्रत्येकाशी जवळचे संबंध विकसित करायचे आहेत. हेच पाकिस्तानसाठीही लागू होते. आमचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, हस्तक्षेप न करणे आणि शांततापूर्ण सहअस्तित्व हे आमच्या नातेसंबंधाचे मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे,” असे राजीव गांधी म्हणाले होते.
‘डाउन’च्या वृत्तानुसार, बेनझीर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राजीव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राजीव गांधी यांनी भुट्टो यांना एक संदेश पाठवला की, त्यांना आशा आहे की त्यांच्या परस्पर प्रयत्नांमुळे दोन्ही देश आणि संपूर्ण प्रदेशात शांतता आणि समृद्धी येईल. या दौऱ्यापूर्वी काही भारतीय अधिकाऱ्यांनी आशावाद व्यक्त केला होता. “मला वाटते की आपण गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत या दोन दिवसांत गोष्टी पुढे नेऊ,” असे राजीव यांच्याबरोबर असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘एलए टाईम्स’ला सांगितले होते. हे अधिकारी माजी अध्यक्ष झिया उल-हक यांच्या मृत्यूचा संदर्भ देत होते; ज्यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने बेनझीर यांना सत्तेवर आणणाऱ्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला होता.
राजीव गांधी २९ डिसेंबर रोजी पत्नी सोनिया आणि त्यांची मुले राहुल आणि प्रियंका यांच्याबरोबर पाकिस्तानला पोहोचले. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष गुलाम इशाक खान, तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो तसेच अनेक उच्चपदस्थ नागरी आणि लष्करी नेत्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. राजीव आणि बेनझीर यांची पहिली भेट झाली. बेनझीर यांनी राजीव आणि त्यांच्या कुटुंबासाठी पंतप्रधान निवासस्थानात रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. वृत्तपत्रानुसार बेनझीर यांचे पती आसिफ झरदारी आणि त्यांची आई बेगम नुसरत भुट्टो यांनीही या आयोजनात हजेरी लावली होती. ‘डाउन’च्या वृत्तानुसार, सार्क परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राजीव आणि बेनझीर यांची पुन्हा भेट झाली, जिथे त्यांनी काश्मीरसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. राजीव यांनी दोन्ही देशांनी मोकळेपणाने बोलले पाहिजे हे मान्य केले.
त्यांनी या बैठकीत काश्मीरचा उल्लेख ‘डेड हॉर्स’ असा केला आणि बैठक संपवली. परंतु, त्यांचा दौरा यशस्वी ठरला. राजीव गांधी आणि बेनझीर यांनी तीन द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली, ज्यात न्यूक्लियर नॉन-अग्रेशन कराराचा समावेश होता. त्यानुसार एकमेकांच्या आण्विक प्रतिष्ठानांवर हल्ले करणे यावर बंदी घालण्यात आली आणि सांस्कृतिक सहकार्य व नागरी विमान वाहतूक सुधारणे यावर भर देण्यात आला.
जुलै १९८९ मध्ये राजीव गांधी यांनी पुन्हा एकदा भारतीय पंतप्रधान म्हणून पाकिस्तानला भेट दिली. १६ आणि १७ जुलै, असा त्यांचा दोन दिवसीय दौरा होता. त्यांच्या आगमनापूर्वी बेनझीर यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले की, आम्ही टप्प्याटप्प्याने प्रगती करत आहोत. राजीव गांधी यांनी या भेटीत पाकिस्तानी लष्करी गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली. त्यानंतर राजीव गांधी यांच्या सन्मानार्थ राज्य भोजन देण्यात आले. राजीव गांधींनी अण्वस्त्र नियंत्रण, श्रीलंकेतून शांततारक्षक सैन्य मागे घेण्यास भारताचा नकार आणि विवादित सियाचीन हिमनदी सीमा प्रदेशातील लष्करी परिस्थिती यावर चर्चा केली. परंतु, देशांतर्गत राजकारणाच्या दबावापुढे गांधी आणि भुट्टो यांच्या भेटीचा फारसा फायदा झाला नाही
अटलबिहारी वाजपेयी : १९९९ आणि २००४
‘मिंट’नुसार, २ फेब्रुवारी १९९९ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “मला दिल्ली ते लाहोर बसने प्रवास करायचा आहे.” वाजपेयींनी माध्यमांना काही प्रमाणात माहिती दिली. पण, १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने खराब कामगिरी केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच हा दौरा झाला. २० फेब्रुवारी १९९९ रोजी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निमंत्रणावरून वाजपेयी बसने लाहोरला पोहोचले.
वाजपेयी ‘सदा-ए-सरहद’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली-लाहोर बससेवेचे उद्घाटन करत होते. ‘स्क्रोल’नुसार, वाजपेयींबरोबर देव आनंद, शत्रुघ्न सिन्हा, कपिल देव आणि जावेद अख्तर यांच्यासह दोन डझन सेलिब्रिटी होते. वाघा सीमेवर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी वाजपेयींचे स्वागत केले. वाजपेयी आणि शरीफ यांची भेट जगभरातील मथळे ठरली. दोन्ही देशांनी नुकतीच अण्वस्त्रांची चाचणी घेतली होती. वाजपेयी म्हणाले, “माझ्याबरोबर माझ्या भारतीय सहकाऱ्यांच्या सद्भावना आणि आशा आहेत, जे पाकिस्तानशी शांतता आणि सौहार्दाचे पालन करू इच्छितात. मला जाणीव आहे की, हा दक्षिण आशियाई इतिहासातील एक निर्णायक क्षण आहे आणि मला आशा आहे की, आम्ही आव्हानांचा सामना करू शकू,” असे वाजपेयी म्हणाले.
