दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले गेले होते. या महाविनाशकारी हल्ल्यामध्ये शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले होते. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणुबॉम्ब हल्ल्याचे परिणाम आजवर दिसून येत आहेत. थर्मल आणि शॉक इफेक्ट्सपासून ते पर्यावरणीय हानीपर्यंतचे आण्विक स्फोटाचे परिणाम दीर्घकालीन आहेत. या हल्ल्याचे परिणाम पाहताच अण्वस्त्रांविरोधातील जनजागृतीचे काम सुरू झाले. दुसर्‍या महायुद्धादरम्यान जेव्हा आण्विक स्फोट झाला, तेव्हा फार प्रगत शस्त्रे नव्हती. तरीही या स्फोटाचा गंभीर परिणाम झाला. मात्र, आपण आजचा विचार केल्यास १९४५ मध्ये जपानमध्ये झालेल्या स्फोटापेक्षा कितीतरी पटींनी अधिक विनाशकारी शस्त्रे अनेक देशांजवळ आहेत.

शीतयुद्धाच्या काळात विकसित झालेल्या सर्वांत शक्तिशाली बॉम्बचे उत्पादन मेगाटनमध्ये मोजले जाऊ शकते. हिरोशिमातील बॉम्बचे वजन १५ किलोटन, तर नागासाकीतील बॉम्बचे वजन २५ किलोटन होते. आतापर्यंतचा सर्वांत शक्तिशाली आण्विक स्फोट १९६१ मध्ये रशियन झार बॉम्बने झाला; ज्याचे वजन ५० मेट्रिक टन होते. नोबेल पुरस्कार समितीने २०२४ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानमधील निहॉन हिडानक्यो या संस्थेला जाहीर केला आहे. जग आण्विक हल्ल्यांपासून मुक्त करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. अणुस्फोट प्रत्यक्षात कसा असतो? त्याचे दुष्परिणाम किती गंभीर असतात? त्यावर एक नजर टाकू…

आण्विक स्फोटात लाखो लोक मारले जातात आणि हजारो मैलांपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त होतो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : ‘डेटिंग ॲप्स’चा वापर धोकादायक? या ॲप्सचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

अणुबॉम्बचा स्फोट

आण्विक स्फोटात लाखो लोक मारले जातात आणि हजारो मैलांपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त होतो. अणुबॉम्बचा स्फोट कुठे होतो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. अशा स्फोटाचा सर्वांत तत्काळ परिणाम म्हणजे थेट आण्विक किरणोत्सर्गाचा प्राणघातक प्रसार. हा स्फोट एक सेकंदापेक्षाही कमी काळ टिकणारा असतो; पण त्याचे दुष्परिणाम हजारो किलोमीटरपर्यंतच्या परिसरावर होऊ शकतात. जेव्हा हा स्फोट होतो तेव्हा अणुबॉम्बच्या थर्मल आणि शॉक इफेक्ट्सच्या प्रभावाची क्षमता जास्त असते. सोप्या भाषेत सांगायचे, तर स्फोटाच्या वेळचे तापमान सूर्याच्या दशलक्ष अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त गरम असते; ज्यात माणसांसह इतरही गोष्टी सहज वितळू शकतात. आण्विक स्फोट होतो तेव्हा प्रचंड मोठा फायरबॉल तयार होतो, जो असह्य प्रकाश आणि उष्णता उत्सर्जित करतो. त्याचा प्रभाव इतका तीव्र असतो की, ५० किलोमीटर अंतरावर असणार्‍या व्यक्तीही भाजू शकतात.

अणुविस्फोटामुळे प्राणघातक आगीचे वादळ तयार होते; ज्यामुळे आणखी अनेक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कारण- या स्फोटामुळे इमारतीही ज्वलनशील होतात. त्याशिवाय निर्माण होणारी स्फोटाची लाट भौतिक विनाशास कारणीभूत ठरते; ज्यामुळे इमारती कोसळतात, वस्तू उडतात, लोकांना दुखापत होते आणि अंतर्गत रक्तस्रावही होऊ शकतो. तसेच ऑक्सिजनची कमतरता, कार्बन मोनॉक्साईडची विषबाधा, उग्र आगीचा धूर यांमुळेही लोकांचे मृत्यू होतात. स्फोटादरम्यान जखमी झालेल्या अनेक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. कारण- प्रदेशातील आरोग्य पायाभूत सुविधाही पूर्णपणे नष्ट होतात आणि जखमींना उपचार मिळत नाहीत.

आण्विक स्फोटाचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्याचे किरणोत्सर्गी परिणाम दिसून येतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

आण्विक स्फोटाचे भीषण परिणाम

आण्विक स्फोटाचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्याचे किरणोत्सर्गी परिणाम दिसून येतात. आण्विक स्फोटमुळे किरणोत्सर्गी सामग्री तयार होते. म्हणजेच खूप ऊर्जा असलेल्या अस्थिर अणूंची प्रक्रिया होते. या प्रक्रियेमध्ये अल्फा कण, बीटा कण, न्यूट्रॉन व गॅमा किरणांसारख्या विविध उपअणुकणांचे उत्सर्जन होते, जे मानव आणि इतर सजीवांसाठी अत्यंत विषारी असते. आण्विक स्फोटानंतर पसरणारा आण्विक किरणोत्सर्ग आठवडाभर टिकू शकतो; ज्यामुळे मृत्यूंची संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. परंतु, त्याचे वास्तविक परिणाम अनेक दशके राहतात. असा अंदाज आहे की, आण्विक स्फोटाच्या पहिल्या नऊ आठवड्यांमध्ये अंदाजे १० टक्के मृत्यू हे किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे होतात; तर ९० टक्के मृत्यू स्फोटाच्या प्रभावामुळे होतात. मुख्य म्हणजे किरणोत्सर्गाचा परिणाम आगामी अनेक वर्षांत आणि पिढ्यांमध्ये कर्करोग व आनुवंशिक नुकसानाच्या रूपात दिसू शकतात.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भेटीदरम्यान नक्की काय घडले? भारत-कॅनडातील तणावाचे कारण काय?

न्यूक्लियर रेडिएशनच्याच अगदी कमी पातळीमुळेही कर्करोग आणि इतर काही रोगांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. याचा अर्थ असा की, आण्विक स्फोटाचे परिणाम त्याही पलीकडे आहेत. काही अंदाजानुसार, १९४५ ते १९८० दरम्यान केलेल्या आण्विक चाचण्यांमुळे अंदाजे २.४ दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे होईल, असे वातावरणीय चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. पर्यावरण आणि हवामानावरदेखील या अणुस्फोटाचे परिणाम दिसून येतात. ग्रहांवरील हवामानात आणि वातावरणात कायमस्वरूपी बदल होण्याची शक्यताही शास्त्रज्ञ नाकारत नाहीत. आण्विक स्फोटांमुळे थंडी वाढू शकते, पिकांचे नुकसान होऊ शकते आणि एकूणच अर्थव्यवस्थेवरही दुष्परिणाम होऊ शकतो.