लोक अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी बँकांकडून कर्ज घेतात. गृहकर्ज, कार किंवा इतर वाहन घेण्यासाठी कर्ज, मुलांचे शिक्षण असो, मुलीचे लग्न असो किंवा वैयक्तिक कारण असो, अशा सर्व महत्त्वाच्या कामांसाठी अनेकदा बऱ्याच लोकांना कर्ज घ्यावे लागते. बँका वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसायासाठी कर्ज आणि शैक्षणिक कर्ज वेगवेगळ्या व्याजदराने देतात आणि कर्जाची मुदत पूर्ण होईपर्यंत आपल्याला कर्जाची परतफेड करावी लागते. परंतु अनेक प्रकरणांमध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा एखाद्या कारणाने मृत्यू होतो. अशा परिस्थितीत त्या कर्जाचे काय होते? बँक ते कर्ज माफ करते का? यासंदर्भातल्या काही प्रश्नांची उत्तरे समजून घेऊयात.
बँक कर्ज माफ करते का?
कर्जदाराचा अकाली मृत्यू झाल्यास त्याचे कर्ज बँकेकडून माफ केले जाते का? तर याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. कर्जदाराचा मृत्यू झाला असला तरी बँक त्याचे पैसे वसूल करते. जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले असेल आणि त्याचा अकाली मृत्यू झाला असेल, तर मग त्याच्या संपत्तीचा वारसदार त्या कर्जाची परतफेड करेल. वारसदाराना तसं केलं नाही किंवा कोणत्याही कारणाने नकार दिला तर कायदेशीररित्या बँक मालमत्ता विकून त्यांच्या कर्जाची रक्कम परत मिळवते. जर मालमत्ता विकून आलेली रक्कम ही कर्जापेक्षा जास्त असेल तर बँक असा परिस्थितीत लिलावातून मिळालेले पैसे कायदेशीर वारसदाराला परत करते.
गृहकर्ज –
डीएनए इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एखाद्याने संयुक्त गृहकर्ज घेतले असेल आणि प्राथमिक अर्जदाराचा मृत्यू झाला, तर अशा वेळी कर्जाची परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी अन्य दुसऱ्या अर्जदाराची असेल. दुसरा अर्जदार कर्जाची परतफेड करू शकत नसेल, तर बँकेला दिवाणी न्यायालय, कर्ज वसुली न्यायाधिकरण किंवा सरफेसी कायद्यांतर्गत वसुलीची प्रक्रिया अवलंबण्याचा अधिकार आहे. मालमत्ता ताब्यात घेऊन आणि ती विकून बँक आपले कर्ज वसूल करू शकते. दरम्यान, कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी बँका कुटुंबातील सदस्यांना काही दिवस देतात. जर मृत व्यक्तीने मुदतीची पॉलिसी किंवा इतर कोणतीही पॉलिसी घेतली असेल, तर बँका कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी पॉलिसीद्वारे पैशांची व्यवस्था करण्यासाठी वेळ देतात.
वैयक्तिक कर्ज/क्रेडिट कार्ड –
वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड बिले हे सर्व असुरक्षित कर्जाच्या (Unsecured Loans) श्रेणीत येतात. एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल न भरता मृत्यू झाल्यास, बँक त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा त्याच्या कायदेशीर वारसांना कर्जाची परतफेड करण्यास सांगू शकत नाही. हे असुरक्षित कर्ज असल्याने काहीही गहाण ठेवलेलं नसतं. त्यामुळे त्यांना मालमत्ता जप्त देखील करता येत नाही. अशा परिस्थितीत बँका ते राइट ऑफ करतात म्हणजेच NPA खात्यात टाकतात.
वाहन कर्ज –
वाहन कर्ज घेणार्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालास हे कर्ज फेडण्याची जबाबदारी कुटुंबावर येते. जर कुटुंब संबंधित कर्ज फेडण्यास तयार नसेल, तर बँक कारचा ताबा घेते आणि कर्ज वसूल करण्यासाठी तिचा लिलाव करते. आलेल्या रकमेतून ते त्यांचे कर्ज वसूल करतात.
व्यावसायिक कर्ज –
वैयक्तिक कर्जाप्रमाणे व्यवसाय कर्जाचे आधी इन्शूरन्स काढलेले असते, जेणेकरून व्यवसायात नुकसान झाल्यास किंवा कर्जदाराचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून कर्ज वसूल केले जाऊ शकते. जर, तुम्ही इन्शूरन्स घेतले नाही आणि बँकेने तुमचे ट्रांजेक्शन पाहूनच व्यवसाय कर्ज दिले असेल, तर या परिस्थितीत तुमच्या कर्जाच्या रकमेइतकी मालमत्ता आधीच गहाण ठेवली जाते. जेणेकरून नंतर ती विकून कर्ज वसूल करता येईल.