‘द प्रिंट’नुसार, वाजपेयींनी फक्त सीमा ओलांडण्याची, शरीफ यांची भेट घेण्याची आणि परत जाण्याची योजना आखली होती. पण, शरीफ यांच्या इतरही काही योजना होत्या. “दर तक आये हो, घर नहीं आओगे? (तुम्ही दारात आला आहात, घरी येणार नाही का?)”, असा प्रश्न शरीफ यांनी वाजपेयींना विचारला. शरीफ यांनी लाहोर किल्ल्यावर वाजपेयींच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते. वाजपेयींनी मिनार-ए-पाकिस्तान, अल्लामा इकबाल यांची समाधी, गुरुद्वारा डेरा साहिब आणि महाराजा रणजीत सिंग यांच्या समाधीला भेट दिली. त्यानंतर २१ फेब्रुवारी १९९९ रोजी गव्हर्नर हाऊसमध्ये वाजपेयींच्या सन्मानार्थ नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. दोन्ही पंतप्रधानांमधील चर्चेनंतर, लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली; ज्या अंतर्गत इतर गोष्टींबरोबरच, अण्वस्त्रांच्या अपघाती किंवा अनधिकृत वापराचे धोके कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले.
दुर्दैवाने या भेटीचा काही उपयोग झाला नाही, असे म्हणता येईल. कारण वाजपेयींच्या भेटीच्या काही महिन्यांनंतर पाकिस्तानी लष्कराने परवेझ मुशर्रफ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कथितरित्या शरीफ यांच्या समतीने कारगिल ऑपरेशन सुरू केले; ज्यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले. जानेवारी २००४ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क) परिषदेसाठी इस्लामाबादला भेट दिली. २००२ मध्ये दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आल्यापासून त्यांची ही पहिली पाकिस्तान भेट होती. डिसेंबर २००१ मध्ये भारताच्या संसदेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला होता. पाकिस्तानबरोबरच्या भूतकाळातील अनुभवांवरून वाजपेयींनी नवी दिल्लीहून निघण्यापूर्वी द्विपक्षीय चर्चा नाकारली होती. “कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही. सार्क चर्चा यशस्वी करण्यासाठी आम्ही आमची सर्व शक्ती देऊ इच्छितो,” असे ते म्हणाले.
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जफरुल्ला जमाली, परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी, अर्थमंत्री शौकत अझीझ, उच्च अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाजपेयींचे स्वागत केले. “आपण विवादांच्या निराकरणासाठी काम करूया, यामुळे अधिक प्रादेशिक सहकार्य निर्माण होण्यास मदत होईल,” असे जमाली यांनी शिखर परिषदेपूर्वी सांगितले होते. मुळात ही शिखर परिषद जानेवारी २००३ मध्ये नियोजित होती, परंतु भारताने उपस्थित राहण्यास नकार दिल्याने ती पुढे ढकलण्यात आली. प्रलंबित काश्मीर समस्येच्या संदर्भात जमाली म्हणाले की, “राजकीय संघर्षाच्या वातावरणात व्यापार आणि आर्थिक संबंध टिकून राहू शकत नाहीत.” ते पुढे म्हणाले, “आम्ही इस्लामाबादमधील शिखर परिषदेला पाकिस्तानसाठी सार्कबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याची संधी म्हणून पाहतो.”
वाजपेयींना लष्करी गार्ड ऑफ ऑनरने सलामी देण्यात आली, त्यानंतर सशस्त्र दलाच्या बँडने भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवले. वाजपेयी आणि जमाली यांची ही पहिली भेट होती. वाजपेयी यांनी शिखर परिषदेला सांगितले की, “परस्पर संशय आणि क्षुल्लक शत्रुत्वे आम्हाला सतत त्रास देत आहेत.” कोणत्याही संयुक्त प्रयत्नांना परस्पर विश्वासाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी : २०१५
२५ डिसेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्यासाठी लाहोरला अचानक भेट दिली आणि अनेकांना धक्का दिला. एका दशकाहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा होता आणि योगायोगाने त्या दिवशी वाजपेयींचा ९१ वा वाढदिवस होता.
हेही वाचा : एकेकाळी हार्वर्ड विद्यापीठाने नाकारलं होतं, आज आहेत १२ लाख कोटींच्या संपत्तीचे मानकरी, कोण आहेत वॉरेन बफे?
अफगाणिस्तानचा एक दिवसाचा दौरा आणि रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर मोदींनी पाकिस्तानला भेट दिली. “आज दुपारी लाहोरमध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी उत्सुक आहे, या भेटीनंतर मी दिल्लीला परत येईन,” असे पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार मोदींचे रेड कार्पेटवर स्वागत करण्यात आले. अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदी आणि शरीफ यांची गळाभेट झाली, त्यानंतर ते लाहोरच्या बाहेरील शरीफ यांच्या रायविंड राजवाड्यावर हेलिकॉप्टरने गेले. मोदींनी नवाज यांच्या कुटुंबातील सदस्यांची त्यांच्या घरी भेट घेतली. ‘पीटीआय’ने वृत्त दिले की, जाति उमराह निवासस्थानी मोदींचा आवडता पदार्थ ‘साग’ तयार करण्यात आलेल्या शाकाहारी पदार्थांपैकी एक होता. “साग, डाळ आणि भाज्या यासह सर्व पदार्थ देशी तुपात शिजवलेले होते,” असे जाति उमरामधील एका सूत्राने ‘पीटीआय’ला सांगितले. एका सूत्राने सांगितले की, मोदींना काश्मिरी चहाही देण्यात आला.